– विष्णू सूर्या वाघ
विष्णुदास भावे यांचे आख्यानबाज नाटक १८४३ साली रंगभूमीवर आले. अण्णासाहेब किर्लोस्करांचे ‘शाकुंतल’ मंचावर अवतरले १८८० साली. या मधल्या काळात मराठी नाट्यलेखन होत नव्हते असे नाही. कितीतरी पाश्चात्त्य नाटकांची भाषांतरे मराठीत होऊ लागली होती. महादेवशास्त्री कोल्हटकर यांनी शेक्सपीयरच्या ‘ऑथेल्लो’ या नाटकाचे केलेले भाषांतर हे मराठीतील पहिले महत्त्वाचे भाषांतर. आ. वि. पाटकर यांनी ‘स्त्री- न्याय चातुर्य’ या नावाने ‘मर्चंट ऑफ व्हेनीस’चा मराठी अवतार साहित्यक्षेत्रात आणला. इंग्लिश थिएटरवरचा ‘ज्युलियस सीझर’ आपणाकडे ‘विजयसिंग’ (अनुवादक बा. गो. नातू) होऊन अवतीर्ण झाला. या भाषांतरित पुस्तकांच्या जोडीने मूळ संस्कृत नाटकांपासून प्रेरणा घेऊन मराठीत येणार्या पुस्तकांची संख्याही तशी कमी नव्हतीच.
अण्णासाहेब किर्लोस्करांची सर्वच नाटके ही पौराणिक होती. त्यामुळे त्यांच्या मूळ प्रेरणा आपल्याच मातीतल्या होत्या.
श्रीकृष्ण, सुभद्रा, बलराम, रुक्मिणी या पात्रांना तर त्यांनी शंभर टक्के मराठी बनवून टाकले होते. इंग्रजी नाटक मराठीत रुपांतरित करून रंगभूमीवर आणणारे पहिले महत्त्वाचे नाटककार गोविंद बल्लाळ देवल. देवलांची तब्बल सहा नाटके रूपांतरित आहेत. (‘शारदा’ वगळता). थॉमस सदर्न याच्या ‘द फेटल गॅरेज’वरून त्यांनी ‘दुर्गा’ हे नाटक लिहिले. पण त्याचे कथाबीज पश्चिमेकडचे असल्यामुळे हे नाटक प्रेक्षकांनी स्वीकारले नाही. शेक्सपीयरचा ‘ऑथेल्लो’ त्यांनी ‘झुंजारराव’च्या वेषात आणला व त्याला मराठी वळण देण्याचा प्रयत्न केला. पण खर्या अर्थाने पाश्चात्त्य नाटकाची उसनवारी करूनदेखील देवलांनी ‘मराठीपण’ साधले ते ‘संशयकल्लोळ’ या नाटकात. फ्रेंच नाटककार मोल्टोर याच्या ‘गानारेल’ नाटकावरून मर्फी या नाटककारानं ‘ऑल इन दि रॉंग’ हे मराठी नाटक लिहिले होते. ते देवलांनी ‘तसबिरीचा घोटाळा’ अर्थात ‘संशयकल्लोळ’ या नावाने मराठीत आणले. हे नाटक खूप गाजले. आजही ते पाहत असताना कुणालाही हा संशयकल्लोळ परकीय नाटकातून उचलल्याची शंका येत नाही. उलट मराठीतील अभिजात नाटकांत त्याची गणना केली जाते.
नामवंत पत्रकार शिवराम महादेव परांजपे यांनी ‘मॅक्बेथ’चे कथाबीज घेऊन ‘मानाजीराव’ हे नाटक लिहिले होते, पण ते तग धरू शकले नाही. खाडिलकरांच्या ‘सवाई माधवरावांचा मृत्यू’ या नाटकात शेक्सपीयरच्या दोन व्यक्तिरेखा (हॅम्लेट व आयागो) एकत्र आणण्याचा प्रयोग झाला, असे बोलले जाते. पण खाडिलकरांनी जी कथावस्तू वापरली ती मात्र शंभर टक्के मराठी होती. त्यातले मराठीपण इतके जमले होते की हे नाटक आधारीत आहे असा आक्षेप त्यावेळी कुणीही या नाटकावर घेतला नाही.
