मराठी राजभाषेसाठी विधानसभेवर मोर्चा काढणार

0
12

मराठी राजभाषा निर्धार समितीने केले स्पष्ट; 31 ऑगस्टला 5 हजार लोक मोर्चात सहभागी होणार

आगामी पावसाळी अधिवेशनात मराठी ही गोव्याची राजभाषा व्हावी यासाठीचे विधेयक गोवा विधानसभेत मांडण्यात यावे, अशी मराठी राजभाषा निर्धार समितीची मागणी असून, त्या मागणीसाठी 31 ऑगस्ट रोजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोवा विधानसभेवर 5 हजार लोकांचा मोर्चा नेण्यात येणार असल्याची माहिती मराठी राजभाषा निर्धार समितीचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या अधिवेशनात वरील ठराव आणला जावा, या मागणीसाठी मराठी राजभाषा निर्धार समितीच्या नेत्यांनी राज्यातील 33 आमदारांची भेट घेण्याचा निर्णय घेतला असून, आतापर्यंत 5-6 आमदारांची भेट घेतली असल्याचे वेलिंगकर यांनी सांगितले. मराठी भाषेच्या समर्थनार्थ राज्यातील 3 लाख लोकांच्या सह्या गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत अडीच लाख लोकांच्या सह्या घेण्यात आल्या असून, सह्यांची संख्या 3 लाखांवर गेल्यानंतर या सह्यांसह मराठी ही गोव्याची राजभाषा केली जावी, अशी मागणी करणारे एक निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देणार असल्याची माहिती वेलिंगकर यांनी दिली.

यावेळी बोलताना गो. रा. ढवळीकर हे म्हणाले की, एखाद्या प्रदेशात एखादी भाषा जर मोठ्या प्रमाणात बोलली अथवा लिहिली जात असेल व त्यांना ती त्या प्रदेशाची मातृभाषा व्हावी असे वाटत असेल तर राष्ट्रपती घटनेतील कलम 370 नुसार ती भाषा त्या प्रदेशाची मातृभाषा केली जावी, असा आदेश देऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. गोव्यात लिहिण्यासाठी मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे ढवळीकर हे यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना गोविंद देव हे म्हणाले की, मागच्या विधानसभा अधिवेशनापूर्वी आम्ही राज्यातील 30 आमदारांची भेट घेऊन त्यांना विधानसभेत मराठी राजभाषेसाठीचा ठराव आणण्याची मागणी केली होती. मात्र, त्यापैकी कुणीही आमची मागणी पूर्ण केली नाही.
यावेळी बोलताना डॉ. अनिता तिळवे या म्हणाल्या की, बऱ्याच काळापासून मराठी ही राजभाषा व्हावी अशी मागणी करीत आहोत. त्यासाठी कित्येक ठिकाणी, मेळावे व जाहीर सभा घेण्यात आल्या. त्याशिवाय 6 प्रखंडांत मराठी सद्भावना मिलन कार्यक्रम झाले. आता लवकरच आणखी 10 प्रखंडांत मराठी सद्भावना मिलन कार्यक्रम होणार आहेत.
या पत्रकार परिषदेला दिवाकर शिंक्रे, अशोक नाईक, संदीप पाळणी, नितीन फळदेसाई, विनायक च्यारी व ॲड. रोशन सामंत ही मराठी राजभाषा निर्धार समितीची नेते मंडळीही उपस्थित होती.

मोर्चाला कुठून होणार सुरुवात?
31 ऑगस्ट रोजी गोवा विधानसभेवर 5 हजार मराठीप्रेमींचा मोर्चा काढण्यात येणार असून, त्या दिवशी सकळी 9.30 वाजता मराठीप्रेमींनी पणजी कदंब बसस्थानकासमोरील नव्या पुलाच्या वाहतूक बेटाजवळ एकत्र यावे, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीने केले आहे.

विधेयक आणा; नाहीतर भाजप सरकार पाडू
राज्यातील भाजप सरकारने जर येत्या अधिवेशनात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी विधानसभेत विधेयक आणले नाही तर पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात मतदान करून मराठीप्रेमी भाजप सरकारचा पाडाव करतील, असा इशाराही यावेळी गो. रा. ढवळीकर व सुभाष वेलिंगकर यांनी दिला.