
मराठी पत्रकारितेला बाळशास्त्री जांभेकरांपासून ते गोमंतकातील भारतकार गो. पु. हेगडे देसाई यांच्यापर्यंतचा वारसा आहे. या काळातील पत्रकारिता ही ध्येयनिष्ठ पत्रकारिता होती. पत्रकारिता हा वेळेच्या पलीकडचा व्यवसाय असून स्वतःला झोकून देण्याची आणि उत्साहाने भारलेली वृत्ती असेल तरच पत्रकारितेत उज्ज्वल भविष्य आहे, असे प्रतिपादन दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू यांनी केले. धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या भारतीय भाषा विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी पत्रकारिता या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. प्रभू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय भाषा विभागाच्या प्रमुख प्रा. अंजू साखरदांडे, प्रा. सुहास गोडसे, अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. जयप्रभू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला श्री. प्रभू यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रा. साखरदांडे यांनी स्वागत केले. प्रा. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गोडसे यांनी या अभ्यासक्रमाचे महत्त्व विषद केले. सूत्रसंचालन प्रा. संपदा नवाथे यांनी केले. प्रा. विनय बापट यांनी आभार मानले.
धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या भारतीय भाषा विभागातर्फे ‘मराठी पत्रकारिता’ या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमात बातमी, बातमीचे बीट, संपादन, मराठी पत्रकारितेचा इतिहास, फीचर्स, ले आऊट, परीक्षण, मुलाखत आदी बाबी विचारात घेऊन पत्रकारितेतील जाणकारांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना १००० रु. प्रवेश फी असून ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी प्रा. कांबळे (८३९०४८८४७४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
