मनोहर विमानतळावरील टॅक्सी पार्किंग शुल्कवाढीला स्थगिती

0
17

टॅक्सी व्यावसायिकांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन; आमदार विजय सरदेसाई यांची माहिती

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी पार्किंग शुल्क वाढ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या 3 ऑक्टोबरपर्यंत स्थगित ठेवण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती आमदार विजय सरदेसाई यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली. या प्रकरणी 3 ऑक्टोबरला बैठक होणार आहे.

मनोहर विमानतळावरील टॅक्सी पार्किंग शुल्कात वाढ करण्यात आल्याने काल स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी मोठे आंदोलन छेडले. विजय सरदेसाई यांनी या आंदोलनात सहभागी होऊन विमानतळाचे सीईओ श्री. शेषन यांच्याशी वाढीव पार्किंग शुल्काबाबत चर्चा केली. तथापि, शुल्कवाढ मागे घेण्याबाबत त्यांनी काहीच आश्वासन दिले नाही.
यानंतर आमदार विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो-पणजी येथील सरकारी निवासस्थानी भेट घेऊन मोपा विमानतळावरील वाढीव पार्किंग शुल्काच्या विषयावर चर्चा केली. यावेळी आरजीपीचे मनोज परब, अमित सावंत आणि टॅक्सी व्यावसायिकांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या 3 ऑक्टोबरला या विषयावर खास बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकार आणि टॅक्सी व्यावसायिकांना विश्वासात न घेता जीएमआरने पार्किंग शुल्कात वाढ केली आहे, असा दावा आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

पार्किंग शुल्क वाढीविरोधात
टॅक्सी व्यावसायिकांचे आंदोलन

मोपा विमानतळावरील टॅक्सी पार्किंग शुल्क वाढ प्रकरणी काल टॅक्सी व्यावसायिकांनी तीव्र आंदोलन छेडले. शेकडो टॅक्सी व्यावसायिक आणि विविध पक्षांचे राजकीय नेते यांनी थेट मोपा विमानतळ परिसरात घुसून मोपा विमानतळ प्रशासकीय इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला.
मोपा विमानतळावर टॅक्सी पार्किंगसाठी पूर्वी 80 रुपये शुल्क होते. अचानक त्यात 200 रुपये अशी वाढ करण्यात आली. टॅक्सी व्यावसायिकांना आणि संघटनेला विश्वासात न घेता जीएमआर कंपनीने शुल्कात वाढ केल्याने हे आंदोलन छेडण्यात आले होते.

सोमवारी टॅक्सी व्यावसायिकांच्या एका संघटनेने मोपा विमानतळाच्या जुन्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन छेडले. काल सकाळी अकराच्या हे आंदोलन सुरुवातीला शांतपणे सुमारास सुरू होते. आमदार विजय सरदेसाई, आरजीपीचे प्रमुख मनोज परब, विविध पक्षांचे नेते आणि गोव्याच्या विविध भागातून टॅक्सी व्यावसायिक आणि संघटनांचे पदाधिकारी आल्यानंतर त्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले.
यानंतर आंदोलकांनी मोपा विमानतळ परिसरात धडक दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा होता, तरीही आंदोलकांनी जीएमआर कंपनीच्या प्रशासकीय इमारतीकडे धडक दिली. यावेळी आंदोलकांनी विमानतळाचे सीईओ श्री. शेषन यांना चर्चेसाठी बोलावण्याची मागणी लावून धरली. मात्र ते त्या ठिकाणी आले नाहीत. या दरम्यान एक अधिकारी त्या ठिकाणी आला; मात्र तो कंपनीची भूमिका स्पष्ट करण्यात अपयशी ठरला.