नाटककार म्हणून राम गणेश गडकरी यांच्यावर व्यक्तिशः शेक्सपीयरच्या नाट्यलेखनाचा प्रभाव होता. पण गडकर्यांची नाट्यनिर्मिती मात्र या प्रभाववर्तुळाच्या बाहेर येऊन स्वयंप्रेरणेने झाल्याचे आढळते. रंगमंचावरील भाषेची ताकद काय असते याचे प्रत्यंतर गडकर्यांनी घडवले. तथापि, त्यांनी शेक्सपीयर वा इतर कुणाचीच ‘कॉपी’ करण्याचा प्रयत्न न केल्यामुळे त्यांची नाटके ही रसिकांना नेहमीच अस्सल वाटत राहिली. ‘एकच प्याला’, ‘पुण्यप्रभाव’, ‘भावबंधन’ ही नाटके पूर्णतया ‘मराठी’ आहेत.
मराठी रंगभूमीच्या पुनरुत्थानाच्या काळात झालेले ‘आंधळ्यांची शाळा’ (श्री. वि. वर्तक) हे नाटक बियर्सनच्या ‘ग्वांटलेट’ या नाटकाचेच रूपांतर होते. पण त्यातला प्रखर सामाजिक आशय वर्तकांनी मराठीत सौम्य केला.
इंग्रजीतील ‘चार्लीज आण्ट’ या नाटकावरून आचार्य अत्र्यांनी ‘मोरूची मावशी’ ही मराठमोळी कॉमेडी निर्माण केली. अत्र्यांच्या ‘घराबाहेर’ किंवा ‘जगाच्या पाठीवर’ या नाटकांवर इब्सेनच्या ‘डॉल्स हाऊस’चा जबरदस्त प्रभाव होता. अत्रे यांच्याखेरीज मामा वरेरकर, वर्तक, वा. वा. भोळे, ह. वि. देसाई, काणेकर अशा अनेकांवर इब्सेनचा प्रभाव पडला. पण हा प्रभाव पचवून मराठी मातीतलं नाटक निर्माण करण्याची ताकद जशी खाडिलकर, देवलांनी दाखवली तशी हे नाटककार दाखवू शकले नाहीत. दुसरी बाब अशी की पाश्चात्त्य रंगभूमीवर तिकडल्या सांस्कृतिक-सामाजिक साचेबंदपणाला छेद देणारे जे प्रयोग होत होते त्यापासून आपले नाटककार कोसो योजने दूरच राहिले. पाश्चात्त्यांची बंडखोरी आणि आपल्याकडचा सांस्कृतिक सोवळेपणा याच्या ओढाताणीत आपले नाटक त्रिशंकूप्रमाणे लटकत राहिले. अनंत काणेकर यांची नाट्यरचना परावलंबीच होती. ‘घरकुल’ हे नाटक ‘डॉल्स हाऊस’वरून तर ‘निशीकांताची नवरी’ हे ‘शी स्टूप्स टू कॉंकर’वरून बेतले होते. ना. धों. ताम्हणकर यांचे ‘उसना नवरा’ हे नाटक जॉनसनच्या ‘हर स्टेप हजबंड’ नाटकावरून उचलण्यात आले होते.
परकीय भाषेतील नाटकाचं मराठीत केलेलं रूपांतर किती अस्सल असू शकतं याचं उदाहरण म्हणजे शिरवाडकरांचं ‘नटसम्राट!’ आणि चांगल्या नाटकाचं रूपांतर मराठीत किती भिकार होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे शिरवाडकरांचंच ‘वैजयंती.’ मेटरलींकच्या ‘मोनाव्हना’वरून शिरवाडकरांनी ‘वैजयंती’ केले. पण त्यातील एकेका पात्राचे पानपानभर संवाद ऐकल्यानंतर हे नाटक आहे की नभोनाट्य असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. याउलट ‘नटसम्राट’चा अवतारच इतका सजीव व अस्सल होता की मराठी साहित्यविश्वातच हे नाटक म्हणजे एक अपूर्व कलाकृती गणली गेली.
