केंद्र सरकारच्या आदेशानुसार १४ सप्टेंबरपासून पहिले ३ एलपीजी सिलिंडर रु. ४१८/- तर नंतरचे रु. ९११/- प्रमाणे वितरित होणार असल्याचे अखिल भारतीय एल.पी.जी. डिस्ट्रीब्युटर्स महासंघाच्या गोवा शाखेने जाहीर केले. वेर्णा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संघटनेचे प्रमुख सिद्धार्थ पलंग म्हणाले की, केंद्र सरकारच्या निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यानुसार आता सिलिंडरची ऑनलाईनद्वारे नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. त्याशिवाय सिलिंडर मिळणे शक्य नाही. प्रत्येक ग्राहकाला ३१ ऑक्टोबरपर्यंत कस्टमर इन्फोर्मेशन डेटा शिट अर्ज भरून द्यावा लागणार आहे. तसेच एकपेक्षा अधिक जोडण्या एकाच घरात ठेवता येणार नाहीत. एक सिलिंडर संपल्यानंतर दुसर्या सिलिंडरसाठी किमान २१ दिवसपर्यंत थांबावे लागणार आहे, असे पलंग यांनी सांगितले. यावेळी कुणाल धारगळकर, प्रदीप प्रभुदेसाई, श्रीराम वळवईकर व इतर उपस्थित होते.