मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचे काल निधन झाले. वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील वृद्धाश्रमात यास्मिन शेख यांचे निधन झाले. जेरुषा रुबेन असे त्यांचे मूळ नाव होते. त्या जन्माने ज्यू धर्मीय होत्या. अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलले होते; मात्र धर्म बदलला नव्हता. त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत.
प्रा. यास्मिन शेख या मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका आणि शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 21 जून 1925 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव जेरुषा रुबेन होते. त्यांच्या वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे बालपणापासूनच त्यांना विविध ठिकाणी राहण्याची संधी मिळाली आणि शिक्षणाची गोडी निर्माण झाली. त्यांनी पुण्यातील एस.पी. कॉलेजमधून बी.ए. केले. मराठी विषयात त्यांची विशेष गुणवत्ता होती. प्रा. एस. एम. माटे आणि प्रा. के. एन. वातवे यांसारख्या शिक्षकांचा त्यांच्या भाषाविषयक जडणघडणीवर प्रभाव पडला. पुढे त्यांनी एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले. मराठी लेखन मार्गदर्शिका, मराठी शब्दलेखन कोश आणि सुगम मराठी व्याकरण कोश अशी महत्त्वाची पुस्तके त्यांनी लिहिली.

