Home बातम्या मला आत्महत्या करायची आहे!

मला आत्महत्या करायची आहे!

0

 डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे

बैठकीत ‘आत्महत्या’ या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर व्याख्यान देणार होते. मला तर मनात नसूनदेखील उपस्थित राहण्याशिवाय इलाजच नव्हता. कारण मागच्या कित्येक बैठकांना मी गैरहजर होतो. वर सांगितलेला विषय व त्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर म्हटल्यावर, माझ्यासह हजर असलेल्या प्रत्येक डॉक्टरांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. संकटाची सावली चेहर्‍यावर पसरलेली होती. एक दीडतास तरी मनाविरुद्ध जावे लागणार होते.

……..

आजची रविवारची संध्याकाळ रटाळ जाणार हे जणू ठरलेले होेते. रात्री आठ वाजता डॉक्टरांची बैठक होणार होती. त्या बैठकीत ‘आत्महत्या’ या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर व्याख्यान देणार होते. मला तर मनात नसूनदेखील उपस्थित राहण्याशिवाय इलाजच नव्हता. कारण मागच्या कित्येक बैठकांना मी गैरहजर होतो. वर सांगितलेला विषय व त्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर म्हटल्यावर, माझ्यासह हजर असलेल्या प्रत्येक डॉक्टरांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. संकटाची सावली चेहर्‍यावर पसरलेली होती. एक दीडतास तरी मनाविरुद्ध जावे लागणार होते. आल्या आल्या ‘वोट ऑफ थँक्स’ची चौकशी करणार्‍या त्या डॉक्टरांची आठवण झाली. ते सेवाभावी डॉक्टर आज आमच्यात नाहीत. असो. तर आजची संध्याकाळ कंटाळवाणी जाणार हा विचार करत चित्त ‘आत्महत्या’ या विषयावर केंद्रित झाले. यजमानांनी कॅमेरा माझ्या हातात दिला असल्याची संधी साधून वक्त्यांचे चांगले फोटोसेशन करून टाकले. म्हणजे खूष होऊन वक्त्यांनी लवकर व्याख्यान आटोपते घ्यावे.

विषयाला सुरुवात झाली. प्रत्येक चार सेकंदास एकाच्या मनात आत्महत्या करायची इच्छा उत्पन्न होते. दर २ मिनिटाला १ माणूस आत्महत्या करतो. आत्महत्यांचे प्रमाण गोव्यात देशात प्रथम क्रमांकावर आहे. हे सर्व ऐकून डोळे भिरभिरू लागले. मागच्या दिवसांत माझ्याजवळ एक तरुण पोरगा आलेला. त्याचे ध्यान बघण्यासारखे होते. मी काही विचारायच्या आधी तो मला म्हणाला, ‘‘डॉक्टरसाहेब मला आत्महत्या करायची आहे!’’ ह्या पोरग्याला मानसोपचार डॉक्टरची गरज होती – जो तासन तास त्याच्याजवळ बसून, त्याला बोलते करून, कोणत्या तरी एका निकषावर जाऊन थांबेल व मग त्याची व्यथा बाहेर येईल. तो मग सांगेल, ‘‘हो, ही माझी व्यथा! मी त्याला बसविला. पाणी दिले. त्याच्या केसातून हात फिरवला… त्याला बोलते केले. तो चक्क डबल ग्रॅज्युएट झालेला, फडाफडा इंग्रजी बोलणारा. पण गेली दोन वर्षे तो बेकार होता. घरची परिस्थिती ही हलाखीची झालेली. त्याच्या बोलण्यावरून ही केस माझ्या आवाक्याबाहेरची होती. मी त्याला ज्येष्ठ मानसोपचार डॉक्टरकडे पाठविले. व मी ती केस विसरून गेलो. तर चक्क चार दिवसाअगोदर त्या पोरग्याने आत्महत्या केली होती. तो वाचू शकला नव्हता. मी त्याला जगण्यास मदतही करू शकलो नव्हतो. मी खजील झालो. गलितगात्र होऊन खोलीच्या कोपर्‍यात जाऊन भावुक बनलो. कितीतरी दिवस त्या बालिश चेहर्‍याने माझी पाठ सोडली नव्हती.

