22.5 C
Panjim
Saturday, November 27, 2021

महत्त्व ‘योग्य’ आहाराचे

  • वैद्य कांता जाधव भिंगारे

तिखट, खारट, आंबट अशा चवीच्या पदार्थांचा अतिरेक म्हणजे राजस आहार होय. याने शरीराला नुकसान तर होतेच शिवाय मनात राग, द्वेष, लोभ इ. मानस भाव निर्माण होतात. त्यातून मनुष्य स्वतःची आणि इतरांची हानी करतो. म्हणून अशा प्रकारचा आहार टाळणे योग्य ठरते.

आपण सर्वजण जाणतो की खानपान हा आपल्या जीवनातील सर्वांत महत्त्वपूर्ण घटक आहे. जसे की शरीर एक इंजीन आहे आणि खाद्य (अन्न) हे इंधन. आपल्या शरीराला कार्यरत ठेवण्यासाठी हवा, पाणी याचबरोबर अन्नसेवनाची अत्यंत आवश्यकता असते.

आपली सजीव सृष्टी ही पाच तत्त्वांनी बनलेली आहे- पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. आपले शरीरसुद्धा याच पाच तत्त्वांचे बनले आहे. पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातसुद्धा ७०% जलीय अंश आहे. त्यानुसार आपला आहारदेखील जलीय (पातळ) असावा लागतो. असा पातळ अंश असलेली विविध रसदार फळे, फळभाज्या, विविध कंदमुळे आपण दररोज अधिक प्रमाणात खाणे उचित असते. मात्र आपण नेमके उलटे करतो. आपण शिजवलेले अन्न जास्त प्रमाणात खातो जे ठोस किंवा घन असते. फळे मात्र खूप कमी किंवा मग फक्त आजारपण आल्यावरच सेवन करतो. पण आजारपण येऊच नये म्हणून दररोज नियमित फळे खाणे योग्य आहे, ज्यात भरपूर प्रमाणात चोथा असतो व जे आपली पाचनशक्ती प्राकृत ठेवतात आणि तात्काळ ऊर्जा देतात.

आपल्या प्राचीन भारतीय शास्त्रात दिनचर्या, ऋतूचर्या, आहारविधी इ.चा सखोल अभ्यास केलेला आहे. आयुर्वेदात याचे विस्तृत वर्णन केलेले आहे. आपण त्याचे दररोज पालन केल्यास शरीराला कुठलाही व्याधी शिवणार नाही आणि बाह्य कारणांनी व्याधी झाल्यास तो लवकर बराही करता येतो.
जवळजवळ नव्वद टक्के आजारपण हे आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे होतात. त्यामुळे आपल्या शरीराला आणि पाचनशक्तीला नेमके काय योग्य ते ओळखून खानपान करणे खूप गरजेचे असते.

पूर्वी भरपूर अंगमेहनतीची कामे होती. त्यामुळे सक्तीने सकाळी कोवळ्या उन्हात जाणे व्हायचे. दुपारपर्यंत भरपूर काम करून कडकडून भूक लागायची व मग जे खाल्ले जाईल ते व्यवस्थित पचायचे व अंगी लागायचे. आताच्या कॉंप्युटर आणि इंटरनेटच्या जगात सर्वकाही आरामशीर आणि बसूनच कामे केली जातात. त्यामुळे पाचनशक्ती कमजोर होते. अन्न नीट पचत नाही व अंगीही लागत नाही. सकाळचे कोवळे ऊन मिळत नाही. वातानुकूलित वातावरणात आठ- आठ तास बसणे होते. परिणामी शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. म्हणतात ना- मन जेवढे स्थिर आणि शरीर जेवढे फिरते राहील तेवढे चांगले. आपले हल्ली उलटेच होतेय. आपलं शरीर स्थिर आणि मन भटकत असते. (कामाच्या अतिरिक्त ताण).
जसे शरीरासाठी पोषक तत्त्व आवश्यक असतात जे आपण सेवन केलेल्या अन्नातून मिळत असतात. अशीच पोषक तत्त्वे शुद्ध विचार-आचार केल्याने मनाला मिळतात आणि अशा मनात सात्विक भाव निर्माण होतात. जे स्वतःचे कल्याण करताना, इतरांचेही कल्याण करतात, स्वतः किंवा इतरांना क्लेशदायक अशी काही कृती कधीही करीत नाही. म्हणतात ना जसे अन्न तसे मन. आपण जो शुद्ध सात्विक आहार घेतो त्यातूनच शरीर आणि मनाला सात्विक ऊर्जा प्राप्त होते. म्हणूनच तामसी आहार, राजस आहार यापासून दूर राहणेच योग्य ठरते.

