मलावरोधाला करा ‘बाय बाय’

0
12
  • डॉ. मनाली महेश पवार

मलावरोधामधील आहारीय, विहारीय व मानसिक कारणे समजल्यानंतर आपल्याला कोणत्या कारणांनी मलावरोधाचा त्रास होतो हे स्पष्ट होते. मग या कारणांचा परित्याग करणे किंवा ती टाळण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पन्नास टक्के आजार आपण इथेच बरा करतो.

मलावरोधामधील आहारीय, विहारीय व मानसिक कारणे समजल्यानंतर आपल्याला कोणत्या कारणांनी मलावरोधाचा त्रास होतो हे स्पष्ट होते. मग या कारणांचा परित्याग करणे किंवा ती टाळण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पन्नास टक्के आजार आपण इथेच बरा करतो. मग योग्य आहार व व्यायाम आणि त्याचबरोबर तज्ज्ञ वैद्याच्या सहाय्याने काही औषधोपचार घेतले म्हणजे अपचन, मलावरोधाचा त्रास शंभर टक्के बरा करता येतो. आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास जर तुमचे ‘गट-फिलिंग’ उत्तम आहे तर तुम्ही निरोगी व आनंदी आहात.

मलावरोध म्हणजे काय?
पोटातील अन्न मोठ्या आतड्यात सरकते. त्यातील टाकाऊ घटक व मळ काही प्रमाणात पाणी शोषून घेतल्यामुळे गुदद्वारापर्यंत पोचतो तेव्हा तो मऊ आणि विसर्जनास योग्य झालेला असतो. हेच पाणी मोठे आतडे शोषून घेते तेव्हा किंवा स्नायूंचे आकुंचन व्यवस्थित होत नाही तेव्हा मलाचे खडे होतात. हे खडे आतड्यात साचून राहतात. त्यामुळे मल पुढे सरकण्यात अडचण निर्माण होते. मलप्रवृत्ती समाधानकारक न होणे म्हणजे मलावरोध.
पूर्वीच्या काळात मलप्रवृत्तीच्या संवेदनेने जाग यायची. अपचनाचा, मलावरोधाचा त्रास होत नसे. कारण लवकर झोपणे व लवकर उठणे (वाताच्या काळात) व्हायचे. आजच्या व्यस्त जीवनपद्धतीमुळे ‘गट-हेल्थ’चा त्रास बालपणापासूनच सुरू होतो. आज काही लोक सांगतात की, मला सकाळी उठल्या-उठल्या ‘शी’ होते किंवा दिवसातून तीन-चार वेळा ‘शी’ होते. म्हणजे आपलं पोट साफ किंवा ‘गट-हेल्थ’ चांगलं आहे असं म्हणता येणार नाही. कारण ‘शी’ किंवा संडास कशा प्रकारचा होतो हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

समाधानकारक मलप्रवृत्ती कशी असावी?
समाधानकारक मलप्रवृत्ती म्हणजे ‘शी’ ही स्वरूपित, सॉसेज किंवा सापासारखी असावी. ती खंडित नसावी. मुलायम असावी. विनासायास सहज व्हावी. कधीकधी सॉसेजसारखी ‘शी’ होते, पण काही वेळा खंडित स्वरूपात होते. अशी ‘शी’ आपण समाधानकारक म्हणू शकतो.

मलावरोधामधील ‘शी’ कशी असते?
आपला आहार हा जास्त प्रमाणात शाकाहारी म्हणजे भाज्या, कडधान्ययुक्त असतो. मांसाहार रोज व खूप प्रमाणात खाल्ला जात नाही. त्यामुळे दररोज संडासला सगळ्यांनाच होते, पण याचा अर्थ मलावरोध नाही असा होत नाही. कारण बऱ्याच जणांना भरभरून, पसरलेली व जी तरंगते अशी ‘शी’ होते व त्यांना वाटते ‘हा! हा!! आज मस्त पोट साफ झाले!’ ती खरे म्हणजे समाधानकारक ‘शी’ नसते. ज्यांच्या आहारात फॅट जास्त प्रमाणात असतं, तेल- तूप- बेकरी प्रॉडक्टस्‌‍- फरसाण- तळलेले पदार्थ जास्त खातात, त्यांना अशा प्रकारची ‘शी’ होते. त्याचप्रमाणे सागरगोट्यासारखी होणारी ‘शी’ किंवा बकरीच्या लेंढ्यासारखी होणारी ‘शी’ म्हणजे मलावरोधात होणारी. ही ‘शी’ बऱ्याच वेळा आहारात फायबर कमी असल्याने किंवा पाणी कमी पिल्याने किंवा अतिप्रमाणात तिखट खाण्याने व कोरड्या हवामानात होते. तर घट्ट संडासातून रक्त पडणारी मलप्रवृत्ती होणे म्हणजे मलावरोध नव्हे. त्यामुळे मलावरोध समजून घेताना आपल्याला होणारी मलप्रवृत्ती कोणत्या प्रकारची आहे हे समजणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण अशा प्रकारची होणारी मलप्रवृत्ती योग्य चिकित्सा न घेतल्यास पुढे मोठ्या आजारांना कारणीभूत होऊ शकते.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे मलावरोधाचे दोन प्रकार आढळतात. वातप्रधान व वातकफप्रधान.

  • मलावरोधामध्ये मुख्य बिघडणारा दोष म्हणजे वात दोष (अपान वायू).
  • वातप्रधान मलावष्टंभामध्ये मलप्रवृत्ती शुष्क, ग्रंथीत असून वेदना असतात. गॅस असतो. कुंथल्यानंतरच ‘शी’ होते.
  • वातकफप्रधान मलावष्टंभामध्ये मल हा निश्चिल व शिथिल असतो, तरीही फार कुंथावे लागते. ओटीपोटी जड भासते, भूक कमी लागते, तोंडाला दुर्गंधी येते, सारखे थुंकावेसे वाटते अशा प्रकारची लक्षणे आढळतात.

