युपीए सरकारने केलेल्या कल्याणकारी योजनांची राज्याराज्यात जाऊन माहिती देण्याच्या बाबतीत डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून कमी पडले. त्यामुळे भाजपला नकारात्मक प्रचार करण्यास वाव मिळाला. परिणामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पराभूत झाला, असे सांगून आपण पक्ष सोडणार नसल्याचे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार रवी नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी देशात मोदी लाट होती यावर आपला विश्वास नाही. तळागाळात कॉंग्रेस संघटना बळकट करण्यास कमी पडल्याचे नाईक म्हणाले. कॉंग्रेसच्या सर्वच आमदार व गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार आपल्या प्रचारात सक्रियपणे सामील झाले होते. प्रचारासाठी फक्त १५ दिवस मिळाले. श्रीपाद नाईक गेली पंधरा वर्षे खासदार आहेत. त्यानी प्रचाराचे काम कित्येक महिन्यांपूर्वी सुरू केले होते, असे त्यांनी सांगितले. २०१७ मध्ये कॉंग्रेसला गत वैभव पुन्हा प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचे ते म्हणाले. पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या विरुध्द कोणतीही तक्रार करण्यास आपण तयार नाही, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.