पु. ल. देशपांडे यांची बरीचशी नाटके परकीय रंगभूमीचीच मराठी अपत्ये आहेत. त्यातल्या त्यात ‘जमलेली’ नाटके म्हणजे ‘तीन पैशांचा तमाशा’ (बर्टोल ब्रेश्ट- थ्री पेनी ऑपेरा) व ‘ती फुलराणी’ (बर्नाड शॉ- पिग्मॅलीयन). त्यांचे ‘अंमलदार’ काही केल्या ‘मराठी’ वाटत नाही. याउलट ब्रेश्टच्याच ‘धी कॉकेशियन चॉक सर्कल’वरून चि. त्र्यं. खानोलकरांनी केलेलं रूपांतर (अजब न्याय वर्तुळाचा) अधिक मराठमोळं वाटतं.
वसंत कानेटकर हे व्यावसायिक रंगभूमीवरील एक ‘चतुर’ नाटककार होते. प्राध्यापक असल्यामुळं त्यांचं वाचन अफाट होतं आणि उत्तम भाषाशैली व नाटकाच्या तंत्राची जाण असल्यामुळं परकीय भूमीतला विषय घेऊनसुद्धा त्यावर मराठी आवरण कसं चढवावं हे त्यांना चांगलंच ठावूक होतं. बेईमान (बॅकेट), गोष्ट जन्मांतरीची (आय हॅव बिन हिअर बिफोर), गगनभेदी (शेक्सपीयरच्या चार व्यक्तिरेखा) या नाटकांवरून हे ध्यानात येते. पण ही नाटके कानेटकरांच्या उत्कृष्ट नाटकांत गणली जात नाहीत हेदेखील तितकेच खरे.
रत्नाकर मतकरी यांनी नाट्यलेखनात काही वैशिष्ट्यपूर्ण ‘मराठमोळे’ प्रयोग केले. उदा. लोककथा ७८ व विठो रखुमाय. पण ‘ट्वेल्व अँग्री मॅन’ या नाटकावर बेतलेले ‘निखारे’ मात्र असा अनुभव देत नाही. त्यामानाने जयवंत दळवी यांची नाटके तुमच्या आमच्यातील माणसांची नाटके वाटतात. एका अर्थी मराठी नाटक ‘आपल्या घरातले’ वाटायला लावण्यात दळवींचा वाटा बराच मोठा आहे. ‘बॅरिस्टर’सारखे पाश्चात्त्य नाव व इंग्रजी शिकलेली व्यक्तिरेखा असलेले त्यांचे नाटक एकंदर वातावरणनिर्मितीमुळे पूर्णपणे मराठी वाटू लागते. गो. नी. दांडेकरांची ‘शितू’ ही नाट्यकृती ‘अस्सल प्रादेशिक’ म्हणावी अशा स्वरूपाची आहे. याउलट बाळ कोल्हटकर यांच्या नाटकातील सर्व व्यक्तिरेखा मराठी वाटत असल्या तरी त्यांच्या परंपराप्रिय, अतिनाटकी व्यवहारामुळे हा मराठीपणाही हास्यास्पद वाटू लागतो!
व्यंकटेश माडगूळकरांनी काही पाश्चात्त्य नाटकांना देशी टच् देण्याचा प्रयत्न केला. उदा. ‘बिकट वाट वहिवाट’ (फिडलर ऑन द रूफ), शं. ना. नवरे- ‘हवा अंधारा कवडसा’ (व्हू वूड सेव्ह द प्लवबॉय), माधव वाटवे- ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ (सिक्स कॅरेक्टर्स इन सर्च ऑफ एन ऑथर), आरती हवालदार- ‘चांगुणा’ (यर्मा), वसंत सबनीस- ‘नीळावंती’ (ब्ल्यू एंजल्स), विश्राम बेडेकर- ‘वाजे पाऊल आपुले’ (सेंड मी नो प्लॉवर्स), मंगेश पतकी- ‘राव जगदेवराव मार्तंड’ (सिरेनो), सरिता पदकी- ‘खून पाहावा करून’ (नॉट इन द बुक), पद्माकर गोवईकर- ‘प्रेषिताचे पाय मातीचे’ (सलोमी) अशी अनेक रूपांतरे मराठीत आली आहेत. राज्य नाट्यस्पर्धेत तर वर्षाकाळी कितीतरी परदेशी नाटकांवरून ढापलेली वा चोरलेली नाटके होत असतात. पण त्यांनी मराठी रंगभूमीच्या विकासात फार ‘क्रांतिकारी’ असे योगदान केल्याचे दिसत नाही.
श्री. ना. पेंडसे हे मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार. पण कादंबरीवरून त्यांनीच रूपांतरित केलेल्या नाटकांच्या बाबतीत मात्र ही प्रादेशिकता दृष्टोत्पत्तीस येत नाही. शिवाय पेंडशांचे नाट्यलेखनाचे तंत्र खूपच ढिसाळ व पसरट आहे. अभिव्यक्तीचे जे स्वातंत्र्य पेंडशांनी कादंबरीत घेतले ते सोयीच्या व्यवहारवादाला बळी पडून त्यांनी नाटकात घालवले. ‘महापूर’, ‘पंडित आता तरी शहाणे व्हा’, ‘राजे मास्तर’, ‘चक्रव्यूह’ अशी नाटके फसली, ती या सपकपणामुळेच.
मराठी नाटकाला ‘मराठीपण’ सर्वाधिक प्रमाणात देणारे नाटककार म्हणजे विजय तेंडुलकर. तेंडुलकर आणि त्यांचे लेखन माणसाच्या जगण्याशी घट्ट बांधले गेले आहे. त्यांची नाटके मुख्यतः मध्यमवर्गीय माणसाची आहेत. त्याचे प्रश्न, त्याची सुख-दुःखे, त्याची स्वप्ने व त्याचा भंग, त्याच्यावर होणारे परिस्थितीचे आघात व त्यासंबंधी होणारी त्याची प्रतिक्रिया यातून तेंडुलकरांची नाटके घडतात. त्यामुळे ती अस्सल वाटतात. (‘सखाराम बाईंडर’, ‘माणूस नावाचे बेट’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘घाशीराम कोतवाल’ इ.) यामुळेच तेंडुलकरांच्या नाटकांना भारतातील बहुतेक इतर भाषांत रूपांतरित होण्याचे भाग्य लाभले आहे.
संख्येच्या दृष्टीने सुरेश खरे यांनी खूप नाटके लिहिली, पण त्यातली फारच थोडी ‘मराठी’ म्हणता येतील अशी आहेत. प्र. ल. मयेकर हेसुद्धा असेच बहुप्रसवा नाटककार. पण त्यांच्या नाटकातले ‘मराठीपण’ ओढूनताणून आणलेले वाटते. ‘अथ मनुस जगन हं’, ‘मा अस् साबरीन्’ ही त्यांची सुरुवातीची नाटके पाश्चात्त्य पार्श्वभूमीवरच रचलेली आहेत. पण व्यावसायिक रंगभूमीवर आलेले ‘अग्निपंख’ हे त्यांचे पहिलेच नाटक फार भडक स्वरूपाचे होते. वास्तविक मयेकर हे बहुजनसमाजातून उदयाला आलेले नाटककार. पण त्यांचे ‘अग्निपंख’ दाखवते कर्मठ ब्राह्मणी कुटुंबामधील अर्थहीन संघर्ष. ‘रातराणी’ या नाटकातही एका वेगळ्याच वातावरणाचा आधार मयेकरांनी घेतला आहे. ‘पांडगो इलो रे बा इलो’ या नाटकात कोकणी माणसाचे इरसालपण दाखवण्याची नामी संधी त्यांना मिळाली होती, पण तिचा नीट उपयोग त्यांनी केल्याचे दिसत नाही. एकूणच मयेकर हे तसे प्रतिभावंत, पण व्यावसायिकतेच्या चौकटीत त्यांची प्रतिभा कोंडल्यासारखी वाटते.
