27.6 C
Panjim
Wednesday, May 19, 2021

मयूरमन

आयुष्य हे…

  • गिरिजा मुरगोडी

प्रत्येकाला स्वतःचा अवकाश तर हवा असतो. पण त्या अवकाशातच एक छोटासा कोपरा अशा संवादाचा असतो. खुल्या दिलानं त्याचं स्वागत करता आलं तर अनेक अनुभूतींचा वेध अधिक वस्तुनिष्ठपणं घेणं, त्यांचे सुसंगत अन्वयार्थ लावणं शक्य होतं, सुकर होतं.

रोजच्या धकाधकीतून कधीतरी निवांतपणा लाभतो… असा आणि इतका की सगळ्या कोलाहलापासून दूर होऊन मन स्वतःपाशी पोहोचतं. साहजिकच आयुष्यातल्या अनेक अनुभवांचं कटू-गोडपण, अर्थ-अनर्थ आसपास गोळा होऊ लागतात. आता थोडंसं दूर होऊन त्या अनुभवांकडं पाहता येऊ लागलेलं असतं. कारण एक तर तो-तो टप्पा, तो-तो समय आता निघून गेलेला असतो. त्याचे बरे-वाईट परिणामही अनुभवून झालेले असतात. शिवाय आपणही एकेक टप्पा पार करत आता अशा ठिकाणी पोचलेलो असतो की काहीशा भयस्थपणे न्याहाळत, अधिक समंजसपणे त्याकडं पाहाणं शक्य होऊ लागलेलं असतं.
खरं तर माणूस वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या संदर्भांसह वेगवेगळ्या प्रकारे जगत असतो. प्रत्येक स्तरावर त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमतांचा कस लागत असतो.
कौटुंबिक स्तरावर कर्तव्य निभावताना; भावना, व्यवहार आणि जबाबदार्‍या (भावनिक, मानसिक, आर्थिक अवलंबन असलेल्या) यांचा तोल सांभाळताना त्याच्या मनःसामर्थ्याचा कस लागत असतो.
व्यावसायिक जगात आपल्या कामाच्या ठिकाणी तो त्याच्या मनोवृत्तीनुसार झोकून देऊन वा किनार्‍यावर राहून आवश्यक ती कामं करत असतो. ज्या कामात त्याला आनंद मिळतो ते ओझं न वाटता त्यात नवनवीन प्रयोग करत राहण्याची उमेद वाटत असते. काम अधिक क्षमतेनं आणि उत्तम होत जातं. नावीन्य आणि ताजेपणा टिकून राहिल्यामुळे आनंदही वाढत जातो. या स्तरावर बौद्धिक, वैचारिक क्षमतांचा आणि सर्जकतेचा कस लागत असतो. आणि यश वा अपयश याच सर्व गोष्टींवर अवलंबून असतं.
समाजात वावरत असताना अनेक प्रकारची माणसं भेटत असतात. जवळची, दूरची. प्रकाश पेरणारी वा मळभ आणणारी. माणसं पाहावीत, वाचावीत, ओळखावीत, जोखावीत, अनुभवावी… ज्यांचं माणूसपण सरलं नाही ती मनात जपावी… ज्यांच्याशी तारा जुळल्या ती काळजाशी धरावी. जाणणार्‍यांना जाणून घ्यावं… न जाणणार्‍यांना वगळत जावं.
आयुष्य पुढे सरकत असतंच. एका कवीने म्हटल्याप्रमाणे-
जसे आपण जगत जातो
तसं आयुष्य सरत जातं आणि…
आपण सोडलेल्या, गाळलेल्या जागा
ते नाइलाजानं भरत जातं
आपण कोणत्या जागा सोडल्या आहेत, गाळल्या आहेत याचाही विचार करावा.
सर्व स्तरांवर जगताना एक कलात्मकतेचा, सर्जनाचा धागा जुळलेला असेल तर त्याला वेगळा अर्थ लाभतो. अभिव्यक्तीची निकड जाणवणं, त्यासाठी माध्यम गवसणं आणि त्या माध्यमातून योग्य प्रकारे व्यक्त होता येणं शक्य झालं तर प्रत्येक सोसण्याचंसुद्धा एक काट्यातलं का होईना फूल होऊ शकतं. प्रत्येक लहान-मोठ्या आनंदाचा प्राजक्त होऊ शकतो. प्रत्येक दिवसाला वेगळा अर्थ लाभतो. आयुष्य आनंदात जायला वाचन, संगीत, प्रवास, आवडत्या व्यक्तीचा सहवास, हसणे, हसवणे, कधीकधी वेड्यासारखेही वागणे अशा अनेक गोष्टी असतात. कुणाला कशात आनंद वाटेल हे ज्याचे त्यालाच कळणार. जी गोष्ट केल्याने इतर कोणाला त्रास न होता आपली ऊर्जा वाढते ती करत राहावी.
माणसाचं वैयक्तिक स्तरावरचं एक जग मात्र त्याचं एकट्याचं असतं. तिथे स्वतःचा स्वतःशी संवाद घडत असतो. वाद घडत असतो. हा संवाद आपण किती घडू देतो यावर माणूस म्हणून आपलंही वाढणं अवलंबून असतं. प्रायः आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. हा संवाद टाळत असतो. स्वतःचा शोध घेण्याच्या प्रयत्नातून जे सत्य हाती येण्याची शक्यता असते त्याच्या जवळ जायला अनुत्सुक असतो. भ्रमात जगत राहाणे स्वीकारत राहतो. पण हा संवाद जर खराखुरा जमला तर कितीतरी नकारात्मक विचारांचा आपोआप निचरा होत जाणार असतो. कितीतरी महत्त्वाच्या वाटलेल्या गोष्टींचं फोलपण लक्षात येणार असतं.
प्रत्येकाला स्वतःचा अवकाश तर हवा असतो. पण त्या अवकाशातच एक छोटासा कोपरा अशा संवादाचा असतो. खुल्या दिलानं त्याचं स्वागत करता आलं तर अनेक अनुभूतींचा वेध अधिक वस्तुनिष्ठपणं घेणं, त्यांचे सुसंगत अन्वयार्थ लावणं शक्य होतं, सुकर होतं. खरं तर नुसतं असणं याची जाणीव आणि यात आनंद वाटू लागला की सारे विश्‍व आपलं रहस्य सहज खुलं करू लागतं.
ही सगळी गोळाबेरीज म्हणजेच तर आयुष्य असतं. उन्हाचे चटके आणि सावलीची शीतलता अनुभवत पुढे सरकत जाणारं आयुष्य म्हणजे रोज नव्यानं उलगडत जाणारी एखादी कादंबरीच असते. त्यातली अनपेक्षितता हीच जगण्यातली रोचकता वाढवत नेणारी बाब असते. म्हणून तर माणूस कितीही संकटं आली तरी न डगमगता मार्ग काढत असतो आणि किती असह्य वाटलं तरी आतून, मनातून आयुष्यभर प्रेम करत असतो. जगण्याला लाभलेले वेगवेगळे आयाम त्याला बळ देत असतात, पुढे नेत असतात… आणि मनासारखं घडलं, घडणार आहे या भावनेचा चिरंतन किरण त्याला जिवंत ठेवत असतो. खरोखर, प्रत्येक प्रसंगातून, प्रत्येक अनुभवातून नव्यानं भेटत राहाणारं, काही ना काही देत राहाणारं हे आयुष्य शतदा प्रेम करावं असंच आहे!

