मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
विधानसभा संकुलात मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळातर्फे निवेदन सादर
मराठी राजभाषा निर्धार समितीने काल मराठीला राजभाषा दर्जा देण्याच्या मागणीसाठी गोवा विधानसभेवर मोर्चा काढला. येथील जुन्या मांडवी पुलावर पोलिसांनी समितीचा मोर्चा अडविला. मात्र त्यानंतर मराठीप्रेमींनी तिथेच ठिय्या आंदोलन करत पुलावरील वाहतूक रोखली. यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. अखेर वाहतूक नव्या मांडवी पुलावरून वाळवावी लागली.
दरम्यान, मराठी राजभाषा निर्धार समितीच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पर्वरी येथे विधानसभा संकुलात दुपारी भेट घेऊन त्यांना मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी समितीच्या मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याच्या निवेदनावर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. आता, मोर्चा स्थगित केला जात आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक सुभाष वेलिंगकर यांनी पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना काल दिली.
अन्यथा वेगळी भूमिका ः वेलिंगकर
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा न दिल्यास वेगळी भूमिका द्यावी लागणार आहे, असे सुभाष वेलिंगकर यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्य सरकारला निवेदन सादर करताना राज्यातील मराठीप्रेमींची ताकद दाखविण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले. राज्य सरकारवर आता दबाव पडला नसला तरी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यत निश्चितच दबाव पडेल, असा विश्वास श्री. वेलिंगकर यांनी व्यक्त केला.
भाजपकडून अपेक्षा
राज्यातील मराठीप्रेमींच्या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत काही शंका होत्या. त्या शंकाचे निरसन करण्यात आले आहे. भाजप सरकार मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याकडे दुर्लक्ष करून वेगळी भूमिका घेत आहे. कॉँग्रेस पक्ष मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देईल अशी अपेक्षा नाही. तथापि, भाजपकडून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळेल असा विश्वास होता. पण, मराठीप्रेमींचा अपेक्षाभंग झालेला आहे. भाजपने सत्तेवर येण्यासाठी मराठीचा वापर केला. मात्र, सत्तेवर आल्यानंतर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यास वेळकाढू धोरण स्वीकारले आहे, असेही श्री. वेलिंगकर यांनी सांगितले.
राजभाषा निर्धार समितीकडून गेल्या सतरा महिन्यांपासून मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून सर्व आमदारांना निवेदने सादर करण्यात आली आहेत. तालुका पातळीवर मेळावे घेऊन जनजागृती केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी एक दबावगट निर्माण केला आहे. तथापि, मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने समितीने गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेवर मोर्चा काढला.
मांडवी पुलाजवळ ठिय्या
येथील कदंब बसस्थानाकाजवळ मराठीप्रेमी एकत्र झाले. जुन्या मांडवी पुलावरून मराठी प्रेमी नागरिक पर्वरीच्या दिशने जात असताना पोलिसांनी मांडवी पुलाजवळ मोर्चा अडविली. त्यामुळे मराठी प्रेमींनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची जोरदार मागणी करून घोषणाबाजी केली.
वाहतूक विस्कळीत
पणजीत मराठीप्रेमींच्या मोर्चामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. जुन्या मांडवी पुलावरील वाहतूक बंद झाल्याने सर्व वाहने नवीन मांडवी पुलावरून वळविण्यात आली. वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समितीच्या एका शिष्टमंडळाशी दुपारी चर्चा केली. समितीचे समन्वयक सुभाष वेलिंगकर यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देणारे निवेदन सादर केले. यावेळी गो. रा. ढवळीकर, डॉ. दत्ताराम देसाई व इतरांची उपस्थिती होती.

