मलेरियापासून सावधान!

0
8
  • श्याम अनंत गावकर,
    (सहाय्यक माहिती अधिकारी, पणजी)

पावसाळा सुरू होताच गोव्याच्या इस्पितळांत तोबा गर्दी उसळते. विविध भागांत मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळू लागतात. अशा वेळी आपणाला सुरक्षित कसे राहता येईल याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.

आपल्या गोमंतकात पावसाळा सुरू झालाय. पाऊस ही निसर्गाची देणगी आहे. पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वांनाच आवडतो. पावसामुळे निसर्गात खूप सारे बदल होतात, जे आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाहू शकतो, अनुभवू शकतो. पाऊस प्रत्येकाच्या आनंद देणारा, आल्हाददायक जरी वाटत असला तरी या ऋतूत आपण प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.

पाऊस पडायला लागला आणि कधीतरी अधूनमधून उन्हाचे दर्शन घडू लागले की मलेरिया, डेंग्यू डोकं वर काढू लागतात. डेंग्यू, स्वाईन फ्लूसाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत तशी मलेरियासाठीही आहेत. कोरोनाबरोबरच अशा रोगांपासून पावसाळ्यात आपण आपले आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे.

वास्तविक, गर्मीपासून पाऊस प्रत्येकाला दिलासा देत असतो, म्हणूनच आपणा सर्वांना पाऊस हवाहवासा वाटतो. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळा सुरू होताच गोव्याच्या इस्पितळांत तोबा गर्दी उसळते. विविध भागांत मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून येतात. अशा वेळी आपण सुरक्षित कसे राहावे या दृष्टिकोनातून विचार होण्याची खरी गरज आहे.

आजच्या काळात माणूस धावपळ, पळापळ, ताणतणाव आणि टेन्शन याच चक्रामध्ये अडकून पडलेला आहे. या धकाधकीत मानवी मेंदूला तणाव जाणवतो. त्यासाठी बर्‍याच उपाययोजनाही केल्या जातात. मात्र पावसाळ्यात ज्या महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे असते त्याकडे आपण कानाडोळा करत असतो. मानसिक अशांतता आणि दगदग यामुळे माणूस चिडचिडा बनतो. त्यामुळे मेंदू तणावाखाली येतो. फलस्वरुप ज्याकडे लक्ष देण्याची गरज असते त्याचा विसर पडतो आणि नकळत छोट्यामोठ्या रोगांना आपण बळी पडतो.

पावसाळ्यात धोकादायक ठरणारे मलेरिया आणि डेंग्यू हे गंभीर रोग आहेत. कधीकधी ते प्राणघातक ठरतात. मलेरिया आणि डेंग्यूचा फैलाव विशिष्ट प्रकारच्या डासांमुळे होत असतो जो आपल्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. मलेरिया असलेल्या लोकांना विशेषत: जास्त ताप, थंडी वाजून येते आणि फ्लूसारख्या आजाराने त्रस्त बनतात. चार प्रकारचे मलेरिया परजीवी मानवांना संक्रमित करतात : प्लाझमोडियम फॅल्सीपेरम, पी. व्हायव्हॅक्स, पी. ओव्हेले आणि पी. मलेरिया. प्लाझमोडियम फॅल्सीपेरम हा मलेरियाचा प्रकार आहे ज्यामुळे गंभीर संक्रमण होण्याची शक्यता असल्याने त्याच्यावर तातडीने उपचार न केल्यास मृत्यू होऊ शकतो.

मलेरिया कसा पसरतो हे सर्वांनी आधी जाणून घेणे गरजचे आहे. सामान्यतः मादी एनोफिलीस डास चावल्यानंतर लोकांना मलेरिया होतो. केवळ ऍनोफिलीस डास मलेरिया पसरवू शकतात आणि संक्रमित व्यक्तीच्या रक्ताद्वारे संसर्ग होतो. मलेरिया रक्त संक्रमण, अवयव प्रत्यारोपण किंवा सुया किंवा सिरिंजच्या सामायिक वापराद्वारेदेखील प्रसारित होऊ शकतो याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी.
मलेरियापासून प्रत्येकाने स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे हेही समजून घेण्याची गरज आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, डेंग्यूचा डास दिवसा चावतो. अंग झाकण्यासाठी शक्य तो पूर्ण बाह्यांचे कपडे आणि लांब कपड्यांचा वापर करावा. रिपेलेंट्स, मच्छरदाणी वापरा. दिवसा मच्छर कॉइल आणि इलेक्ट्रिक व्हेपर मॅट्स वापरण्याची गरज आहे. घराच्या अवतीभवती असलेल्या एअर कूलर, टाक्या, बॅरल, ड्रम इ.मधून पाणी काढून टाका. अनावश्य वस्तू बाहेर फेकून देण्याची गरज आहे.

डेंग्यू ताप वेगाने वाढतो आणि महामारी दरम्यान मोठ्या संख्येने लोकांना प्रभावित करू शकतो, त्यामुळे तो घातकदेखील ठरू शकतो. तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागील वेदना जी हालचाल केल्याने तीव्र होते, अंगदुखी, सांधेदुखी आणि मळमळ किंवा उलट्या अशी लक्षणे दिसू लागली असता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

हे रोग पसरण्याची अनेक कारणे आहेत. डेंग्यू हा संक्रमित एडिस इजिप्ती डासाच्या चाव्याव्दारे पसरतो, जो संक्रमित व्यक्तीला चावल्याने विषाणू होतो. डास चावल्यानंतर ५-७ दिवसांनी पहिली लक्षणे दिसतात. एखाद्या डासात डेंग्यूचा विषाणू आहे की नाही हे सांगण्याचा कोणताही मार्ग नसल्याने लोकांनी सर्व डासांच्या चावण्यापासून स्वतःचे संरक्षण केले पाहिजे.

गोव्यात बारा तालुके आहेत. त्यांत अनेक गावांचा समावेश होतो. आपल्या गोव्यात जितके गाव, तितकीच वेगवेगळी आव्हानेही आहेत. आणि प्रत्येकाला आपल्या गावासमोर असलेली आव्हाने उत्तमप्रकारे माहीत असतात. म्हणूनच जर आपला गाव जिंकला तर त्याचा अर्थ देश जिंकला. सध्या गरज आहे ती एकमेकांच्या सहकार्याची. मी माझे गाव मलेरियामुक्त ठेवणार हा संदेश गावागावांत प्रभावीपणे पोहोचविण्याची खरी गरज आहे. गावातले लोक आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी उत्तम नियोजन करतात, हे सर्वज्ञात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २०२७ पर्यंत संपूर्ण भारतातून मलेरियाचे उच्चाटन करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी आपणा सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे.