मराठी राजभाषा निर्धार समितीचा पणजीत प्रखंड मेळावा
भाजपने मराठी राजभाषा करू असे वचन देऊन फसविले आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री असताना सुरू केलेली योजना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या पाच वर्षांत बंद पाडली. प्रादेशिक भाषांतील शाळांना शशिकालाताईंच्या काळात असलेले अनुदान 2012 नंतर इंग्रजी शाळांना देण्याची खेळी खेळली गेली. त्यामुळे आता घरात बसून मराठी प्रेम न मिरवता आता मराठी साहित्यिक, प्रेमी यांनी सहकुटुंब, सहपरिवार लढ्यात उतरावे असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केले.
मराठी राजभाषा निर्धार समितीचा पणजी येथील 17 वा प्रखंड मेळावा रविवारी संस्कृती भवनमधील बहुद्देशीय सभागृहात पार पडला. त्यावेळी प्राचार्य वेलिंगकर बोलत होते. व्यासपीठावर समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, मराठीप्रेमी उद्योगपती अनिल खवटे, पणजी प्रखंड अध्यक्ष तथा माजी महापौर अशोक नाईक, रंगकर्मी देविदास आमोणकर, शाणुदास सावंत, माजी शिक्षणाधिकार तथा लेखक ज. अ. रेडकर, युवा प्रतिनिधी नेहा उपाध्ये व वेद आमोणकर, चित्रा क्षीरसागर, रामदास सावईवेरेकर उपस्थित होते.
श्री. ढवळीकर यांनी, गोव्याची ओळख कोकणी राहिली नसून कॅसिनो, ड्रग्स, दारू अशी झाली आहे. योगभूमी आज भोगभूमी बनली आहे. इंग्रजी संस्कृतीमुळे भोगवाद बळावला आहे. कोकणीच्या बरोबरीने मराठी राजभाषा केली असती तर दोन्ही भाषिक गुण्यागोविंदाने नांदले असते. माजी मुख्यमंत्री पर्रीकर व खासदार श्रीपाद नाईक यांनी पणजीत पत्रकार परिषद घेऊन मराठी राजभाषा करू असे आश्वासन दिले होते त्याला हरताळ फासला असल्याचे सांगितले.
अनिल खंवटे यांनी, मराठी भाषेशी आमची सांस्कृतिक नाळ जोडलेली आहे. पोर्तुगीज काळात सुद्धा मराठीने संस्कृतीचे रक्षण केले. आम्हाला मराठीचा अभिमान आहे. साहित्य, नाट्यकला, संगीत, शिक्षण या सर्व क्षेत्रात मराठीचा ठसा असून गोवा सरकारने मराठीला हक्काचे स्थान दिलेच पाहिजे अशी मागणी केली.
युवा कीर्तनकार नेहा उपाध्ये यांनी, मराठी आपल्या दैनंदिन जीवनात एकरूप झालेली आहे. गोव्यात मंदिरे, उत्सव, वर्धापनदिन यात प्रामुख्याने मराठी नाटके, संगीताचे कार्यक्रम होतात. आमची अभिव्यक्तीची भाषा मराठीच आहे. लग्न पत्रिका घ्या, आरत्या घ्या मराठीला पर्याय नसतो. मुलांना आई बाबा, दादा, ताई म्हणायला लाज वाटण्याची गरज नाही. मराठीचा जास्त वापर होईल तेवढी ती टिकेल, समृद्ध होईल असे सांगितले.
वेद आमोणकर याने, आमचा तथाकथित युवक बेजबाबदार, निष्काळजी, संवेदनशील बनला आहे. संस्कारांचा अभाव जाणवतो तेव्हा आपली संस्काराची भाषा कुठली याचा विचार त्यांनी करायला हवा. मराठी त्यादृष्टीने प्रगल्भ भाषा असल्याचे सांगितले. मराठी हा आमच्या संस्कृतीचा कणा आहे आणि तो मोडण्याचा प्रयत्न सरकारने करू नये असा इशारा दिला.
अशोक नाईक यांनी स्वागत क़ेले. समन्वयक मिलिंद कारखानीस यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. अनिल खवटे यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अश्विनी अभ्यंकर हिने स्तवन सादर केले. कौस्तुभ कारखानीस यांनी सूत्रसंचालन केले. चित्रा क्षीरसागर यांनी आभार मानले.
शेवटी सर्वांनी मराठी राजभाषा करण्याची शपथ म्हणून घेतली.

