मनरेगाखाली ४० हजार कोटींची तरतूद

0
140

>> केंद्रीय अर्थमंत्री, ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेतील आर्थिक घोषणा

‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल प्रोत्साहन पॅकेजच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील आर्थिक घोषणा केल्या. यात मनरेगा, आरोग्य, शिक्षण, उद्योग, केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम या प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजबद्दलची माहिती केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली. मागील परिषदांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना दिल्या जाणार्‍या मदतीची घोषणा केल्यानंतर अर्थमंत्र्यांनी रविवारी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

देशभरातून आपल्या घरी स्थलांतर करू इच्छिणार्‍या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने मनरेगाच्या माध्यमाखाली रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ४० हजार कोटींची तरतूद केली आहे असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. हे मजूर घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या रोजगारांसाठी केंद्राने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मजुरांच्या प्रवासाची सोय विशेष रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या तिकिटाचा ८५ टक्के खर्च केंद्राने उचलला आहे असे सीतारामन म्हणाल्या.

प्रत्येक इयत्तेसाठी चॅनेल
शिक्षण क्षेत्रातील भरीव उपाययोजनांबद्दल सांगितले. डीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा चॅनेल तयार करणार आहेत. सध्या असे तीन चॅनल असून यामध्ये आणखी १२ चॅनलची भर पडणार आहे. इंटरनेट नसलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. चॅनलद्वारे ई-कॉन्टेंटची निर्मितीही होईल. वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे १२ वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी चॅनेल तयार केले जातील. पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल प्रोग्रामही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

राज्यांना भरीव मदत
केंद्राच्या उत्पन्नात घट आलेली आहे. मात्र राज्य आपत्ती निवारण निधी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच ११ हजार ९२ कोटी राज्यांना देण्यात आले. ४ हजार ११३ कोटी रूपये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून कोरोनाविरोधी कृती कार्यक्रमासाठी देण्यात आले, अशी माहिती सीतारामन यांनी दिली. केंद्र सरकारने कर्ज मर्यादाही वाढवली आहे. राज्याच्या जीडीपीच्या ५ टक्के मर्यादा वाढवल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

गरिबांना दिल्या जाणार्‍या मदतीची माहिती देताना आतापर्यत जनधन खात्यात १० लाख २२५ कोटी रुपये जमा करण्यात आले. विविध योजनातर्ंगत १६ हजार ३९४ कोटींची मदत जमा करण्यात आली असून २५ कोटी गरीब, मजुरांना गहू, तांदूळ मोफत वाटप करण्यात आल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.