मनोऱ्यातून गोवा मुक्ती इतिहासाचे दर्शन घडवा

0
7

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राज्य सरकारला सल्ला; नव्या झुआरी पुलावरील वेधशाळा मनोरा आणि दर्शक गॅलरीची पायाभरणी

नव्या झुआरी पुलाच्या मध्यभागी साकारला जाणारा वेधशाळा मनोरा आणि दर्शक गॅलरी ही जागतिक दर्जाची बनली पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे. या मनोऱ्यामध्ये गोवा मुक्ती संग्रामाचा इतिहास आणि गोमंतकीय संस्कृतीची झलक दिसली पाहिजे. त्यासाठी गोमंतकीय वास्तूविशारदांची एक स्पर्धा घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात आणा, असा सल्ला केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल राज्य सरकारला दिला. देशातील हा पहिलाच प्रकल्प असून, त्याची तुलना फ्रान्सच्या आयफेल टॉवरशी होईल, असेही त्यांनी नमूद केले.

झुआरी नदीवरील नव्या पुलाच्या मध्यभागी साकारल्या जाणाऱ्या वेधशाळा मनोरा आणि दर्शक गॅलरीच्या पायाभरणीप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. चिखली ग्रामपंचायत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, केंदीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दाजी साळकर, आंतोन वाझ, विरेश बोरकर, दिगंबर कामत, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पालिका सदस्य, पंचायत सदस्य आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते.

या प्रकल्पात वेधशाळा मनोरा, दर्शक गॅलरी आणि रेस्टॉरंट असणार आहे. त्यामध्ये गोवा मुक्तीचा इतिहास आणि गोमंतकीय संस्कृतीची झलक घडवण्याची संधी आहे. गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. गोव्याच्या वेगळी आणि अनोखी अशी संस्कृती देखील आहे. त्याचे दर्शन या मनोऱ्यातून घडावे, अशी आपली इच्छा आहे. त्यासाठी गोव्यातील वास्तुविशारदांची एक स्पर्धा घ्या, त्यासाठी 1 किंवा 2 लाखांचे बक्षीस ठेवा. वास्तुविशारदांसमोर आपली मूळ संकल्पना मांडा आणि त्या अनुरुप त्यांच्याकडून डिझाईन मागवून काम करा, असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला. या कामात तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

सुमारे 270 कोटी रुपये खर्चुन झुआरी पुलावर हा मनोरा साकारण्यात येणार असून, हा प्रकल्प पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पात पॅरिसमधील आयफेल टॉवरपासून प्रेरणा घेऊन मनोरे उभे केले जाणार आहेत. याशिवाय दर्शक गॅलरी, कॅफेटेरिया, फिरते उपहारगृह, कलादालन यांचाही यात अंतर्भाव असणार आहे. पर्यटकांना गॅलरीत जाऊन झुआरी नदी, समुद्र आणि निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी मनोऱ्यात लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार आहे. हे दोन्ही मनोरे प्रत्येकी 125 मीटर उंचीचे असतील. या मनोऱ्यांमुळे पायाभूत साधनसुविधांसह गोव्याच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे. शिवाय या प्रकल्पामुळे रोजगाराच्या अनेक संधीही उपलब्ध होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
गोव्यातील रस्ते, अनेक उड्डाण पूल, चौपदरी महामार्ग जवळजवळ पूर्णत्वाकडे चालले आहेत. राष्ट्रीय महामार्गामुळे रहदारीवर नियंत्रण आले असून, अपघात कमी झाले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

गोव्यात रिंग रोडचा प्रस्ताव
महाराष्ट्राच्या सीमेवरील पत्रादेवी येथून गोव्याच्या मध्यभागी न येता थेट दक्षिण गोव्यातून बंगळुरुपर्यंत जाता यावे, यासाठी रिंग रोडचा प्रस्ताव असून, त्यावर अभ्यास सुरू आहे. 10 ते 15 हजार कोटींचा हा प्रकल्प असेल. या प्रकल्पानंतर गोव्यातील रस्ते विकासाची सर्व कामे पूर्ण होतील, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

कॅप्सूल लिफ्टमधून सेकंदांमध्ये मनोऱ्यावर
नव्या झुआरी पुलावरील वेधशाळा मनोरा जगप्रसिद्ध बनावा अशी आपली इच्छा आहे. या मनोऱ्यातील कॅप्सूल लिफ्टमधून मिनिटांमध्ये नव्हे, तर अवघ्या काही सेकंदांमध्ये मनोऱ्यावर पोहोचता येणार आहे. सुरुवातीला नौकेतून मनोऱ्यापर्यंत जावे लागेल. त्यानंतर कॅप्सूल लिफ्टमधून वर पोहोचता येईल. तेथून संपूर्ण गोव्याचे निसर्गसौंदर्य आणि समुद्र किनाऱ्याचे दर्शन पर्यटक आणि नागरिकांना घेता येणार आहे, असेही नितीन गडकरी यांनी नमूद केले.

500-600 जणांना प्रत्यक्ष रोजगार
नव्या झुआरी पुलावरील हा प्रकल्प देशातील पहिलाच प्रकल्प असून, यानंतर दुसरा प्रकल्प प्रयागराज येथे गंगा नदीवर राबवण्याचा आपला मानस आहे. झुआरी पुलावरील मनोरा आणि दर्शक गॅलरी प्रकल्पामुळे 500 ते 600 जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.