तेंडुलकर यांच्यानंतर ‘मराठी’ नाटकाला राष्ट्रीय पातळीवर पोचवण्याचे काम केले महेश एलकुंचवार यांनी. ‘वाडा चिरेबंदी’, ‘आत्मकथा’, ‘पार्टी’, ‘प्रतिबिंब’, ‘वासनाकांड’ या त्यांच्या नाटकांतून मानवी अनुभवांचा दाहक, रसरशीत प्रत्यय येतो. एलकुंचवारांच्या नाटकाबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे पण तूर्त एवढेच लक्षात ठेवू की एलकुंचवार व्यावसायिक रंगभूमीची सध्याची चौकट तशी उचकटून फेकू शकले नाहीत. पण मराठी नाटकाचा प्रवाह मात्र त्यांनी निश्चितच पुढे नेला. एलकुंचवारांचे नाटक यामुळे प्रेक्षकांपासून दूर राहिले पण समीक्षकांच्या अधिक जवळ गेले. त्यामानाने सतीश आळेकर हे आधुनिक असूनदेखील आत्मशोधाच्या पातळीवर लेखन व अभिव्यक्तीतून मराठीपण जपताना दिसतात. उदा. ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’, ‘दुसरा सामना’, ‘महापूर’ इ. नाटके. याच प्रवाहातील ‘मातीचा नाटककार’ म्हणून गणले गेलेले चि. त्र्यं. खानोलकर यांची नाट्यरचना पहा. आशय व तंत्राच्या दृष्टिकोनातून तिची मांडणी पूर्णपणे आपल्या सांस्कृतिक जाणिवांशी तादात्म्य पावणारी आहे.
मराठी नाटकात ‘मराठीपण’ किती?
आपले आजचे मराठी नाटक प्रायः पश्चिमेकडून आले असे मी मघाशी म्हटले. आजच्या मराठी साहित्याविषयीही असेच म्हणता येईल. वास्तविक आपली साहित्यपरंपरा ही स्वयंभूच आहे. ज्ञानेश्वर आणि तुकाराम, नामदेव हे आपले कवी कुणाचेही अनुकरण करायला गेले नाहीत. ओल मिळाल्यानंतर बीजांतून अंकुर फुटावा त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कारानंतर त्यांची कविता आतून फुटली. आपले आजचे लेखक-कवी मात्र ही परंपरा विसरून पश्चिमेच्या मातीत आपली मुळे शोधायचा प्रयत्न करतात. मराठी नाटकाच्या बाबतीतही असेच काही झाले आहे. नाटकाची आपली परंपरा आपण विसरलो आणि पश्चिमेच्या नादाला लागलो. आपले नाटक परोपजीवी झाले. किर्लोस्करांपासून रांगणेकरांपर्यंत जुन्या पिढीचे जे नाटककार झाले त्यांचे नाटक मराठी माणसाविषयी होते. त्या नाटकातील जीवन मराठी होते. त्यातली जीवनमूल्ये आपली होती. त्यांच्या नाटकात उणिवा भरपूर होत्या, पण प्रेरणा पाश्चात्त्य असली तरी धारणा मात्र देशी होती.
पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात नाट्यलेखनाचे जे अनेक प्रयोग पाश्चात्त्य देशांत झाले त्यानं आमचे अनेक नाटककार भारावून गेले. रियलीझम, नॅचरलीझम, सिंबॉलिझम, एक्झीशियेलीयझम, ऍब्सर्डीझम असे नवनवीन वाद आमच्या नाटककारांना आकर्षित करू लागले. पिरांदेली, स्ट्रिन्डबर्ग, ओनील, ब्रेश्त, बेकेट, सार्त्र, कामू, आयनेस्को, टेनेसी विल्यम्स ही नावे घेताक्षणी नाटककारांना आपली दैवते समोर उभी राहिल्याचा भास होऊ लागला.
