26 C
Panjim
Tuesday, October 27, 2020

मराठी झेंडा

भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून मनोज मुकुंद नरवणे हे ५९ वर्षीय कर्तबगार मराठी अधिकारी येत्या एक जानेवारीला सूत्रे स्वीकारणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणार्‍या एका सेनानीच्या हाती देशाच्या लष्करप्रमुखपदाची मानाची सूत्रे जात आहेत ही एक गौरवशाली बाब आहे. दहशतवादविरोधी मोहिमांचा गाढा अनुभव असलेल्या नरवणे यांच्यासारख्या एका कर्तबगार अधिकार्‍याला त्यांच्या ज्येष्ठताक्रमानुसारच हा सन्मान मिळाला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर ज्येष्ठताक्रमातून प्रमुखांची निवड न करता कार्यक्षमतेचा व कर्तबगारीचा निकष लावला जात होता. नरवणे यांचा ज्येष्ठताक्रम विचारात घेतानाच त्यांची कर्तबगारीही विचारात घेतली गेली आहे आणि या दोन्ही अंगांनी ते या पदाला पात्र ठरले आहेत. त्यामुळे यापूर्वी प्रवीण बक्षींसारख्या अधिकार्‍याला डावलून ज्या प्रकारे बिपीन रावत यांना आणले गेले, किंवा नौदलप्रमुखपदी बिमल वर्मांना डावलून ज्या प्रमाणे करमबीर सिंग यांना आणले गेले तसे यावेळी घडलेले नाही. नरवणे हे यापूर्वी लष्कराच्या पूर्वी कमांडचे प्रमुख होते. त्यामुळे चीनच्या कुरापतखोरीशी ते चांगलेच परिचित आहेत. चीनला हाताळण्यासाठी त्यांच्या या आजवरच्या अनुभवाचा उपयोग सरकारला होऊ शकेल. त्यांना लष्करप्रमुख पदासाठी जेमतेम २८ महिन्यांचाच कार्यकाळ लाभणार आहे. म्हणजे एप्रिल २०२२ मध्ये ते निवृत्त होतील. परंतु हा अल्प काळही त्यांच्यासाठी लष्करप्रमुख या नात्याने मोठा आव्हानकारक असेल. एक तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व सत्तारूढ आहे. पाकिस्तान आणि दहशतवाद या दोन्ही आघाड्यांवर कोणतीही दयामाया न दाखवता खमके प्रत्युत्तर द्यायचे ही मोदी सरकारची नीती बनलेली आहे. त्यामुळे अशा सरकारचे प्रतिनिधित्व प्रत्यक्ष रणमैदानावर करण्याची मोठी जबाबदारी नरवणे यांच्यावर असेल. खरे तर तिन्ही सेनादलांचे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ किंवा सीडीएस हे एक संयुक्त प्रमुख पद निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून केलेली आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोबाल यांच्या नेतृत्वाखाली एक समितीही नियुक्त केली होती. या समितीने आपला अहवालही दिलेला आहे. त्यामुळे सध्या सेवानिवृत्त होणारे जनरल बिपीन रावत यांना सीडीएसपदी आणले जाऊ शकते. सीडीएसचे पद हे तिन्ही सेनादलांमध्ये समन्वयासाठी आहे. परंतु लष्करप्रमुखपदाचे महत्त्व त्यामुळे कमी होत नाही. भारतीय सेनेला आज आधुनिकीकरणाची प्रतीक्षा आहे. अनेक खरेदी व्यवहार निधीच्या चणचणीमुळे रखडलेले आहेत. सैन्यदलांसाठी मुक्रर केली जाणारी बरीचशी रक्कम महसुली खर्चावरच खर्ची पडते असे दिसते आहे. विशेषतः वेतन आणि निवृत्ती वेतन यावरच बराचसा पैसा खर्च होत असतो. त्यामुळे आधुनिक शस्त्रास्त्र खरेदीसाठी पुरेसा पैसा नसल्याने त्याचा फटका सैन्यदलांना बसत असतो. गेल्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण खात्यासाठी ४.३ लाख कोटी दिले गेले, परंतु त्यापैकी केवळ तेरा टक्के रक्कम ही नव्या शस्रास्त्रखरेदीसाठी वापरली जाऊ शकली असे आकडेवारी सांगते. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. पाकिस्तान आणि चीन यांची सततची कुरापतखोरी आणि दहशतवादाचे वाढते बळ लक्षात घेता युद्धनीतीच्या अद्ययावतीकरणाची आणि शस्त्रास्त्रांच्या आधुनिकीकरणाची आज आत्यंतिक आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारकडून अधिक निधी मिळवून त्याचा अधिक प्रभावी विनियोग करणे हे नरवणे यांच्यापुढील आव्हान असणार आहे. भारतीय लष्कराला अत्याधुनिक शस्त्रसामुग्रीची वर्षानुवर्षे प्रतीक्षा राहिली आहे. प्रत्यक्ष मैदानावर बाह्य आणि अंतर्गत शत्रूशी लढण्यासाठी अधिक सामर्थ्य त्यांना मिळवून देण्याची जबाबदारी नव्या लष्करप्रमुखांवर असेल. आज जागतिक पातळीवर युद्धाच्या स्वरूपात आमूलाग्र बदल घडत चालले आहेत. नवनवी आधुनिक व तंत्रज्ञानाधारित साधने वापरली जाऊ लागली आहेत. अशा वेळी भारतीय सेनाही तितकीच अत्याधुनिक होणे गरजेचे असेल. सैन्यदलांच्या पुनर्रचनेची घोषणा सरकारने यापूर्वी केली होती. त्या दिशेने प्रयत्नही सुरू झालेले आहेत. लष्कर अधिक सामर्थ्यवान आणि अधिक वेगवान हालचाली करणारे व्हावे या दृष्टीने त्याची पुनर्रचना गरजेचीच आहे. सीडीएसच्या निर्मितीनंतर तर तिन्ही दलांमध्ये अधिक समन्वय निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी लष्कर लवचिक बनणे जरूरी असेल. भारताच्या दोन्ही सीमांवर शत्रू अधिकाधिक पाश आवळत चालला आहे. त्यामुळे त्याचा मुकाबला हे भविष्यातील मोठे आव्हान असणार आहे. दहशतवादही अधिक भयावह रूपात समोर येऊ शकतो. लवकरच नवे सर्वंकष राष्ट्रीय सुरक्षा धोरण आखले जाईल. तिन्ही सैन्यदलांमध्ये अधिक समन्वयाने देशाच्या शत्रूचा मुकाबला करण्याची अपेक्षा सरकारद्वारा बाळगली जाईल. त्यासाठी सैन्यदलाला सक्षम आणि सज्ज करण्याचे आव्हान नरवणे यांच्यापुढे असेल. एक कर्तबगार मराठी अधिकारी या नात्याने ते हे आव्हान यशस्वीपणे पार पाडतील अशी अपेक्षा करूया!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

