महागाईचा आगडोंब

0
14
  • प्रमोद ल. प्रभुगावकर

गणेशचतुर्थीच्या कामांत गर्क असलेल्या अनेकांच्या तोंडचे पाणी यंदा या उत्सवाच्या तोंडावर साखर व अन्य आवश्यक वस्तूंच्या झालेल्या दरवाढीने पळविले आहे. एरव्ही दरवर्षी अशा सणासुदीचे दिवस जवळ आले की बहुतेक वस्तूंचे दर वाढत होते; पण यंदाची ही दरवाढ भयानक स्वरुपाची असून त्यामुळे सर्वसामान्यांना हा काय प्रकार आहे, या दरवाढीवर कोणाचेच नियंत्रण नाही की काय, असा प्रश्न पडला आहे.

गोवा व कोकणपट्टीतील सर्वात महत्त्वाची असणारी गणेशचतुर्थी आता पंधरवड्यावर आलेली आहे. कामधंद्यानिमित्त गावापासून दूर असलेली मंडळी फावल्या दिवशी वेळ काढून गावातील आपल्या घरी येऊन साफसफाई व अन्य पूर्वतयारीची कामे करू लागली आहेत. कारण एकदा का बाप्पा घरी आला की अशा कामासाठी त्यांना वेळ मिळत नसतो.

पण या कामांत गर्क असलेल्या अनेकांच्या तोंडचे पाणी या उत्सवाच्या तोंडावर साखर व अन्य आवश्यक वस्तूंच्या झालेल्या दरवाढीने पळविले आहे. एरव्ही दरवर्षी अशा सणासुदीचे दिवस जवळ आले की बहुतेक वस्तूंचे दर वाढत होते; पण यंदाची ही दरवाढ भयानक स्वरुपाची असून त्यामुळे सर्वसामान्यांना हा काय प्रकार आहे, या दरवाढीवर कोणाचेच नियंत्रण नाही की काय, असा प्रश्न पडला आहे. विरोधी पक्षांनी तर हा मुद्दा पकडून सरकारला झोडपण्यास सुरुवात केली आहेच, पण सत्ताधारीही खासगीत अशीच प्रतिक्रिया व्यक्त करताना आढळत आहेत. सर्वांत पहिली दरवाढ झाली ती साखरेची व तीही थोडी थोडकी नाही तर किलोमागे तब्बल दहा ते पंधरा रुपयांनी. चाळीस- पंचेचाळीस रु.नी विकली जाणारी साखर एकाच दिवसात तब्बल साठ-पासष्ट रु.वर पोचली. दुसऱ्या दिवशी तर काही व्यापाऱ्यांनी ती पंच्याहत्तर रु.वर नेली. केवळ साखरच नव्हे तर लोकांच्या रोजच्या जेवणातील प्रमुख घटक असलेला तांदूळ, नारळ, खाद्यतेले व कडधान्ये यांची गोष्टही वेगळी नाही. सध्या श्रावण महिना चालू असून आठवड्याभराने गणपतीच्या भाद्रपद महिन्यास सुरुवात होईल, त्यामुळे हे सण कसे साजरे करायचे याची भ्रांत गोव्यातील अनेक कुटुंबांसमोर ‘आ’ वासून उभी ठाकलेली दिसून येते.

