विष्णू वाघ यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, भाजपाने विधानसभा निवडणुकीत मराठी राजभाषा करण्याचे दिलेले आश्वासन पाळायला हवे. मी या आंदोलनात सक्रीयपणे उतरणार आहे व येत्या विधानसभा अधिवेशनात मराठी राज्यभाषेचा ठरावही मांडणार आहे, त्यावेळी विरोधातले कोण आमदार असतील तेही कळेल.
आमदार सावळ म्हणाले, मराठी राज्यभाषा ही व्हायलाच हवी आणि त्यासाठी कायदा हातात घेण्याची पाळी आली तर तेही करू. मराठी राजभाषा चळवळीत झोकून देऊन कार्य केलेले ज्ञानेश्वरीचे व्यासंगी विद्वान व गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक, प्राचार्य गोपाळराव मयेकर यांनी आवाहन केले, की आम्ही मराठी आंदोलनात झिजलो. सनदशिर मार्गाने मराठी राज्यभाषेची मागणी पुढे नेली. आता डोळे मिटण्यापूर्वी पर्रीकर सरकारने मराठी राजभाषेचे स्थान देवून आमचे स्वप्न पूर्ण करावे.
आंदोलनात स्वातंत्र्य सैनिक गजानन रायकर, भैय्या देसाई यांच्यासह आंदोलनाचे निमंत्रक प्रदीप घाडी आमोणकर, प्रवक्ते ऍड. अजितसिंह राणे, राजेंद्र कडकडे, रमेश नाईक आदींचाही सहभाग होता.

