– कॅजिटन परेरा, म्हापसा
मराठी भाषाप्रेमींची आंदोलने दरवेळी विश्वासघाताची बळी ठरली आहेत. सुरवातीला म. गो. पक्षाच्या कालखंडात मराठीला सुगीचे दिवस प्राप्त झाले होते. मराठी भाषा हे म. गो. चे प्रमुख ध्येय होते. परंतु निष्काळजीपणा व ‘आमची मराठी अमर आहे’ या भावनेपोटी होणार्या राजकारणाकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. जॅक सिक्वेरांच्या काळात वेगळे राज्य व कोकणी ही भाषा अशी चळवळ सुरू होती. तरीही संपूर्ण गोव्यात भाऊसाहेब बांदोडकरांचा दबदबा होता. दुर्दैवाने भाऊंचे आकस्मिक निधन झाले. त्या परिस्थितीचा फायदा दबा धरून बसलेल्या शणै गोंयबाब यांच्या भक्तांनी उठवला. इन मिन साडेतीन लोक, परंतु अत्यंत धूर्त व कावेबाज निघाले. राजकारणातील इरसालपणा त्यांच्या अंगी मुरलेला. त्यांनी बहुजन हिंदू समाजातील तरुणांना हाताशी पकडून कोकणी हीच या प्रदेशाची भाषा अशी चळवळ सुरू केली. युनायटेड गोवन्स पार्टी नेऊन धूर्तपणे कॉंग्रेसमध्ये सोडली. राष्ट्रीय प्रवाहात गोमंतकीय येत आहेत हा देखावा करून वेगळ्या अस्तित्वासाठी फासे टाकण्यास सुरवात केली.
ख्रिस्ती समाजाला गोवा महाराष्ट्रापासून परावृत्त करायचा असेल तर कोकणी भाषा मागण्याचा मंत्र दिला. बहुसंख्य ख्रिस्ती समाजाला कोकणीशिवाय काही एक बोलता येत नसे. त्यातच चर्चला आपल्या बाजूने वळविण्यात शणै गोंयबाबवाल्यांनी यश मिळवले. तरीही मराठीप्रेमी झोपून होते.
हातचे सर्व गेल्यावर मराठीप्रेमी चवताळले, परंतु तोपर्यंत महत्त्वाच्या घटना घडून गेल्या आणि कोकणी बोलीला भाषा म्हणून राजभाषेचा दर्जाही मंजूर करून घेतला. मराठीचा हा घात होता. मराठे लोकच घात करण्यात सर्वांत पुढे होते. आजही अकस्मात लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊन विश्वासघात करणारा पळपुटा उमेदवार निघाला. वाळपईच्याच दुसर्या राणेंनी मराठीप्रेमींना पुन्हा तोंडघशी आपटले.
गेल्या सहा महिन्यांत मराठी राजभाषा आंदोलनाने निषेध, मोर्चा, उपोषणे, पत्रके असे अनेक कार्यक्रम आखून मराठीप्रेमींना जागे केले होते. प्रदीप आमोणकर, अशोक घाडी, आनंद सावंत यांच्या बरोबरीने अशोक नाईक, राजन कडकडे आणि ऍड. अजितसिंह राणे यांनीही कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. वारंवार होणार्या बैठकांमध्ये त्यांची उपस्थिती मात्र थोडी असायची. ते साहजिकच होते.
म्हापसा येथील बैठकीमध्ये स्वातंत्र्यसैनिक भैय्या देसाई, प्रभाकर येंडे, श्याम कळंगुटकर, किशोर कोलगे आणि मी मराठी भाषेच्या आंदोलनाला लढाऊ रूप देण्यासाठी निवडणुकीमध्ये धडक मारणे गरजेचे आहे, हा आग्रह धरला. प्रदीप आमोणकर, अशोक घाडी यांची मान्यता मिळाली, परंतु अनेक वेळा बैठकीला गैरहजर राहिलेल्या अशोक नाईक, राजन कडकडे, ऍड.अजितसिंह राणे यांची अनुमती गृहित धरून लोकसभेच्या जागेसाठी रणजितसिंह राणे यांचे नाव जाहीर करण्यात आले.
