माध्यान्ह आहाराला चार रस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या पालकांनी विरोध दर्शविला आहे. काल पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला १५० पेक्षा अधिक पालक उपस्थित होते. या विद्यालयातील एकूण ८६ विद्यार्थ्यांना २७ रोजी माध्यान्ह आहारातून विषबाधा झाली होती.
त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी विद्यालयाची पालक संघटना, व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांची बैठक बोलाविण्यात आली होती. सरकार माध्यान्ह आहाराखाली प्रत्येक विद्यार्थ्यांमागे जी रक्कम मंजुर करते तेवढी रक्कम प्रत्येक मुलाच्या खात्यात जमा करण्यात यावी. त्यातून मुलांना हवे ते मुले खातील अशी सूचना करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
हा सर्व अहवाल शिक्षण खात्याला पाठविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आनंद देसाई यांनी दिली.