साखर-तांदूळ-खाद्यतेले यांचे दर असे एकाएकी एकाच दिवसात का भडकले याचे उत्तर मात्र शोधूनही सापडत नाही. साखरेच्या दराबाबत राजकीय दृष्टिकोनातून टिका करताना विरोधी पक्षांनी इथेनॉलचा मुद्दा उपस्थित करून त्यात मंत्री गडकरींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण दुसरीकडे सरकारने तो फेटाळून लावताना इथेनॉलसाठी वळवण्यात आलेल्या साखरेचा वाटा प्रत्यक्षात घटविलेला आहे. पूर्वी तो 25 टक्के होता तर गतवर्षी 9 टक्के होता असे स्पष्ट करून तो कमी केल्याचे म्हटले आहे. पण खरेच ती वस्तुस्थिती आहे का हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. कारण अनेक साखर कारखाने उसाचा मोठा वाटा इथेनॉलसाठी वापरतात अशी चर्चा आहे. पूर्वी सगळाच ऊस साखरेसाठी वापरला जात होता, तर आता निम्मा ऊस इथेनॉलसाठी जातो असे वृत्त आहे. यात वस्तुस्थिती काय आहे हा संशोधनाचा मुद्दा आहे. पण त्याचबरोबर हे संशोधन कोण करणार हाही मुद्दा येतो. आता सरकारचे म्हणणे प्रमाण मानले व इथेनॉलसाठी ऊस कमी वापरला जातो असे गृहीत धरले तर मग साखरेचे दर नेमके का भडकले असा प्रश्न पडतो. काहींच्या मते त्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण, या हंगामात अपेक्षेप्रमाणे कमी उत्पादन झाले व त्याच्या परिणामी साठा घटला. ते लक्षात येताच सरकारने साखर आयात करण्याचा निर्णय घेतला व तो जाहीरही केला व त्याचा फायदा नेमका साठेबाजांनी घेतला. असलेला साखर साठा दडविला त्यामुळे कृत्रिम साखर टंचाई झाली व दर वाढले. एकाएकी किलोमागे दहा ते पंधरा रु. किमती वाढल्या त्याचे हे खरे कारण असल्याचे मानले जाते.

त्यानंतर सरकार खडबडून जागे झाले व त्याने साठेबाजी रोखण्यासाठी पावले उचलली. त्यात 400 टन साखर साठ्याची मर्यादा घातली. पण त्याला उशीर झाला होता. कारण त्यापूर्वीच किमती आकाशाला भिडल्या होत्या. सरकारने घेतलेल्या उपायानंतरही त्या उतरल्या नाहीत यावरून एकंदर परिस्थिती किती गंभीर आहे ते लक्षात येते. उसाचे झालेले कमी उत्पादन असाही दावा सरकार करते, पण त्यातही तथ्य दिसत नाही. कारण गत म्हणजे 2024-25 या हंगामातही या हंगामापेक्षा कमी उत्पादन झाले होते, पण साखरेचे दर काही भडकले नव्हते. मग आताच नेमके काय झाले व अवघ्या दोनतीन दिवसांत दर भडकले. खरे म्हणजे आपले नियोजन कुठेतरी चुकते याचेच हे द्योतक आहे.
केवळ साखरच नाही तर आपल्या गोव्यात गेल्या काही वर्षांपासून नारळाच्या दरांबाबतही असेच प्रत्यंतर येत आहे. खरे म्हणजे गोव्यात उत्पादित होणारा नारळ व गोव्याची एकंदर गरज व सणासुदीच्या काळातील गरज याचा ताळेबंद मांडून त्यांतील फरक भरून काढण्यासाठी उपाययोजना तयार असणे गरजेचे आहे. पण प्रत्यक्षात ती दिसत नाही व म्हणून शेवटच्या क्षणी धावपळ करून कुठून तरी मिळेल त्या दरात नारळ खरेदी करणे व तो बाजारात आणणे असे प्रकार होतात. प्रत्यक्षात त्यात विलंब होतो व त्यामुळे लोकांनी शेवटच्या क्षणी धावाधाव नको म्हणून मिळेल तसा तो खरेदी करणे व त्यानंतर सरकारी नारळ बाजारात येणे असे चित्र दिसते. खरे तर एकदा आलेल्या अनुभवातून शहाणे होऊन पुढच्या वेळी योग्य ते उपाय योजता येण्यासारखे असतात, पण त्यासाठी गरज असते ती इच्छाशक्तीची.