शिवसेनेने व त्यानंतर सोशालिस्ट पार्टी ऑफ इंडियाने लगेच मान्यता देऊन पाठिंबा व्यक्त केला होता. त्यानुसार अर्ज भरून देण्यात आल्यावर अर्ज मागे घेण्याच्या आधल्या दिवशी राजन कडकडे, अशोक नाईक आणि अजितसिंह राणे यांनी दबावाचे घाणेरडे राजकारण करून रणजित राणे यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली. पुन्हा एकदा मराठीप्रेमींचा घात करण्यात आला. त्यामागे कोणत्या राजकीय शक्ती होत्या, की केवळ वैयक्तिक अहंकार होता हे काही काळाने स्पष्ट होईलच. कदाचित अन्य काही कारण असू शकेल.
ज्यांनी रणजितसिंह राणे यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली, त्यांना २५ मार्च रोजी उमेदवारीचा अर्ज स्वतः भरून ‘तू माघार घे, मी अर्ज भरला आहे’ असे म्हणता आले असते. परंतु दबाव आणलेल्या व्यक्तींनी निवडणूकच लढविण्यास आडवे जाण्याचा निश्चय केला असावा.
कोणी तरी मराठी राजभाषेसाठी या निवडणुकीला उभे राहणे आम्हा सर्व मराठीप्रेमींना हवे होते, परंतु ऍड. अजितसिंह राणे, अशोक नाईक, राजन कडकडे यांना निवडणूक लढविणे पसंत नव्हते, तर गुपचूप बसता आले असते. त्यांनी मराठी आंदोलनाचे मारेकरी होण्यात का बरे धन्यता मानली? स्वतः काही करायचे नाही आणि दुसर्यालाही काही करू द्यायचे नाही ही नीती यामागे होती का?
मराठीच्या चळवळीत १९८६ पासून भैय्या देसाई, किशोर कोलगे, प्रभाकर येंडे, श्याम कळंगुटकर आणि इतर काही व्यक्ती सदोदित भाग घेत. निमंत्रण नसतानाही मराठी प्रेमापोटी भाग घेत. पंचवीस सत्तावीस वर्षे हे असेच चालू आहे. प्रत्येक वेळी मराठीचा बिगूल वाजवणारे नेते कच खाताना आम्ही पाहिले आहेत. त्यावेळी आम्ही पंचेचाळीशीत होतो. आता सत्तरी ओलांडलेल्या आम्ही व्यक्ती. मराठी चळवळीचा खड्डा मराठीप्रेमीच दरवेळी खणताना पाहिल्याचे आम्ही साक्षीदार आहोत. तत्कालीन साक्षीदार वृत्तपत्र संपादक आणि कर्मचारीवर्ग आज नाही. आजच्या कार्यरत वृत्तपत्रलेखकांना आमची जिद्द आणि तळमळ समजणे कसे शक्य आहे? तरीही मराठी वृत्तपत्रांचा मराठी आंदोलनास पाठिंबा मिळतो आहे हाच एकमेव आधार उरला आहे.
स्व. जयसिंगराव राणे हे वाळपईच्या सोनाळ गावचे नामवंत स्वातंत्र्यसैनिक. पहिल्या विधानसभेमध्ये गजानन रायकर आणि वाळपईचे हेच जयसिंहराव राणे निवडून आले होते. जयसिंहरावांनी प्रयत्नपूर्वक मराठी भाषा व तिचे गोव्याशी नाते स्पष्ट करणारे पुस्तक लिहिले. अखेरच्या श्वासापर्यंत ते मराठीसाठी तळमळत राहिले. त्यांचे चिरंजीव रणजितसिंह राणे. काय म्हणावे या दैवगतीला? सर्व इतिहास आठवताना मराठ्यांनीच मराठीचा गळा चिरला. प्रतापसिंह राणे यांनी सत्तेची खुर्ची टिकावी म्हणून कोकणी बोलीला गोव्याची राजभाषा केले, आता रणजित राणे यांनी मराठीशी प्रतारणा केली. त्यासाठी मोठा पुढाकार ऍड. अजितसिंह राणे यांनी घेतला. याचा अर्थ तरी तपासून पाहूया!
तिन्ही राणेंनी मराठी भाषेचा घात केला. तिन्ही राणे सत्तरीचे. स्व. दीपाजी राणेंना काय यातना होत असतील!!!