वक्त्याने सगळ्या डॉक्टर प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळविला होता. मानवी मनाचे पडदे तो उघडून दाखवत होता. पडदे उघडल्या उघडल्या, मागच्या काळोखातून मानवी मनाचे सांगाडे बाहेर निघत होते. त्या सांगाड्यात प्रेमभंग झालेल्यांची संख्या जास्त होती. नंतर, संसारातील… ऑफिसातला ताण, पैशांचा तुटवडा, घरातला हलकल्लोळ… बायकोचा पैशांकरता तगादा, त्यांत भांडणे… मुलांचे शिक्षण, त्यांची होणारी आबाळ, त्यात शाळेतल्या मुलांमध्ये लागलेली शर्यत… त्यात आपला घोडा मरतुकडा, कमी भरड्याने अशक्त झालेला… उभे राहायचे त्राण नसलेला घोडा शर्यतीत कसा काय धावणार? अगदी दहा मीटरवर मान टाकलेली…!

माझ्या ओळखीचे डॉक्टर तल्लीन होऊन वक्त्यांचे भाषण ऐकत होते. हो, हेच ते डॉक्टर जे माझी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही कथा वाचून ‘विवाहबाह्य संबंधावर’ जाऊन पोहोचले होते. त्या दिवशी आम्हा चार डॉक्टरांचे माझ्या कथांवर बोलणे चालू होते. ते डॉक्टर मला म्हणाले, ‘‘ती तुमची ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ कथा फार चांगली होती. विवाहबाह्य संबंधावर लिहिलेली ती कथा वाचून मी चक्रावून गेलो.’’ तो विषय वेगळा होता व तो त्यांना म्हणे विवाहबाह्य वाटला. ती कथा वाचून डॉक्टरांसारख्या ज्ञानी लोकांवर जर हा परिणाम करू शकलो तर मग बाकीच्यावर त्यांचा काय परिणाम होईल हा विचार करत मन वर्तमानात घुसले. ‘आत्महत्या’ हा विषय ह्या डॉक्टरांवर कोणता परिणाम करेल हा विचार काळजात घर करून गेला. त्यांतून कुणाची हत्या न हो म्हणजे झाले!!

मलाही अजून आत्महत्या करावीशी वाटते! ही इच्छा मनात ४०-४५ वर्षांपासून आहे. मी पणजीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात प्रवचने, व्याख्याने ऐकायला जात असे. त्या सभागृहाला गच्ची आहे. गच्चीवर आल्या आल्या मला भोवळ यायची. वाटायचे गच्चीतून स्वत:ला खाली झोकून द्यावे. हळूच मी मागे फिरायचो. त्यानंतर मी त्या गच्चीत केव्हाच गेलो नाही. आजवर मी पुष्कळ उंच इमारती पाहिल्या. म्हणजे वरून; पण फक्त बंद असलेल्या गच्चीतून खाली डोकावलो.

वक्त्यांचे भाषण चांगलेच लांबले होते. ऐकणारे पहिल्यांदाच तल्लीन झालेले त्यांनी बघितले होते. त्यांना तसे तो सोडणार नव्हता. मी माझी बोलकी नजर म्होरक्या डॉक्टरकडे वळवली. तो काय ते समजला. वोट ऑफ थँक्सची वेळ टळून गेली होती. व्याख्यान संपले होते. पण प्रश्‍नावली चालू होती. या गहन विषयावर एक ज्येष्ठ डॉक्टर तावातावाने प्रश्‍न विचारत होते. एरवी हे महाशय प्रश्‍न विचारत नसत. आज जास्त प्रश्‍न विचारणारे दुसरे सेवाभावी डॉक्टर गैरहजर होते. त्यांची रिकामी जागा त्यांनी घेतली होती. प्रश्‍न सूचक होता. वक्त्यांचे म्हणणे होते. ६० % लोक आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टरांकडे गेले होते. प्रश्‍नकर्त्यांचे म्हणणे होते – ६०% लोकांना आम्ही वाचवू शकलो असतो! राहिलेल्या डॉक्टरांनी गबाळ्या चेहर्‍यांनी त्या प्रश्‍नकर्त्या डॉक्टरांकडे पाहिले. चेहर्‍यावरच्या त्यांच्या छटांनी त्यांनी विनंती केली, ‘‘पाया पडतो, आमची ह्यातून सुटका करा व ही चर्चा इथेच संपवा. नाहीतर आम्हांला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही!’’

त्यातला थट्टेचा विषय सोडला तरीदेखील… कितीतरी चेहरे… आत्महत्या करायच्या उद्देशाने माझ्याकडे आलेले डोळ्यांसमोर नाचत होते. मी मात्र मख्ख चेहर्‍याने गर्भगळीत होऊन त्यांच्याकडे बघत होतो. त्यांच्यातील कोणीतरी कानात किंचाळत होते, ‘‘डॉक्टर, डॉक्टर मला आत्महत्या करायची आहे!!’’

……….