Home बातम्या मत्स्यप्रेमी गोव्याला परराज्यांचा आधार

मत्स्यप्रेमी गोव्याला परराज्यांचा आधार

0

राज्यात मच्छीमारी बंदी असल्याने राज्याला पराराज्यातून येणार्‍या मासळीवर अवलंबून रहावे लागत असून सध्या केरळ, गुजरात, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातून गोव्याला मासळीचा पुरवठा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घडीला राज्याला सर्वांत मोठ्या प्रमाणात मासळीचा पुरवठा होतो तो केरळमधून असे सूत्रांनी स्पष्ट केले.

सध्या केरळमधून गोव्याला रोज ४० टन एवढ्या मासळीचा पुरवठा होत असतो. रोज सुमारे २० ट्रक केरळमधून मासळी घेऊन गोव्यात दाखल होत असतात, अशी माहिती घाऊक मासळी एजंटांच्या सूत्रांनी दिली. केरळ पाठोपाठ गुजरातमधून सुमारे ५ ते ६ टन व आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातूनही तेवढ्याच मासळीचा पुरवठा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र, केरळ व आंध्रप्रदेशातून ट्रकांद्वारे मासळी आणली जाते तर गुजरातमधून रेल्वेतून मासळी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परराज्यांतून मासळी येत असल्यानेच राज्यात पूर्णपणे मच्छीमारी बंदी असतानाही मासळीचा तुटवडा भासत नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. परराज्यातून येणार्‍या मासळीमुळे स्थानिक लोकांबरोबरच पर्यटक तसेच रेस्टॉरंटवाले यांची चांगली सोय होत असल्याचे सूत्रांनी नमूद केले. ही मासळी तुलनेने महाग असली तरी तिला चांगली मागणी असल्याचे सूत्रांनी पुढे सांगितले. केरळमधून बांगडे, तारले, वेर्ल्या अशी छोटी मासळी येत असते. तर गुजरातमधून पांढरी व काळी पापलेट, मुडदशा अशी मासळी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.३१ जुलैपासून गोव्यात मच्छीमारी मोसम सुरू झाल्यानंतर बाहेरच्या राज्यातून येणार्‍या मासळीचे प्रमाण कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.