– दत्तगुरू आमोणकर
भारताच्या इतिहासात कोकण प्रांताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आर्यांच्या आगमनापूर्वीसुद्धा पश्चिम समुद्राच्या बंदरावर विदेशी जहाजे व तारवो व्यापारासाठी येत असत. गोमंतक अर्थात गोवा प्रदेश हा पूर्वी कोकणपट्टीचा भाग गणला जात असे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या याच समृद्ध किनारपट्टीवर परकीय राजकर्त्यांनी चढाया करून आपले स्वामित्व प्रस्थापित करण्याचा प्रयास अनेकवेळा केला याचा इतिहास साक्षी आहे.
सम्राट अशोकाच्या शासनकालावधीत तसेच महाभारतात कोकणचा ‘अपरान्त’ म्हणून उल्लेख केलेला आढळतो. तसा स्वतंत्र उल्लेख कवी श्यामीलकाच्या ‘पादताडिक’मध्ये आढळतो. याचा कालावधी चौथ्या शतकातील असावा. सप्तपाताळ म्हणून उल्लेखिला गेलेला प्रदेश तल, रसातल, पाताल इत्यादी समुद्राकाठचा कोकण प्रदेश असे तज्ज्ञांचे मत आहे. आरंभी नागकुळातील ‘कुंभळ’ या नागकुळाने राज्य स्थापन केल्यामुळे हा प्रदेश सप्तकुंकण– कोकण म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतर सातवाहन, मौर्य, वाकाटक, शक, राष्ट्रकुट, कलचुरी, कल्याणी चालुक्य, कदंब, शिलाहार, यादव यांच्या राजवटींनंतर अल्लाउद्दीन खिलजीने मुसलमानी सत्तेचा झेंडा कोकणात रोवला. यानंतर निजामशाही व आदिलशाही अंमल या प्रदेशावर प्रस्थापित झाला. पंधराव्या शतकात युरोपियनांच्या आगमनानंतर पुढील काळात मराठ्यांची आरमारी सत्ता प्रस्थापित झाली. याचे पूर्ण श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीला दिले पाहिजे. कारण आरमारी सामर्थ्याचे महत्त्व त्यांनी जाणले होते. जवळजवळ तेराव्या शतकापर्यंत म्हणजे यादव राजवटीपर्यंत उतरत्या कळेने का होईना, महाराष्ट्राला आरमार होते. सुलतानी सत्तांच्या आगमनाने महाराष्ट्राचा हा पश्चिम किनारा निस्त्राण झाला. याचा फायदा पोर्तुगीज, डच, इंग्रज व अरबांनी घेतला व आरमाराच्या जोरावर आपली सत्ता व व्यापार प्रस्थापित केला. ऍबिसिनिया येथील सिद्धी (हबशी) सुलतानांचे गुलाम म्हणून आले व नंतर मुरूड, जंजिरा येथे जलदुर्गावर ठाणी बांधून दर्यावर आपली सत्ता स्थापन केली.
या दुर्दैवी इतिहासावर मात करणारा अलौकिक पुरुष म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. अथांग सागरावर जो आपले अधिराज्य सिद्ध करील तोच बाजूच्या भूभागावर आपली सत्ता सुयोग्य प्रकारे प्रस्थापित करून रयतेस सक्षम सुरक्षितता देऊ शकेल अशी दूरदृष्टी बाळगून जलदुर्गांची उभारणी करून शिवरायांनी सागरीमार्गे होणार्या परकीयांच्या घुसखोरीस प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला.
दि. २४ ऑक्टोबर १६५७ या दिवशी शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी काबीज केली. तो दिवस होता धनत्रयोदशीचा. म्हणजेच खर्या अर्थाने ऐन दिवाळीतच हा अनोखा आरमारी दीपोत्सव करून त्यांनी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. पोर्तुगीज दफ्तरानुसार इ. स. १६५८ मध्ये शिवरायांचे आरमार अस्तित्वात आले. इ. स. १६५७ ते १६५९ च्या दरम्यान शिवरायांची वीस जहाजे तयार झाली. इ. स. १६८० पर्यंत त्यांच्या आरमाराची लक्षणीय वाढ होऊन ते एक सामर्थ्यशाली नाविकदल म्हणून ओळखले जाऊ लागले. याच आरमाराच्या जोरावर शिवाजी महाराजांना पोर्तुगीज व इंग्रजांवर बरेच नियंत्रण मिळवता आले व जंजिर्याच्या सिद्धीच्या कारवायांना प्रतिबंध घालून त्याच्या विस्तार महत्त्वाकांक्षेस पायबंद घालता येणे शक्य झाले.
किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी शिवाजी राजांनी सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग इत्यादी दुर्ग बांधले. कुलाबा, अंजनवेल, रत्नागिरी, विजयदुर्गा येथे कसबी सुतार व कारागीर आणून कल्याण, भिवंडी व पनवेल येथील जंगलातील चांगल्या लाकडांचा वापर करून लढाऊ जहाजे बांधण्यास सुरुवात केली. गुराब, तरांडी, गलबते, दुबारे, शिहाडे (शिबाडे), पगार, बाथोर, तिरकटी, पाल, मचवे अशा जातीच्या सुमारे चारपाचशे युद्धनौका तयार झाल्याने महाराजांच्या सागरी शत्रूंना चांगलीच दहशत बसली. दर्यासारंग हे मुसलमानी सुभेदार व मायनाक भंडारी हे हिंदू सुभेदार या आरमाराचे प्रमुख सरदार नेमून हे आरमार चांगल्या कुशल प्रमुखांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहील याची काळजी घेतली. महाराजांच्या आरमारात ‘बारकश’ (फरगाद) म्हणजे मोठी लढाऊ जहाजे नव्हती. याचे कारण म्हणजे, कोकणच्या उथळ व आतील किनारपट्टीत अशा मोठ्या युद्धनौकांना आत नेता येत नसे. यासाठी त्यांना लहान व जलद हालचाली करू शकणारी व वेळप्रसंग आल्यास उथळ पाण्याच्या भागात सुरक्षिततेसाठी आश्रय घेता येण्याजोगी जहाजे उपयुक्त ठरत असत. हाही त्यांच्या कुशल आरमारी युद्धनीतीचा व दूरदर्शीपणाचा भाग होता. आरमारी लढाईत भांडी (तोफा), जंबुरे (लहान तोफा), बंदुकी व टुक्के यांचा प्रामुख्याने वापर होई. इ. स. १६६५ ते १६७९ मध्ये फ्रिगेट्स श्रेणीच्या मोठ्या युद्धनौकाही बांधण्यास सुरुवात झाली. इ.स. १६७९ मध्ये महाराजांच्या जवळ ६६ मोठी लढाऊ गलबते होती असा उल्लेख सापडतो.
शिवाजी महाराजांच्या आरमारी मोहिमा
महाराजांनी बसरूरच्या स्वारीत स्वतः मराठी आरमाराचे नेतृत्व केले. ‘दर्यास पालाण राजियांनी घातले’ असे सभासदाने या स्वारीचे वर्णन लिहून ठेवले आहे. एकदा दंडराजपुरीवर महाराजांनी स्वतः ‘गुराब’ व होड्यांच्या आरमारासह चढाई केली परंतु ऐनवेळी समद्रात वादळ झाल्याने त्यांना माघार ह्यावी लागली. सिद्धी हा एक प्रबळ असा आरमारी शत्रू होता. शिवाजी राजांचे आरमाराने अनेकदा सिद्धीवर स्वारी करण्याचे प्रयत्न या ना त्या कारणाने फसले. परंतु सिद्धीच्या मराठी राज्यात लुटालुट करण्याच्या कारवायाना मात्र बर्याचअंशी आळा बसला. जंजिर्याची अभेद्य तटबंदी भेदता आली नाही हे एक शल्य महाराजांना शेवटपर्यंत बोचत राहिले.
