ऍड. खलपांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कायदा आयोगाचे माजी अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना एक पत्र लिहून मयेंचा मुद्दा टप्प्या टप्प्याने कसा सोडवता येईल, ते सदर पत्रातून नमूद केले आहे.
सर्वांत प्रथम सगळी मालमत्ता सरकारच्या नावे करावी, ग्रामस्थांची जी घरे आहेत ती पुढील टप्प्यात त्यांच्या नावावर करावीत, तिसर्या टप्प्यात शेती करणार्यांच्या नावावर शेती करावी, कॉंदेचे जे वारसदार आहेत व ज्यांची घरे आहेत व जे शेती करत आहेत ती त्यांच्या नावे करावी, नंतर विद्यालये, मैदाने, प्रार्थनास्थळे आदींसाठी जमिनीची व्यवस्था करावी. कॉंदे-द-मयेंचे जे हक्काचे वारसदार आहेत त्यांना त्यांची नुकसान भरपाई द्यावी, हे सर्व केल्यानंतर जी शिल्लक जमीन राहील ती मयेंच्या भावी पिढ्यांसाठी राखून ठेवावी.
अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने मयेंचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदा करावा लागणार असल्याचे खलप यांनी पत्रातून नमूद केले आहे. लोकांना घरे व शेती यासाठी जमीन देण्यासाठी जमीन महसूल कायदा १९६८ यातील तरतुदी पुरेशा असल्याचे खलप यांनी म्हटले आहे. मयें हे एक आदर्श गाव बनवण्यासाठी नगर आणि नियोजन कायद्यातील तरतुदींनुसार योजना तयार करणे शक्य असल्याचे खलप यांनी नमूद केले आहे.
येत्या २६ जानेवारीपर्यंत ते करणे शक्य असल्याचे खलप यांनी सदर पत्रातून स्पष्ट केले आहे.

