मराठी राजभाषेसाठी तालुका समित्यांची स्थापना करणार

0
17

समितीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांची माहिती; आंदोलनाच्या दिशा निश्चितीसाठी सुकाणू समिती कार्यरत

मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे येत्या तीन महिन्यांत तालुका पातळीवर बैठका घेऊन तालुका समित्यांची स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी काल दिली.
पणजीत आयोजित मराठी राजभाषा निर्धार मेळाव्याला भरघोस प्रतिसाद लाभल्याने आता, समितीने मराठीला हक्काचे स्थान मिळवून देण्यासाठी कार्याचा गती देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी तीन महिन्यांत तालुका पातळीवर बैठका घेऊन तालुका समित्यांची स्थापना करून कार्याला आणखी गती दिली जाणार आहे, अशी माहिती वेलिंगकर यांनी दिली.

राज्यात मराठी राजभाषा आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी 26 सदस्यांची सुकाणू समिती कार्यरत आहे. या समितीमध्ये राज्यातील विविध भागांतील प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सुकाणू समितीमध्ये गो. रा. ढवळीकर, प्रा. सुभाष वेलिंगकर, गुरुदास सावळ, प्रदीप घाडी आमोणकर, प्रकाश भगत, अनुराधा मोघे, डॉ. अनुजा जोशी, मच्छिंद्र च्यारी, प्रा. गजानन मांद्रेकर, प्रा. प्रवीण नेसवणकर, संदीप पाळणी, भारत बागकर, नरेंद्र आजगावकर, गोविंद देव, नारायण महाले, ॲड. शिवाजी देसाई, विनय नाईक, परेश पणशीकर, डॉ. मधु घोडकिरेकर, नितीन फळदेसाई, संतोष धारगळकर, प्रमोद कारापूरकर, सूर्यकांत गावस, विजय नाईक, रामदास सावईवेरेकर, ॲड. रोशन सामंत यांचा समावेश आहे.

मराठी राजभाषा निर्धार समितीने आयोजित मेळाव्याला लाभलेल्या प्रतिसादाची अनेकांनी धास्ती घेतली आहे. सोमवारी झालेल्या निर्धार मेळाव्याला मराठीप्रेमींची मोठ्या संख्येने हजेरी लाभली होती. तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी मराठी राजभाषेसाठी हा निर्णायक लढा असल्याचे आपल्या भाषणांतून स्पष्ट केले होते. राज्यात आगामी काळात मराठी राजभाषा आंदोलन पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काल भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीतही मराठी निर्धार मेळाव्याच्या विषयावर चर्चा झाली.