  • सडके, नासके, कुजके, शिळे अन्न कधीही सेवन करू नये, असे अन्न तामसी असते, जे शरीरात आळस निर्माण करून विविध व्याधींना आमंत्रित करते.
  • तिखट, खारट, आंबट अशा चवीच्या पदार्थांचा अतिरेक म्हणजे राजस आहार होय. याने शरीराला नुकसान तर होतेच शिवाय मनात राग, द्वेष, लोभ इ. मानस भाव निर्माण करतात. त्यातून मनुष्य स्वतःची आणि इतरांची हानी करतो. म्हणून अशा प्रकारचा आहार टाळणे योग्य ठरते. लोणचे, पापड, बंद पॅकेटचे खाद्यपदार्थ यात भरपूर प्रमाणात तिखट, खारट, तेलकट, आंबट घटक असतात जे आपल्या पाचनशक्तीला कमजोर करतात. ज्यामुळे अस्वस्थता, झोप उडणे, रागाची भावना तीव्र होणे असे दुष्परिणाम होतात.
  • सात्विक आहारात दूध, तूप आणि कमी तेल असलेल्या पदार्थांचा समावेश होतो. जे अन्न सेवन केल्यावर आपल्याला हलके वाटते तसेच तात्काळ ऊर्जा निर्माण होते त्याला सात्विक आहार समजावा. जो आपल्या शरीराचे योग्य पोषण करून मनाचेही चांगले पोषण करतो असा आहार सात्विक असतो जो पाचनशक्तीला पूरक होतो.

जिभेची गरज पूर्ण करण्यापेक्षा शरीराची गरज पूर्ण करणे हिताचे असते. कारण जिभेला जे चांगले ते शरीरासाठी चांगले असेलच असे नाही. मात्र आपल्याला जिभेची चव महत्त्वाची वाटते आणि तसे संस्कार लहानपणापासून झाल्याने मोठेपणी सवयी बदलणे कठीण होते. म्हणूनच मुलांनाही लहान असतानाच योग्य अन्नाचे महत्त्व समजून सांगावे.

  • बर्‍याच वेळा सवयीने आपण खाद्यपदार्थांची आवड-निवड निर्माण करतो, अन्नाविषयी असा भाव निर्माण करणे योग्य नाही. ज्यावेळी जे सुपाच्य भोजन उपलब्ध आहे, ते प्रसन्न मनाने, सावकाश, पूर्ण एकाग्र चित्ताने आणि आनंदाने खावे. ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ असे म्हणतात याचे कारण त्यात पूर्ण ब्रह्मांड सामावले आहे. म्हणजे ते पांचभोतिक (पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश) असते. त्यातूनच आपल्या शरीरातील पंचतत्त्वांचे पोषण होत असते.
  • चहा- कॉफी इ.चा अतिरेक टाळावा. केवळ रिकामा वेळ आहे म्हणून उठसूठ चहा पीत बसू नये. यामुळे शरीराची हानी होण्याचा संभव जास्त असतो.

हल्ली तर चहाचेही खूप प्रकार उपलब्ध आहेत. ते सर्व आपल्या पाचनशक्तीसाठी योग्य आहेत का हेही पडताळून पहावे. कारण अशा हर्बल-टीमुळे फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होते. जसे तोंडात व्रण (माऊथ अल्सर), अम्लपित्त (ऍसिडिटी), पोटातील व्रण (स्टमक अल्सर), घशातील व्रण तसेच फीशर पाइल्स इ. म्हणून शरीराला गरज असते तेव्हाच चहाचे योग्य मात्रेत सेवन करावे.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

- Advertisement -

ALSO IN THIS SECTION