कोरोनामुक्तीनंतर घ्यावयाची काळजी …

डॉ. मनाली म. पवार कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही प्रभावी लस, औषध किंवा उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे...

स्तनांचे आजार भाग – १

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) लोकांच्या बेजबाबदारपणा, गैरसमज, अंधविश्वासामुळे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान असूनदेखील कर्करोगाचे निदान प्राथमिक टप्प्यात...

चला, शक्तीसंपन्न होऊया कोरोनाला हरवुया

योगसाधना - ४७८अंतरंग योग - ६३ डॉ. सीताकांत घाणेकर विसर्जनामागे तत्त्वज्ञान व आध्यात्मिक अर्थ म्हणजे...

अतिचंचल बालकांना सांभाळताना…

डॉ. प्रदीप महाजन ३७ आठवड्यांच्या आधी झालेला जन्म, जन्मवेळेचे कमी वजन, गर्भावस्थेत वा नवजात अर्भकाच्या मेंदूला झालेली दुखापत,...

राजकीय आव्हान

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड किंवा अन्य कोणाशीही हातमिळवणी न करता आगामी गोवा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश...

ALSO IN THIS SECTION

राजकीय आव्हान

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड किंवा अन्य कोणाशीही हातमिळवणी न करता आगामी गोवा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश...

प्लाझ्मा थेरपी हवीच

कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये अगदी सुरवातीपासून नवप्रभा अग्रेसर राहिला आहे. भले कोणी त्याला ‘कोविड योद्धा’ म्हटले नसेल, परंतु पावलोपावली गोमंतकीय जनतेच्या सुरक्षिततेसाठी सरकारला भानावर...

अपरिहार्य

गंभीर आर्थिक संकटाला सतत सामोरे जात असलेल्या राज्य सरकारने अखेर लाडली लक्ष्मी या आपल्या लोकप्रिय योजनेसाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपयांवरून...

वजाबाकी

आयआयटी प्रकल्पावरून झालेल्या आरोप - प्रत्यारोपांनंतर अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी राज्यातील डॉ. प्रमोद सावंत सरकारचा पाठिंबा काढून घेतला. अर्थात, सत्तावीस आमदारांचे...

पंतप्रधानांचा इशारा

पक्की खेत देखिके, गरब किया किसान | अजहूं झोला बहुत है, घर आवै तब जान ॥ हा कबिराचा दोहा उद्धृत करीत पंतप्रधान...