मराठी राजभाषा आंदोलनासाठीचे विभागीय मेळावे 26 एप्रिलपासून मांद्रे येथून सुरू होणार आहेत. 27 एप्रिल रोजी वाळपई आणि 29 एप्रिल रोजी शिरोडा येथे मेळावा होणार आहे, अशी माहिती मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी दिली आहे.
मांद्रे येथील मेळावा श्री भगवती मंदिराजवळील जिल्हा पंचायत सभागृहात संध्याकाळी 5.30 वाजता होईल. मराठी राजभाषा आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असल्याने श्री भगवती मंदिरात देवीचे दर्शन, आशीर्वाद व गाऱ्हाणे घालून मेळाव्याची सुरुवात होईल. यावेळी स्थानिक समिती निवडण्यात येणार आहे.
एप्रिल, मे व जून अशा तीन महिन्यांत आंदोलनाची व्यापकता वाढवण्यासाठी गोव्याची विभागणी करण्यात आलेल्या 18 विभागांत मेळावे घेऊन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.
सत्तरी विभागाचा मेळावा दि. 27 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता वाळपईतील गोविंद काणेकर सभागृहात होणार आहे. शिरोडा येथे श्री रवळनाथ सभागृहात मंगळवार दि. 29 रोजी संध्याकाळी 5 वाजता मराठीप्रेमींचा मेळावा होईल.