महसूल वाढीवर भर देणारा पणजी महापालिकेचा अर्थसंकल्प संमत

0
157

काल झालेल्या पणजी महापालिकेच्या बैठकीत ३४ कोटी ६६ लाख रुपये खर्चाचा व ६ कोटी १० लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प संमत करण्यात आला.
खर्च भरून काढण्यासाठी महापालिकेने यावेळी निचरा व्यवस्था शुल्कात बर्‍याच प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅसिनो चालकांच्या निचरा व्यवस्थेच्या सध्या ५ हजार रुपये शुल्का ऐवजी ती वाढवून दहा हजार रुपये करण्याचे ठरविले आहे. वरील शुल्क वर्षासाठी आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रदर्शनासाठीचा शुल्क प्रतिदिनी दहा हजार रुपयांऐवजी १५ हजार रुपये केली आहे. पंचतारांकित हॉटेलमधील कचरा गोळा करण्यासाठी वर्षाकाठी १० हजार रुपये शुल्क आकारण्यात येत होते. त्यात एक हजार रुपये वाढवून ११ हजार रुपये शुल्कवाढ केली आहे. प्रत्येक वर्षी १० टक्के शुल्कात वाढ होईल. गट १ (अ) वर्गातील हॉटेलसाठी साठेआठ हजार रुपये, तसेच गट १ वर्गातील हॉटेल मालकांकडून ५ हजार रुपये शुल्क, गट २ साठी ३६०० ऐवजी ४ हजार रु., ३ हजार रु. व दीड हजार रु. शुल्क असलेल्या हॉटेलच्या शुल्कात दोन वर्षानंतर १० टक्के वाढ तसेच ३६०० व ४ हजार रुपये शुल्क असलेल्यांसाठीही दोन वर्षात १० टक्के शुल्क वाढविण्याचे ठरविले आहे. तसेच मटन-चिकन किंवा अन्य कत्तलखान्यासाठी वर्षाकाठी १५०० रुपये शुल्क निश्‍चित केली आहे.
पणजी शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर शुभम चोडणकर यांनी केले. महापालिका क्षेत्रातील १०० टक्के कचर्‍याचे व्यवस्थापन होत नाही, असे रुद्रेश चोडणकर यांनी सांगितले. वाहन पार्किंगमुळे निर्माण होत असलेल्या समस्येवरही चर्चा करण्यात आली. चुकीच्या जागेवर पार्क केलेली वाहने उचलून आणण्यासाठी अधिक खर्च होत आहे. त्यामुळे दंडात वाढ करावीच लागेल, असे आयुक्त संजित रॉड्रिगीस यांनी सांगितले. पणजीचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांचे अभिनंदन करणारा ठरावही बैठकीत संमत करण्यात आला.