मलावरोधातील सामान्य लक्षणे

  • पोटात गॅस होणे, मलप्रवृत्तीच्या वेळी कुंथावे लागणे, पुन्हा पुन्हा मलप्रवृत्ती होणे, मलप्रवृत्ती सकष्ट, शिथिल किंवा ग्रंथिल होणे, अपचन, पोटात दुखणे, आंबट ढेकर, छातीत जळजळ, डोकेदुखी, झोप न येणे, झोपेत फार स्वप्ने पडणे, उत्साह कमी होणे, आळस वाढणे, चिडचिड होणे अशी लक्षणे आढळतात.

मलावरोधामध्ये काय काळजी घ्याल?

  • योग्य आहार आणि व्यायाम हे मलावरोधामध्ये खूप महत्त्वाचे आहे.
  • खूप प्रमाणात पाणी पिऊ नये. सकाळी उठल्यावर एक पेला गरम पाणी शक्य असल्यास दोन लिंबाचे थेंब टाकून घोट-घोट प्यावे. तहान लागेल तेव्हा पाणी प्यावे. जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावे. जेवल्यावर लगेच भरपूर पाणी पिऊ नये.
  • भूक लागलेली नसताना भरपूर खाऊ नये, तसेच भूक लागलेली असताना उपाशी राहू नये. भरपूर किंवा अगदी कमी खाऊ नये. भूक लागल्यावर वेळेवर अन्न सेवन करावे. यात तीन भाग अन्न-पाणी व एक भाग अवकाश (खाली) ठेवावा.
  • अजीर्ण असता खाऊ-पिऊ नये.
  • आहारात भरपूर फायबर असलेले अन्न सेवन करा. चोथा निर्माण करणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या. उदा. दोडका, भोपळा, पडवळ, शेवग्याच्या शेंगा, घोसाळी, तोंडलीसारख्या भाज्या आहारात असाव्या.
  • ऋतुमानाप्रमाणे पिकणारी फळे सेवन करा. सफरचंद, पपई, केळी, चिकू इत्यादी.
  • गाजर, काकडी, मुळा, बीट, राजगिरा सेवन करा.
  • मुरमुरे, लाह्या, फुटाणे, गूळ-शेंगदाणे यांचेही सेवन करा.
  • गहू, तांदूळ, ज्वारी, नाचणीसारखे धान्य कोंड्यासकट आहारात वापरा. डाळी पॉलिश केलेल्या सेवन करू नका.
  • आहार म्हणजे अन्न व्यवस्थित शिजवलेले सेवन करावे. कच्चे, अर्धवट शिजलेले, शिळे अन्न सेवन करू नका.
  • सकाळचे अन्न षड्रसात्मक, सकस असावे. सूर्याची उष्णता व आपल्या जठरातील अग्नी असे अन्न सहज पचवू शकतो.
  • रात्री शक्यतो लवकर जेवा व पचायला हलका असा आहार घ्या. रात्री दही खाऊ नका. जास्त तळलेले किंवा मिठायांसारखे गोड पदार्थ टाळा.
  • जेव्हा जेव्हा लघवी, संडास, गॅस, ढेकर यांचे नॅचरल कॉल्स येतात तेव्हा ते अडवू नका किंवा बळात उदीरणही करू नका.
  • रात्री जागरण करू नका. दिवसा झोपू नका. दिवसा जेवल्यावर लगेच झोपण्याने खाल्लेले अन्न आमाशयात तसेच पडून राहते किंवा अन्न पचनाची गती मंदावते. आम निर्मिती होते व हा आमरस अनेक आजार निर्माण करतो. शास्त्राप्रमाणे सकाळी लवकर साधारण 9-10 च्या सुमारास जेवावे व संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान जेवावे म्हणजे पचन व्यवस्थित होते व योग्यवेळी झोप लागते. मुलांची शाळा 9-10 वाजेपर्यंत सकाळी सुरू केल्यास मुलं व्यवस्थित प्रातःविधी आटोपून, सकाळी जेवून शाळेत जाऊ शकतात व संध्याकाळी घरी गेल्यावर सूर्यास्ताच्या वेळेवर रात्रीचे जेवण सेवन करू शकतात. अशाप्रकारे आपण आज मुलांचे गट-हेल्थ सांभाळू शकतो. यात एक शिस्त लागेल. मुलं लवकर झोपणार- लवकर उठणार. दिवसाला दोनच वेळा पूर्ण आहार सेवन करणार. उगाच अरबट-चरबट खाण्याला थोडातरी आळा बसणार. फास्ट फूड, जंक फूड, बाहेरचं खाणं असं काही मात्रेत तरी कमी होणार.

आहारावरच आपलं आरोग्य अवलंबून आहे. त्यामुळे आहार हा योग्य मात्रेत, योग्य वेळी, सकस व ऋतुमानाप्रमाणे असावा.
त्याचप्रमाणे द्वेष, मत्सर, क्रोध, भीती, शोक, दैन्यसारख्या मानसिक भावनांना व्यायाम, योगसाधनांद्वारे जिंकता आले पाहिजे. चालण्याचा व्यायाम, सूर्यनमस्कार, काही योगासने, ध्यान, नामस्मरण, संतांची संगत, मनन, चिंतन, आपली आध्यात्मिक प्रगती यानेच आरोग्य टिकवता येते.