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

इकडेही लक्ष द्या

कोरोनाचा वणवा राज्यात चहुदिशांनी भडकल्यावर आणि सर्वतोपरी सज्जतेचे दावे उच्च न्यायालयात उघडे पडल्यावर आता राज्य सरकार उपाययोजनांच्या विहिरी खोदायला निघाले आहे. गोवा...

कोरोना बळींची संख्या २ हजारांजवळ

>> राज्यात शुक्रवारी ६१ मृत्यू, २४५५ बाधित, एकूण बळी १९९८ राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा उच्चांकी ६१ रुग्णांचा...

प्राणवायूसंदर्भातील उपाययोजनांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

राज्य सरकारचे आरोग्य सचिव रवी धवन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला गोमेकॉमधील प्राणवायू पुरवठा व इतर समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा...

गोमेकॉत प्राणवायू टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ः मुख्यमंत्री

बांबोळी येथील गोमेकॉतील वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्याचे काम जोरात सुरू आहे, अशी माहिती...

कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणारच ः मोदी

>>किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकर्‍यांना आठवा हप्ता भारताचे अद्यापही कोरोनाशी सुरू असलेले युद्ध आपण लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्‍वास पंतप्रधान...

ALSO IN THIS SECTION

गोव्यात कोरोनाचा थयथयाट!

प्रमोद ठाकूर ‘कोरोना’च्या दुसर्‍या लाटेने दणका दिल्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग आली. यापुढे कोरोना महामारीबाबत निष्काळजीपणा नको. ‘जीएमसी’वरील रुग्ण...

मतदारांचा स्पष्ट संदेश

दत्ता भि. नाईक या निवडणुका म्हणजे केंद्रातील सत्ताधारी व सत्ताधारी बनण्याची आकांक्षा बाळगणार्‍यांसाठी संदेश देणारी उपांत्य फेरी आहे....

‘कोविड-१९’चा रोजंदारीवर परिणाम

शशांक गुळगुळे दुसर्‍या लाटेने भारतातील फार मोठा गट आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. या लोकांसाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर साहाय्य...

कोरोनाचे संकट आणि देशातील अराजक

प्रा. विनय ल. बापट संकट मोठे आहे आणि आव्हानही मोठे आहे. यापूर्वीही भारताने अशा महामार्‍यांचा सामना केला आहे...

भारतीय सागरी हद्दीत अमेरिकेचे विनाशकारी जहाज

दत्ता भि. नाईक जे घडले ते वरकरणी साधे वाटत असले तरी दिसते तेवढे ते साधे प्रकरण नाही. एक...