गोव्यातील राजभाषेचा प्रश्न संपुष्टात आला आहे या मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या वक्तव्यास मराठी राज्यभाषा आंदोलनचे निमंत्रक प्रदीप घाडी आमोणकर यांनी आक्षेप घेतला असून त्यांची मगो कार्यकर्त्यांनी अध्यक्षपदावरून उचलबांगडी करावी, अशी मागणी काल केली.
पक्षाच्या कार्यकारिणीच्या काही सदस्यांनी मराठी राजभाषा करण्यासाठी पक्ष प्रयत्न करणार असे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते, असे सांगून कार्यकर्त्यांनी मगोला ढवळीकरांच्या मगरमिठीतून सोडवावे, असे आवाहन आमोणकर यांनी केले आहे. ढवळीकर यांनी मगो सोडून भाजपमध्ये सामील व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. आपण अजूनही मगोचे सदस्य आहोत. मराठी हा पक्षाचा आत्मा आहे, असे ते म्हणाले.
आपण सार्वजनिक जीवनातून बरीच वर्षे अलिप्त होतो. ढवळीकर यांच्या मराठीबाबतच्या विधानामुळे आपण मराठीला राज्यभाषा करण्यासाठी पुन्हा रणांगणात उतरल्याचे गो. रा. ढवळीकर यांनी सांगितले. प्रवक्ते अजितसिंह राणे यांनी ढवळीकर यांनी मगो संघटना बरखास्त करावी, अशी मागणी केली. गोवा महाराष्ट्रात विलीन करणे व मराठीला राज्यभाषा करणे यासाठीच मगोची स्थापना झाली होती. महाराष्ट्रात विलीन करण्याचा मुद्दा त्यांच्या पक्षाच्या हातातून निसटला, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस पणजीचे माजी महापौर अशोक नाईक उपस्थित होते.