गेल्या पन्नास वर्षांत रंगभूमीवर आलेली बहुतेक नाटके ही पाश्चात्त्य नाटकांवर बेतलेली अथवा त्यापासून प्रेरणा घेऊन लिहिलेली आहेत. हल्लीचा काळ तर अधिक भयानक आहे. निर्माते लेखक व दिग्दर्शकाला सोबत घेऊन बसतात. हॉलिवूडमधील एखाद्या गाजलेल्या चित्रपटाची सीडी बघतात व ‘या जर्मवर नाटक लिहून द्या’ अशी मागणी करतात. लेखकही त्यांची इच्छा पूर्ण करतो आणि पाश्चात्त्य रंगभूमीचा स्कर्ट काढून तिला साडी नेसवतो. पुन्हा हे सगळे अत्यंत निर्लज्जपणे केले जाते.
पाश्चात्त्य नाटकांच्या संदर्भात महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांचे वाचक आणि प्रेक्षक नावीन्याचे भोक्ते आहेत. कोणतीही गोष्ट त्यांना फार काळ आवडत नाही. त्यांना सतत काहीतरी नवीन हवं असतं. ते नावीन्याचं स्वागत करतात. नवीन गोष्टी काही काळ डोक्यावर घेऊन नाचतात आणि वेगळी नवी गोष्ट पुढे आली की आधीची फेकून देतात. भारतीय समाजमन याहून निराळे आहे. जुने आहे ते टिकवून ठेवण्याची आपली परंपरा आहे. जे परंपरेने येते त्यात मूलभूत बदल करणे आपल्याला मान्यच होत नाही. आपल्या अभिजात कला, आपले शास्त्रीय संगीत, आपले लोकवादन, लोकवेद, कथकली- भरतनाट्यम्- कुचिपुडीसारखी नृत्ये, यक्षगानसारखे प्रकार यांचा मूळ गाभा (या कलाप्रकारांचे सादरीकरण संक्षेपित झाले तरीही) अद्याप टिकून आहे. मग साहजिकच प्रश्न असा येतो की जे आपणाला या कलांच्या बाबतीत शक्य झाले ते नाट्यकलेच्या बाबतीत का शक्य झाले नाही? शेक्सपीयर तेवढा मोठा?
कुठल्याही संस्कृतीकडून जे चांगले आहे ते घेण्यात काहीच वाईट नाही. पण ही कलमे आपल्या साहित्यावर लावताना आपल्याच जमिनीपासून आपली मुळे सुटत नाहीत ना हे पाहणेही महत्त्वाचे आहे. मराठीत चांगली नाटके नाहीत असे कोण म्हणेल? मात्र, अभिजात नाटकांची उणीव आहे हे तरी कसं अमान्य करणार?
शेवटी नाटक हे नाटकच आहे. ते रंजनासाठीही असते व उद्बोधनासाठीही असते. आजच्या एकूणच साहित्याचा कल माणसाला अंतर्मुख करण्याचा, विचारप्रवृत्त करण्याचा आहे. मग आमचं नाटकही तसंच का असू नये?
साहित्याशी संबंधित असलेल्या कुठल्याही प्रांतात महत्त्वाच्या असतात त्या समाजाच्या आदिम प्रेरणा. या प्रेरणाच आपली अस्मिता आणि आत्मभान घडवत असतात. शेक्सपीयरबद्दल आपण एवढं बोलतो पण व्यासांबद्दल बोलत नाही. माझ्या मते महाभारत हे संपूर्ण जगात अद्वितीय ठरावं असं महानाट्य आहे. महाभारताची रचना पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. या एका महानाट्यात हजारो नाटके दडलेली आहेत. गेल्या कितीतरी वर्षांत या नाट्यबीजांनी लेखकांना प्रेरणा दिली व देत राहतील. मराठीतील बहुतेक ‘महान’ नाटककारांची आजही लक्षात उरणारी नाटके महाभारतावरून स्फुरलेली आहेत. उदा. ‘सौभद्र’, ‘स्वयंवर’, सं. ‘द्रौपदी’, मामा वरेरकरांचं ‘कुंजविहारी’, खाडीलकरांचं ‘कीचकवध’, शिरवाडकरांचं ‘ययाती आणि देवयानी’, कानेटकरांचं ‘मत्स्यगंधा’, मतकरींचं ‘आरण्यक’, विद्याधर पुंडलिकांचं ‘माता द्रौपदी’ या नाटकांची नावं वानगीदाखल घेता येतील.

