कालची सकाळ गोव्यात उजाडली ती दुःखाचे सावट घेऊन. मराठी रंगभूमी आणि मराठी – हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते आणि एक मनस्वी माणूस अशा नाना पाटेकरांचे गोव्यातील त्यांच्या घरी निधन झाले. चारच दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात पांढराशुभ्र कुर्ता, खांद्यावर झोकदार स्कार्फ, कपाळाला उभा टिळा अशा देखण्या रूपात त्यांचे तितकेच श्रवणीय भाषण झाले होते. कालपरवाच भेटलेला एखादा चालता बोलता माणूस अचानक एका रात्रीत आपल्यातून निघून जातो तेव्हा तो धक्का पचवणे खरेच कठीण असते. त्यात नानांसारखा जिंदादिल, कर्तृत्ववान माणूस आणि अभिनेता असेल तर तो कल्पनेपलीकडचा ठरतो. नानांचे हे असे अकस्मात एकाकी अवस्थेत बेशुद्धावस्थेत जाणे म्हणूनच धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. पंच्याहत्तर हे काही निघून जाण्याचे वय नव्हे. त्यातील पन्नास वर्षे नाट्य – चित्रपटसृष्टीला दिलेली. मराठी रंगभूमीला त्यांच्या ‘पुरूष’ सारख्या नाटकाने एकेकाळी ऊर्जितावस्था दिली. ‘अंकुश’, ‘प्रहार’, ‘परिंदा’, ‘क्रांतीवीर’ अशा त्यांच्या चित्रपटांनी दमदार संवादफेक कशी असावी, सहजसुंदर अभिनय म्हणजे काय ह्याचे मानदंड निर्माण केले. शिरवाडकरांचा ‘नटसम्राट’ किंवा ‘प्रकाश बाबा आमटे’ त्यांनी ज्या प्रभावीरीत्या पडद्यावर उतरवले, तितक्याच सहजतेने ‘वेलकम’सारख्या चित्रपटाद्वारे ‘जेन झी’मध्ये हास्याचे कल्लोळ उसळवले. नानांची चित्रपट कारकीर्द प्रदीर्घ आहे आणि सर्वांसमोर आहे. 1978 साली आलेल्या ‘गमन’ पासूनची त्यांची चित्रपट कारकीर्द आहे. मुळात जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून कलाशिक्षण घेतलेल्या आणि सुरुवातीच्या काळात वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी महिना पस्तीस रुपये पगारावर चित्रपटांची पोस्टर्स रंगवणाऱ्या नानांनी अभिनयामध्ये कारकीर्द घडवली. अभिनय हा ‘अभिनय’ वाटता कामा नये ह्यावर त्यांचा भर असे. तो जिवंत व्हावा, सहज असावा ह्यासाठी ते प्रचंड मेहनत घेत. ‘प्रहार’ चित्रपटात कमांडो साकारायचा होता तेव्हा प्रत्यक्ष मराठा लाईट इन्फ्रंट्रीमध्ये जाऊन त्यांनी तीन वर्षे खडतर प्रशिक्षण घेतले होते. कारगील युद्ध सुरू झाले तेव्हा ते तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना जाऊन भेटले आणि आपण प्रशिक्षित कमांडो आणि राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज असल्याने युद्धात प्रत्यक्ष भाग घ्यायची परवानगी मागितली होती. त्यांना ती देण्यातही आली होती. हीच लष्करी शिस्त नानांनी आपल्या अंगी बाणवली होती. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलण्या – वागण्याची धमक त्यांच्यात जशी होती, तितकीच ज्या दिव्यत्वापुढे मस्तक झुकवायचे तेथे झुकण्याची त्यांची तयारीही असे. स्वतःच्या ‘सेलिब्रिटी’च्या अहंकारात ते कधी वावरले नाहीत. म्हणूनच मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी ते सहकलावंतांसह पुढे झाले. अभिनेता मकरंद अनासपुरेच्या सोबत नानांनी 2015 च्या सप्टेंबरमध्ये ‘नाम’ फाऊंडेशन ही संस्था स्थापन केली आणि अमीर खानच्या ‘पाणी फाऊंडेशन’च्या सहकार्याने दुष्काळग्रस्तांसाठी मोठमोठी कामे केली. दुष्काळग्रस्त भागांतील नद्यांतील गाळ उपसण्यापासून जलसंधारण तलाव बांधण्यापर्यंत आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना आधार देण्यापासून त्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत करण्यापर्यंत शासकीय साह्यावर विसंबून न राहता मूलभूत मदत ते करीत राहिले. ती नुसती संस्था राहिली नाही, तर एक चळवळ बनली. गोव्यातही अशा प्रकारची जलसंधारणाची कामे करण्याची इच्छा त्यांनी अलीकडेच बोलून दाखवली होती. सध्या महाराष्ट्रात मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती आहे, तेथे नव्याने कामे करण्यासाठी त्या जिल्ह्याचा दौरा काढण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला होता. आम्ही राहू न राहू, हे काम पुढे चालले पाहिजे असे त्यांचे सहकाऱ्यांना सांगणे होते. राजकीय घडामोडींवरही त्यांचे लक्ष होते. त्या क्षेत्रातही त्यांचा मित्रपरिवार होता, परंतु जी गोष्ट आवडत नाही त्यावर बोलायलाच हवे अशी त्यांची भूमिका होती. समविचारी माणसांनी एकत्र येणे सध्याच्या काळात गरजेचे आहे, त्यामुळे समाजाचा विकास होतो असे त्यांनी नुकतेच गोव्यातील कार्यक्रमात बोलून दाखवले होते. माणसाने जगत असताना इतरांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे ही त्यांची स्वच्छ भूमिका होती. एक कलावंतही समाजासाठी केवढे मोठे काम उभे करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. अभिनेता म्हणून तर ते श्रेष्ठ होतेच. जी भूमिका त्यांनी केली ती रुपेरी पडद्यावर अक्षरशः जिवंत केली. त्यांची गाजलेली ‘एक मच्छर..’ सारखी दमदार संवादफेक आजही थरारून सोडते. पण त्यापलीकडेही एक सामाजिक भान असलेला आणि ती बांधिलकी मानणारा माणूस म्हणूनही ते श्रेष्ठ होते हे आज त्यांच्या जाण्याने ठळकपणे जाणवते आहे..