पोर्तुगीज हे सागरावरील एक प्रबळ सामर्थ्यवान सत्ता होती. पोर्तुगालचा राजा हा सातासमुद्राचा धनी अशी पोर्तुगीजांची धारणा होती. त्यामुळे सागरावरून व्यापारउदीय करण्यास पोर्तुगाल राजाचा परवाना ‘कार्ताज’ घेण्याची आवश्यकता त्यावेळी सर्व व्यापारी व इतर गलबताना लागत असे. यातून खुद्द मोगल बादशहाचीही सुटका नसे. शिवाजीराजांच्या गलबतांनी सुद्धा ‘कार्ताज’ घेतले पाहिजे असा अट्टाहास पोर्तुगीजांनी धरला होता. त्यामुळे मराठी आरमार व पोर्तुगीज आरमार यांच्यातील संघर्ष अटळ बनला होता. त्यातूनच कुडाळ प्रांतातील वाडीचा सावंत व पेडणे, भतग्राम, सत्तर, मणेरी इत्यादी भागातील देसाई यांच्याशी पोर्तुगीज संधान बांधून होते व वेळोवेळी महाराजांविरुद्ध कटकारस्थाने करीत असा संशय महाराजांना होता. त्यातून पोर्तुगीजांची धार्मिक असहिष्णुता व गोव्यातील धर्मच्छलाच्या बातम्या महाराजांच्या कानावर येत होत्या. त्यामुळेच कदाचित शिवाजीराजे पोर्तुगीजांवर खार खाऊन होते व संधीची वाट पहात होते. पोर्तुगीजांच्या या आगळिका लक्षात घेऊन (इ. सन १६६७) नोव्हेंबर दि. १९ ते २० च्या रात्रौ) पाच हजार पायाळ व एक हजार घोडदळ घेऊन बारदेश व साष्टी प्रांतावर चाल करून पोर्तुगीजांना धडा शिकवला. त्यामुळे पोर्तुगीजांच्या स्वःसार्वभौमत्वाच्या कल्पनेला बरीच मुरड पडली. १० फेब्रुवारी, १६७० च्या तहानुसार पोर्तुगीजांनी धान्य, मीठ इत्यादी पदार्थ घेऊन जाणार्या महाराजांच्या होड्यांवर निर्बंध घातला जाणार नाही हे त्यानी मान्य केले. वास्तविक शिवाजीराजांना गोवा पोर्तुगीजांच्या जोखडापासून स्वराज्यात सामील करून घ्यायचे मनात होते. परंतु पोर्तुगीजांना नशिबाची साथ लाभली व गोवा त्यांच्या ताब्यात राहिला. एकदा तर नार्वे येथील सप्तकोटेश्वर देवस्थानच्या जिर्णोद्धाराचे कार्य आरंभून राजांनी पैलतडी गोवा राजधानीत आपली माणसे घुसवण्यास प्रारंभ केला होता. परंतु बातमी फुटली व व्हॉईसरॉयने महाराजांच्या वकीलाला बोलवून या सर्व माणसाना हद्दपार केले. मात्र पोर्तुगीजांच्या सागरी सत्तेला बराचसा प्रतिबंध महाराजांच्या लष्करी व आरमारी सामर्थ्यामुळे लागला.
इंग्रज–मराठे सागरी संघर्ष
इंग्रजाना आपल्या सागरी सामर्थ्याचा विलक्षण अभिमान होता. खांदेरी बेटावर महाराजांनी सागरी किल्ला बांधण्याचे ठरविताच बांधकामाच्या वेळी इंग्रजांनी ते बंद करण्यासाठी आपल्या आरमाराचा वापर केला. १९ सप्टेंबर १६७९ रोजी मराठ्यांची व इंग्रजांची एक आरमारी चकमक झाली. त्यात इंग्रजांचा पराभव झाला. त्यांच्या लेफ्टनंट फ्रान्सिस थोर्प याने खांदेरी बेटावर उतरण्याचा आततायी प्रयत्न केला त्यात तो इतर लोकांसह मारला गेला. नंतर मराठी आरमार दौलतखानच्या नेतृत्वाखाली चौलहन चाल करून गेले व त्यांच्यात चकमक घडली. यातच सिद्धीही महाराजांविरुद्ध खांदेरी लढ्यात इंग्रजांना सामील झाला. परंतु मराठ्यांच्या चिवट प्रतिकारामुळे इंग्रजानी सिद्धीची साथ सोडून महाराजांबरोबर संघर्ष करण्याचे टाळले व खांदेरी उंदेरी बेटावरचे महाराजांचे सार्वभौमत्व मान्य केले.
अशा या सुसज्ज व संपन्न आरमाराच्या जोरावर शिवाजी महाराजांनी कोकण व पश्चिम किनारपट्टीवर स्वराज्याची सागरी अधिसत्ता शून्यातून प्रस्थापित केली. खांदेरी– उंदेरीचे (इ.स. १६८०) इंग्रजांविरुद्धचे आरमारी युद्ध हे महाराजांच्या आयुष्यातील अखेरचे युद्ध. ज्यांनी पुढे सव्वाशे वर्षे भारतावर सार्वभौम सत्ता गाजवली, त्या इंग्रजांचा पहिला आरमारी पराभव करूनच महाराजांनी अखेरचा श्वास घेतला.
मराठ्यांच्या आरमारांचा पाया घालणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज हे यामुळेच मराठी आरमाराचे जनक म्हटल्यास वावगे ठरू नये.