केवळ साखरेची वा नारळाचीच गोष्ट नाही, गोव्यातील मुख्य अन्न मानल्या गेलेल्या तांदळांच्या दरांबाबतही हाच अनुभव आहे. सर्वसाधारण गोमंतकीय ‘सोना’, ‘मसुरी’ हा तांदूळ वापरतो, त्याचा दर 50 ते 55 रु. होता; पण अकस्मात त्याने 70 ची पातळी गाठली व मिळत असलेले संकेत पाहिले तर तो पाऊणशेवर जाऊ शकतो. तीच गत जीरा, किशोर, गाय छाप यांची आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे तांदळांच्या दरानेही किलोमागे किमान दहा रुपयांची वाढ दिसून येते. त्यापेक्षा अधिक दरांच्या तांदळांचेही तसेच असल्याचे प्रमुख तांदूळ व्यापारी म्हणतात. गोव्यात अधिकतम दाक्षिणात्य राज्यांतून तांदूळ येतो व त्याची आवक कमी झाल्याने ही दरवाढ झाल्याचे ते म्हणतात. पण ही आवक नेमकी सणासुदीच्या तोंडावर का घटली की त्यामागे कोणाचा काही डाव आहे अशी शंकाही घेतली जात आहे. गोव्यातील तिसरा अन्नघटक तो म्हणजे मासळी. तिचे दर कधी वाढतात व कधी खाली येतात. असे का ते त्या विकणाऱ्यांनाच माहीत. या एकंदर व्यवस्थेवर कोणाचेच नियंत्रण नाही की देखरेख नाही, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात ठरावीक लोकांची मक्तेदारी झाली आहे व त्याचेच हे फलित म्हणावे लागेल.

चतुर्थीनिमित्ताने गोव्यात विवाहित मुलींकडे ‘वजी’ पाठविण्याची पद्धत आहे. हल्ली तर अशी ‘वजी’ व त्यांतील खाद्यपदार्थांचे नग मुलींकडील मंडळीसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनत चालला होता. या दरवाढीमुळे त्या मंडळींचे कंबरडे मोडण्याची भीतीही व्यक्त होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे हल्लीच्या काळात असे खाद्यपदार्थ व फराळाचे जिन्नस तयार करून विकणाऱ्यांचे पेव फुटले होते, त्यांनाही या दरवाढीमुळे त्या पदार्थांची दरवाढ करणे भाग पडले आहे. या दरवाढीमुळे अनेकांचे अंदाजपत्रक मात्र निश्चितपणे कोलमडणार आहे.

गेल्या काही वर्षांचा अनुभव असा की, अशा सणांच्या काळात वाढलेले- विशेषतः फळे व भाज्यांचे तसेच डाळी-कडधान्यांचे दर सण आटोपले तरी उतरत नाहीत. याचे कारण या दोन्ही वस्तू बाहेरील राज्यांतून गोव्यात येत असतात. दुसरे एक म्हणजे, त्याचा व्यापार करणाऱ्यांमध्येही स्थानिक क्वचितच असतात. याचा फायदा संबंधित पुरेपूर उठवीत असतात. दसऱ्या-दिवाळीच्या दिवसांत गोव्याच्या सर्व भागांत रस्त्याच्या कडेला विक्री होत असलेल्या झेंडूच्या फुलांचे असो वा तुलसीविवाहाच्या काळात अशाच प्रकारे विकल्या जात असलेल्या उसांचे उदाहरण त्यासंदर्भात घेता येईल. बरे, त्यांचे दर तरी माफक असतात तर तसेही नाही. आता तर चतुर्थीच्या दिवसांत माटोळीला बांधली जात असलेल्या फळावळीचा बाजार सुरू होतो. सरकारनेही जागोजागी माटोळी बाजार करून गोवेकरांना आणखी आळशी बनविलेले आहे. पूर्वीच्या काळात घरांतील बालमंडळी वडीलधाऱ्यांंसमवेत कुळागरांत वा आगारांत जाऊन ही फळावळ व पत्री वगैरे गोळा करीत असत. पण आताच्या माटोळीबाजारामुळे सगळे काही आयतेच मिळत असते. पैसे मोजले की झाले ही मानसिकता. त्यामुळे मुले व तरुण मुलांना फळावळ व त्यांची नावेसुद्धा कळणे मुश्कील होण्याचा धोका आहे. पण अशा या पद्धतीमुळे काहींना रोजगार मात्र मिळाला आहे.

