मलबद्धता आणि होमिओ उपाय

0
519
  • डॉ. आरती दिनकर

(होमिओपॅथी तज्ज्ञ व समुपदेशक, पणजी)

 

मलबद्धता किंवा शौचास साफ नसणे हा साधा वाटणारा रोग अनेक कारणांनी उद्भवतो. पचन विकार, व्यायामाचा अभाव, एकाच ठिकाणी बसून राहणे,  पाणी फार कमी पिणे, दूध, तूप किंवा मांस, अति तिखट तळलेले खाणे आणि पालेभाज्या, फळ भाज्या, पण तूंतुजन्य युक्त फळे कमी खाणे.

 

महेश नावाचे एक ४८ वर्षीय ग्रहस्थ, त्यांना शौचाला साफ होत नाही याची तक्रार घेऊन माझ्या क्लिनिकमध्ये आले. तेव्हा त्यांच्या सांगण्यावरून त्यांना  शौचास साफ होत नसल्यामुळे अत्यंत त्रास होत आहे हे जाणवत होते. त्यांना हा त्रास अनेक वर्षापासून आहे, शौचास जोर लावला तर त्याठिकाणी भयंकर वेदना होतात, तेथे कात्रा पडतात. त्यासाठी अनेक रेचक औषधे, काढे, काही पावडरी असे उपचार सुरू केले पण यामुळे तात्पुरता गुण येई. म्हणून यावर काहीतरी कायमचा उपाय करावा त्यासाठी ते माझ्याकडे होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेण्यासाठी आले.

होमिओपॅथीच्या तत्वानुसार मी त्यांची केस हिस्ट्री घेतली तेव्हा मला असे जाणवले की, ते एका कार्यालयात कामाला आहे, त्यामुळे दिवसभर तिथे बसूनच राहावे लागते. त्याशिवाय ते पाणी फार कमी प्यायचे मात्र दूध, तूप,  मांसाहार, तिखट पदार्थ जास्त खायचे. त्यामानाने व्यायाम कमी तसेच वेळी-अवेळी चमचमीत पदार्थ खाणे यामुळे त्यांना शौचास साफ होत नसे. त्यामुळे ते अस्वस्थ व्हायचे ते म्हणाले, की जेव्हा शौचाला जातो त्यावेळेस आवेग येतो पण शौच बाहेर येत नाही ही संवेदना अत्यंत त्रासदायक आहे. यामुळे दिवसभर मी बेचैन असतो. असे झाले की मग मी एक रेचक घेतो त्याने पोट साफ होते तर कधीकधी पातळ जुलाब ही होतात पण हे त्या दिवसापुरतंच परत दोन- दोन तीन- तीन दिवसांनी मला शौचाला होत नाही म्हणून मग परत ही रेचक औषधे घेतो… असं हे चक्र सुरू आहे.

आजच्या बदललेल्या जीवनशैलीत आपल्या पचनशक्तीवर पर्यायाने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम झालेला दिसून येतो. महेशला मी योग्य ते नेमके होमिओपॅथीचे औषध दिले. बरोबरीने त्यांना व्यायाम करण्यास, पाणी भरपूर पिण्यास व मांसाहार, तिखट पदार्थ कमी खाण्यास सांगितले. सुरुवातीला त्यांना शौचास लवकर होईना. याचे कारण आधी घेतलेल्या औषधांचा परिणाम! पण जसजशी औषधांची मात्रा वाढवली त्यांना गुण येऊ लागला. नंतर त्यांना सहजपणे शौचास साफ होऊ लागले.

शौचास साफ नसणे यामुळे बहुतेकदा अनेक रोगलक्षणे उद्भवतात पण काही पेशंट हे गांभीर्याने घेत नाहीत.

मलबद्धता किंवा शौचास साफ नसणे हा साधा वाटणारा रोग अनेक कारणांनी उद्भवतो. पचन विकार, व्यायामाचा अभाव, एकाच ठिकाणी बसून राहणे,  पाणी फार कमी पिणे, दूध, तूप किंवा मांस, अति तिखट तळलेले खाणे आणि पालेभाज्या, फळ भाज्या, पण तूंतुजन्य युक्त फळे कमी खाणे. कोंडा काढून टाकलेल्या अन्नाचे सेवन करणे, शौचास लागली तरी ती रोखून धरण्याची सवय असणे. कोणत्याही कारणांनी उत्पन्न झालेला अशक्तपणा व म्हातारपण या रोगाची कारणे आहेत.

या रोगाचे मुख्य लक्षण असे आहे की शौचास थोडी होणे व ती झाल्यावरही पोट साफ झाले नाही, समाधान होत नाही असे रोग्यास वाटत असते. काहींना तर दररोज न होता तीन-चार आठ किंवा पंधरा दिवसांनी देखील शौचास साफ होते. कोणा कोणास आळीपाळीने मलबद्धता किंवा जुलाब होतात, तर काहींना  खड्याप्रमाणे कडक शौचास होते व मोठ्या कष्टाने हे शौच बाहेर पडते. शौचास साफ न झाल्यामुळे डोके दुखते, भूक लागत नाही, गळल्यासारखे वाटते, कामाकडे लक्ष लागत नाही तर काहींना पाठीत कमरेत व मांड्यात दुखते. अनेकजणांना शौचास साफ नसल्यामुळे मुळव्याधीसारखे विकार जडतात. कित्येकांना यापैकी काहीच त्रास होत नाही पण शौच झालेलं असते पण समाधान होत नाही किंवा शौचास बराच वेळ लागणे एवढीच तक्रार असते

मला काही पेशंट विचारतात की मग आम्ही यासाठी काय करायला हवं तर मी सांगेन की वेळच्या वेळी ब्रेकफास्ट, जेवण करणे, ऋतुमानानुसार भाज्या,  फळे खाणे. विशेष म्हणजे शक्य होईल तेवढा व्यायाम करणे आजच्या काळात खूप महत्त्वाचे आहे. फास्ट फूड, जंक फूड, शीतपेये टाळावीत. शिवाय पाणी  भरपूर पिणे. मोठ्यांनी तीन लीटर, लहान मुलांनी दीड ते दोन लिटर पाणी जरूर प्यावे.

लहान मुलांना बरेचदा परसाकडे लागली तरी ती रोखून धरण्याची सवय असते, लहान मुले पाणीही त्यामानाने कमी पितात. त्यांना पाणी पिण्याचा कंटाळा आल्यास लिंबाचे सरबत, आमसुलाचे सरबत किंवा आवळ्याचे सरबत द्यावे जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये कोरडेपणा येणार नाही

लहान मुलांनी या चांगल्या सवयी आत्मसात करून त्याप्रमाणे आपली दिनचर्या ठरवावी म्हणजे मोठेपणी त्यांना आरोग्याचा त्रास होणार नाही. यासाठी पालकांनी लक्षपूर्वक मुलांच्या वेळच्यावेळी खाण्याकडे लक्ष द्यावे. त्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून द्यावे.

लहान मुलांना मलबद्धतेचा खूप त्रास होतो. त्यांच्यासाठी होमिओपॅथीची औषधे रामबाण उपाय आहेत.

बाळंतपणानंतरही काही स्त्रियांना शौचाचा त्रास होतो, त्यांच्यासाठी होमिओपॅथीची औषधे उपयुक्त आहेत

अर्थात होमिओपॅथीची औषधे कोणत्याही वयाच्या स्त्रीस अगर पुरुषास उपयुक्त ठरतात. फक्त योग्य होमिओपॅथिक तज्ज्ञाकडे जाऊनच ही औषधे घ्यावीत.