महामार्गावर वाहतूक कोंडी सुरूच

0
12

>> दहावीचे विद्यार्थी, नागरिक त्रासात

>> पर्वरी, मेरशी, बांबोळी, पाटोत चक्काजाम

>> एक बाजू आजपासून खुली होण्याची शक्यता

येथील मांडवी नदीवरील अटल सेतू वाहतुकीसाठी बंद, पणजी बसस्थानकाजवळील मुख्य रस्त्याचे सुशोभीकरण व डांबरीकरणाच्या कामामधील नियोजनाच्या अभावामुळे पणजी, पर्वरी, मेरशी, बांबोळी, पाटो आदी भागातील मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनचालक, नागरिक व दहावीच्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. या वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिकासुद्धा अडकून पडल्या होत्या.

अटल सेतू वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने गेल्या काही दिवसांपासून पणजी बसस्थानक, पर्वरी, मेरशी जंक्शन आदी भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त बनले आहेत. येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यास वाहतूक पोलीस अपयशी ठरल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. मेरशी जंक्शनवरील नव्याने बसविण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याची वाहन चालकांची तक्रार आहे.

राज्यातील जी-20 परिषदेच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर सुशोभीकरण, रस्त्याचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येत आहे. ही कामे करताना वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून योग्य नियोजन केले जात नाही.
पणजी बसस्थानक, मेरशी, पर्वरी ते बांबोळीपर्यत वाहनांच्या रांगा लागल्याने अनेक नागरिकांनी प्रवासीबसमधून उतरून पायी प्रवास करून कदंब बसस्थानक गाठले. दहावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीमुळे परीक्षेला वेळेवर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात थोडा उशीर झाला, अशी माहिती पालकांनी दिली.

बसस्थानकाकडे कोंडी
पणजी कदंब बसस्थानकाच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मामू हागे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी कदंब बसस्थानक, मेरशी जंक्शन येथे धाव घेऊन वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी मार्ग खुला करून पर्वरीच्या दिशेने जाणारी वाहने सोडण्यास सुरुवात केली. सुमारे दोन-अडीच तास वाहतूक कोंडीची समस्या कायम होती.

पणजीतील वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात तोडगा काढण्यासाठी अटल सेतूची एक बाजू आज गुरूवारी सकाळपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. अटल सेतूवरील एकेरी वाहतूक बंद करण्यात आल्याने पणजी भागात वाहतूक कोंडी वाढली आहे.