ही दरवाढ फक्त साखर-तांदूळ वा नारळ-खाद्यतेलांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर बाप्पांच्या मूर्तींनाही लागू झाली आहे. तसे ग्रामीण भागांत पूर्वीच्या काळात मूर्तीकार कधीच मूर्तींची किंमत सांगत नसत तर आपल्या मर्जीने काय तो विडा ठेवा असे म्हणत. त्यामुळे अपेक्षेहून अधिक रक्कम जशी मिळे तसेच कधी कधी अपेक्षाभंगही होई. काही मूर्तीकार गतवर्षीपेक्षा थोडा अधिक विडा ठेवा म्हणत. पण बदललेल्या परिस्थितीप्रमाणे आता तोंडाने काय ती किंमत सांगतात किंवा मूर्तीच्या खाली रक्कम लिहून कागद ठेवतात. त्यामुळे खरे म्हणजे दोघांचीही (मूर्तीकार व खरेदीदार) सोय होते. चित्रशाळांचे चालक दरवर्षी महागाईचे रडगाणे गातात, पण सरकारने त्यांना मूर्तीप्रमाणे अनुदान मंजूर करून व नंतर वेळोवेळी ते वाढवूनही ते तेच पालुपद आळविताना दिसतात. खरे म्हणजे सरकारने त्यांना जे अनुदान दिले आहे ते लोकांना सवलतीच्या दरांत मूर्ती मिळाव्यात या उद्देशाने, तसेच मूर्तीकारांना मदत व्हावी म्हणून, पण लोकांना तशा त्या माफक दरात कधी मिळाल्याच नाहीत. दुसरे म्हणजे उत्साहाने साजरा केल्या जाणाऱ्या चतुर्थीतील मूर्तीच्या दरांत घासाघीस करणे कोणालाच शोभत नाही व नेमक्या याच गोष्टीचा लाभ उठविला जातो, अशाही तक्रारी कानावर येतात. गोव्यातच नव्हे तर सगळीकडेच या उत्सवात दारुकामाची प्रचंड आतषबाजी होते. त्यावर मोठा खर्च होतो. आता त्यातून निष्पन्न काय होते हा मुद्दा वेगळा व तो कोणी विचारातही घेत नाही.

गोव्यात आता गावागावांत व शहराशहरांतच नव्हे तर येथील प्रत्येक प्रभागात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. त्यासाठी उत्सव समित्या निवडल्या जातात व त्यातही मोठी चुरस लागते. या समित्या देणगी कुपनाच्या नावाखाली काढत असलेल्या लॉटऱ्या व त्यावर बक्षिसरूपात ठेवल्या जाणाऱ्या लाखोंच्या गाड्या, रोख बक्षिसे पाहिली तर भल्याभल्यांचे डोळे पांढरे होतील. यंदा तर काही ठिकाणी सदनिका (फ्लॅट) बक्षिसापोटी ठेवल्या असून त्यासाठीच्या कुपनांचे मूल्य पाचशे ते आठशे रु. आहे. असे असतानाही कुपने खरेदी करण्यासाठी लागलेल्या लांबलचक रांगा व त्यांचा काही तासांत झालेला खप पाहिला तर खरेच महागाई आहे का व आपण कोणत्या जगात वावरत आहोत असा प्रश्न निदान माझ्यासारख्याला पडतो. कारण माझ्या बालपणात मी गणपतीच्या मूर्तीच्या विड्यावर चुलत्याने 10 रु. ठेवलेले पाहिलेत. त्यावेळी साखरेचा दर 3 रु. व फटाक्यांचा मारांद आठ आणे होता. पन्नास साठ वर्षांनंतर आज त्यांच्या किमती पाहिल्या तर खरी महागाई काय याची कल्पना येईल!