नेपाळमधील हिमस्खलनानंतर आलेला महाप्रलय हादरवून सोडणारा आहे. अर्थात, हिमालयातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये अशा प्रकारचे हिमस्खलन आणि प्रलय तसे नवे नाहीत. भारतातही उत्तराखंडमध्ये अशी भयावह दृश्ये आपण पूर्वी पाहिली आहेत. मात्र, नेपाळमध्ये आलेल्या पूराची व्याप्ती थेट तिबेटपासून नेपाळपर्यंत असल्याने फार मोठ्या प्रमाणात प्राणहानी झालेली आहे. तूर्त मृतांची संख्या जरी शे – दोनशेच्या घरात सांगितली जात असली, तरी हजारो लोक बेपत्ता आहेत, त्यामुळे प्रत्यक्षातील प्राणहानी हजारोंमध्ये असू शकते. अक्षरशः गावेच्या गावे काही सेकंदांत प्रचंड मलब्याखाली नाहीशी झाली आहेत. नद्यांवरचे पूल, नद्यांकाठच्या इमारती, रस्ते, जलऔष्णिक प्रकल्प सगळे सगळे क्षणार्धात उद्ध्वस्त झाले. अवघ्या तीस मिनिटांत नद्यांतील पाण्याची पातळी तब्बल नऊ मीटरने वाढली ह्यावरून पुराचा वेग आणि जोर लक्षात यावा. हा पूर नेमका कशामुळे आला ह्याबाबत तर्कवितर्क चालले आहेत. भूकंपामुळे हे घडल्याचे प्रारंभी अनुमान काढले गेले, परंतु उपग्रह छायाचित्रे पाहता जोरदार हिमस्खलनामुळे वरच्या भागातील जलसाठ्यांतील पाणी नद्यांमध्ये शिरून प्रचंड वेगाने रोंरावत खाली गेले असावे असे दिसते. नद्या एकमेकांना जोडलेल्या असतात. त्यामुळे हा लोढा प्रचंड वेगाने खाली खाली जात राहिला. आजूबाजूच्यांना आपल्या कवेत घेत गेला. बर्फ, खडक, पाणी ह्यांचा मलबा गावेच्या गावे आपल्या कवेत घेत गेला. नेपाळपेक्षा वरच्या तिबेटमध्ये झालेली प्राणहानी अधिक आहे, परंतु चीनच्या पोलादी पडद्यामुळे तेथील वस्तुस्थिती कळणे दुरापास्त आहे. नेपाळमध्ये जे हजारो नागरिक ह्या दुर्घटनेत बेपत्ता झाले आहेत, त्यामध्ये विदेशी नागरिकही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामध्ये कैलास मानससरोवर यात्रेला गेलेल्या यात्रेकरूंचे प्रमाण अधिक आहे असे दिसते, कारण तिबेटच्या सीमेलगतच्या त्याच भागाला ह्या पूराचा प्रामुख्याने मोठा तडाखा बसलेला आहे. नेपाळ सरकारच्या अनुमानाप्रमाणे पाचशेहून भारतीय पर्यटक बेपत्ता आहेत. त्या सर्वांचा शोध घेणे आणि सुरक्षित आहेत ह्याची खातरजमा करणे, त्याचबरोबर पुरात उद्ध्वस्त झालेल्या गावांतील लोकांपर्यंत मदत पोहोचवणे हे फार मोठे आव्हान बनले आहे, कारण त्या गावांना जोडणारे रस्ते, पूल उद्ध्वस्त झाल्याने केवळ हेलिकॉप्टरमार्गेच ही मदत पुरवली जाऊ शकते. मात्र, खराब हवामानामुळे त्यालाही मर्यादा आहेत. दुसरे म्हणजे टनांवारी मलबा सर्वत्र साठल्याने त्याखाली गाडल्या गेलेल्यांना शोधणे जवळजवळ अशक्य आहे, कारण त्यासाठी अवजड यंत्रसामुग्री तेथवर पोहोचवणेच कठीण आहे आणि पोहोचली तरी एवढा गाळ उपसणे दुरापास्त आहे. किमान जे लोक पुरातून वाचले आहेत, त्यांच्यापर्यंत तरी मदत पोहोचवण्यास त्यामुळे प्राधान्य द्यावे लागेल. भारताने आपल्या ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणानुसार तात्काळ नेपाळला मदतीचा हात पुढे केला आहे. नेपाळचे नवे पंतप्रधान बालेंद्र शाह भारताला सतत पाण्यात पाहत आले आहेत, परंतु संकटसमयी भारताने हा विचार केला नाही. तातडीची मदतसामुग्री खास विमानांतून तात्काळ रवाना केली गेली. शेवटी माणसाने माणसाच्या मदतीसाठी धावणे हीच माणुसकी असते. संकटकाळी सीमा, प्रांत, भाषा, धर्म ह्या भिंती कोसळून पडतात. आज नेपाळला चहुदिशांनी साह्याची गरज आहे. वास्तविक, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अशा नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना मिळू शकते. चीनलाही ह्या दुर्घटनेची पूर्वसूचना मिळाली होती, कारण तिबेटमध्ये ह्या प्रलयाची सुरूवात झाली, परंतु नेपाळ सरकारला ती माहिती देण्यात पंचेचाळीस मिनिटे उशीर केला गेला अशी तक्रार आता नेपाळने केली आहे. खालच्या भागांतील जनतेला वेळीच पूर्वसूचना मिळू शकली असती, तर कित्येकांचे निदान प्राण वाचू शकले असते. भारत सरकारने काही महिन्यांपूर्वी मोबाईलद्वारे आपत्ती संदेश यंत्रणेची चाचणी घेतली होती, तशा प्रकारच्या पूर्वसूचना देणाऱ्या तंत्रज्ञानाचे महत्त्व अशा संकटाच्या वेळी जाणवते. नेपाळमधील पूरग्रस्तांना स्वच्छ पिण्याचे पाणी देखील आज दुरापास्त झाले आहे. जलऔष्णिक प्रकल्प उद्ध्वस्त झाल्याने वीज नाही. रस्ते, पूल गेल्याने इतर भागांशी संपर्क नाही. अशा परिस्थितीत ती जनता आहे. त्याहून बिकट स्थिती तेथे अडकून पडलेल्या पर्यटकांची आहे. भारतीय पर्यटकांच्या मदतीसाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावी लागतील. त्या दिशेने प्रयत्न सुरूही झाले आहेत. नेपाळमधील ही दुर्घटना, हा हाहाकार ही आपल्या पर्वतीय राज्यांसाठी देखील धोक्याची सूचना आहे. अशा आपत्तींना तोंड कसे द्यायचे, त्यांची पूर्वसूचना सर्वांपर्यंत वेळेत कशी पोहोचवायची ह्याची अधिक चांगली सज्जता ठेवण्याची गरजच त्यातून अधोरेखित झाली आहे.

