Home बातम्या मयेच्या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी सरकार वचनबद्ध : मुख्यमंत्री

मयेच्या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी सरकार वचनबद्ध : मुख्यमंत्री

0

मये स्थलांतरित मालमत्तेचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार वचनबद्ध असून कायदेशीर बाब असल्याने याबाबतचा सखोल अभ्यास करूनच हा प्रश्न यापुढे सोडवायचा असल्याने त्याला थोडा वेळ लागेल, परंतु हा प्रश्‍न नक्कीच सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी काल मये भूविमोचन समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

मये मुक्तीच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने गुरुवारपासून मयेच्या नागरिकांनी उपोषणाची घोषणा केली असून या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी मये भूविमोचन समितीचे अध्यक्ष काशिनाथ मयेकर, ऍड. अजितसिंह राणे, यशवंत कारबोटकर, स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर सिनारी, सखाराम पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. कायदा आयोगाने मसुदा तयार केलेला असून त्याला मान्यता देऊन हा प्रश्‍न निकालात काढण्याची मागणी समितीने केली होती, मात्र काहीच हालचाल न झाल्याचे सांगताच, मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले. मात्र, समितीने गुरुवारपासून उपोषण सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले.