मत्स्यविज्ञान महाविद्यालयाबाबत मुख्यमंत्र्यांकडून आढावा

0
52

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत राज्यात गोवा मत्स्यविज्ञान महाविद्यालयाची स्थापना आणि कार्यान्वित करण्याबाबत सविस्तर चर्चा काल केली.

राज्यात मत्स्यविज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आल्तिनो पणजी येथील महालक्ष्मी या सरकारी निवासस्थानी या विषयावर चर्चा करण्यासाठी खास बैठक घेतली. या बैठकीत महाविद्यालयासाठी पायाभूत सुविधा, जमीन व इतर सुविधा, कर्मचारी व प्राध्यापकांची आवश्यकता आणि महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारत उभारणे यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेण्यात आला आहे

नियोजित गोवा मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी पशुवैद्यकीय विभागाच्या अखत्यारीतील 2.6 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली आहे.
गोवा मत्स्यविज्ञान महाविद्यालयाची स्थापना हे गोव्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील शिक्षण, वैज्ञानिक संशोधन आणि कुशल मनुष्यबळ बळकट करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.