‘मत्स्यगंधा’ची पन्नाशी… पणजीतील आनंदसोहळा

0
222

– विष्णू सूर्या वाघ

प्रा. वसंत कानेटकर यांच्यासारखा प्रतिभावंत नाटककार, पं. जितेंद्र अभिषेकी यांच्यासारखा बुद्धिमान संगीतकार, मा. दत्ताराम यांच्यासारखा बुजुर्ग दिग्दर्शक आणि उत्तुंग अभिनेता, रामदास कामत यांच्यासारखा चतुरस्त्र गायक, आशालता वाबगावकर यांच्यासारखी अनुपम अभिनयसम्राज्ञी आणि रामकृष्ण नायक यांच्यासारखा चिवट पण धाडसी निर्माता- अशी सगळी मंडळी एकत्र आली तर काय होऊ शकेल?

या प्रश्‍नाचं उत्तर एकच- एक अद्वितीय कलाकृती!
पन्नास वर्षांपूर्वी ही सगळी माणसं एकत्र आली आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासात एका अद्वितीय कलाकृतीचा जन्म झाला. तिचं नाव- ‘सं. मत्स्यगंधा.’ १ मे १९६४ रोजी मुंबईच्या बिर्ला मातोश्री नाट्यगृहात सकाळी ९.३० वाजता ही नाट्यकृती जन्माला आली. कालच्या १ मे रोजी तिची पन्नाशी पूर्ण झाली. मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णवैभवी परंपरेला एक नवा आयाम देताना गेल्या पाच दशकांत या नाटकानं मराठी मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवलं आहे. या नाटकाची एकंदर बांधणी आणि रचनाबंध, त्याचं दिग्दर्शन, त्यातील अभिनय, संगीत, नाट्यपदं यांबाबत आजपर्यंत एवढं काही लिहून झालंय की त्याबद्दल काहीच लिहायची आता आवश्यकता नाही. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेनं रंगभूमीवर आणलेलं हे नाटक आता सार्‍या मराठी माणसांचं बनलं आहे. कानेटकरांची ‘मत्स्यगंधा’ ही केवळ इतिहासाचा भाग नव्हे तर दस्तुरखुद्द इतिहास बनून राहिली आहे!
अर्थात हेही लक्षात घ्यायला हवं की हे नाटक जन्माला आलं तेव्हा (आणि त्यानंतरच्या काही महिन्यांतही) फारशी आशादायी परिस्थिती नव्हती. काही नाटकं इतकी सुदैवी असतात की पदार्पणापूर्वीच त्यांच्या स्वागताच्या नौबती झडतात. ‘मत्स्यगंधा’ इतकं काही नशीबवान नव्हतं. बिर्ला मातोश्रीतला पहिला प्रयोग साडेनऊ वाजता सुरू झाला व दोन वाजण्याच्या सुमाराला संपला. तब्बल साडेचार तास नाटक चाललं. अर्थात त्याला तसं कारणही होतं. पहिला प्रयोग होईपर्यंत या नाटकाच्या गद्य-पद्याच्या एकत्रित तालमी झाल्याच नव्हत्या! गद्य भागाच्या तालमी एकीकडे- त्या मा. दत्ताराम घ्यायचे, तर संगीताच्या तालमी दुसरीकडे- त्या पं. अभिषेकी घ्यायचे. या दोन्हींचं पहिलं ‘जेलिंग’ झालं ते प्रथम प्रयोगाच्या दिवशी! त्या पहिल्या प्रयोगात एकंदर १७ गाणी होती. पुढच्या प्रयोगात त्यातली चार गाणी कापावी लागली. तासाभराचा एकूण भाग वगळावा लागला. तरी नाटकाच्या स्वागताचा चौघडा वाजलेला काही ऐकू येईना. मा. दत्ताराम, आशालता, रामदास कामत, श्रीपादराव नेवरेकर अशा कलाकारांची तगडी फळी आणि अभिषेकींचं नवंकोरं संगीत असूनदेखील प्रेक्षक नाटकाकडे फिरकायला बिचकू लागले. काही ठिकाणचा अनुभव तर अक्षरशः काळजात धडकी भरवणारा होता. नागपूरच्या प्रयोगावेळी प्रेक्षकांनी अक्षरशः खुर्च्या फिरवल्या आणि शेंगदाणे खात गप्पा मारू लागले. कोकणातील दौर्‍यात तर तिथले इरसाल प्रेक्षक शंतनूची रंगमंचावर एंट्री होताच ‘शंतनू इलो रेऽऽ’ अशी हाळी द्यायला लागले. त्याही स्थितीत विचलित न होता शंतनूची भूमिका करणारे श्रीपादराव नेवरेकर आपलं गाणं यथास्थितपणे पूर्ण करीत असत. या स्थितीत जवळजवळ एकोणचाळीस प्रयोग झाले. नव्या संगीत नाटकाच्या निर्मितीचं शिवधनुष्य उचलण्याचा प्रयोग अंगाशी येऊन त्या शिवधनुष्याखालीच संस्था चिरडली जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली. पण निस्सीम सेवाव्रताचा वसा घेऊन केलेलं कुठलंही काम व्यर्थ जात नाही हे सत्य शेवटी रामकृष्ण नायक या जिद्दी, ध्येयपंथी माणसाच्या निग्रहामुळं साकार झालं. सपशेल पडलेल्या एकोणचाळीस प्रयोगांनंतर गोव्याचा दौरा सुरू झाला- डिचोलीतील पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल झाला. प्रेक्षकांचा तुडुंब प्रतिसाद नाटकाला लाभला आणि गोव्यातले लागोपाठ सात प्रयोग अतोनात यशस्वी झाले. तिथूनच सं. ‘मत्स्यगंधा’च्या यशाची चढती कमान सुरू झाली.
पाहता पाहता सं. ‘मत्स्यगंधा’चा चोहीकडे बोलबाला सुरू झाला. उत्तुंग अभिनय, कल्पक संगीत, रसपूर्ण गायन, देखणी नेपथ्यमूल्ये अशा अनेकविध वैशिष्ट्यांनी हे नाटक गाजलं. धि गोवा हिंदूनं जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं हे नाटक पोचवलं. मा. दत्तारामबापूंनी जोवर भीष्माची भूमिका केली तोवर संस्थेनं हे नाटक चालवलं. यादरम्यान आशालता वाबगावकर, सुनंदा तोरगल, लता अरुण, नलिनी चोणकर व कु. फैयाज अशा पाच मत्स्यगंधा (सत्यवती) रंगभूमीवर आल्या. महाराष्ट्र, गोवा, बेळगाव इत्यादी ठिकाणच्या शेकडो संस्थांकडून या नाटकाचे प्रयोग झाले. गोव्यातील उत्सवी रंगभूमीवर आजही वर्षाकाठी सं. मत्स्यगंधाचे किमान पन्नास-साठ प्रयोग तरी होतच असतात.
मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणार्‍या या नाटकाचं पदार्पण जसं संथपणे झालं होतं, तितक्याच संथपणे परवा त्याची पन्नाशीही झाली. मराठी माणसांची सांस्कृतिक राजधानी मुंबई आहे की पुणे असा एक वाद नेहमी घातला जातो. आपणाला त्या वादाशी देणंघेणं नाही. पण या दोन्ही महानगरातील रसिकांना ‘मत्स्यगंधा’चा सुवर्णमहोत्सव आपण एकत्र येऊन साजरा करावा असं वाटलं नाही. नाशिक ही वसंतराव कानेटकरांची कर्मभूमी. पण तिथंही यासंदर्भात काही झाल्याचं ऐकू आलं नाही. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद ही सर्व रंगकर्मींची प्रातिनिधिक संस्था, पण तिलाही पाच दशकांचा कालखंड गाजवणार्‍या नाटकाचं सांस्कृतिक सेलेब्रेशन व्हायला हवं असं वाटलं नाही. त्या पार्श्‍वभूमीवर, मराठी मनाला कलासंपन्न करणार्‍या या नाटकाची स्मृती आपण जोजवायला हवी असा साक्षात्कार गोमंतकात राहून कलेची सेवा करणार्‍या तीन कलोपासकांना झाला आणि त्यांनी जिद्दीने ‘मत्स्यगंधा’चा सुवर्णमहोत्सव एका आगळ्यावेगळ्या आणि संस्मरणीय कलाविष्काराच्या माध्यमातून साजरा केला. मराठी रंगभूमीविषयी प्रेम व आस्था बाळगणारे जे अनेक सुजाण श्रोते या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यातलाच एक भाग्यवान मीही होतो.
‘अक्षय पणजी’ ही इन मीन मिळून तीनच माणसं चालवत असलेली एक संस्था. डॉ. अजय वैद्य, महेश रेगे आणि हरहुन्नरी अवलिया महेश आंगले हे या संस्थेचे तीन शिलेदार. ‘तीन तिगाडा- काम बिगाडा’ अशी हिंदीत एक म्हण आहे. पण त्याचबरोबर आपणाकडे त्रिगुणात्मक एकात्मता साधणार्‍या त्रिमूर्तीचीही संकल्पना आहे. वैद्य, रेगे आणि आंगले या संकल्पनेतून काम करतात. बहुधा म्हणूनच ते दर्जेदार कार्यक्रम देऊ शकतात. ही परंपरा परवाही त्यांनी सांभाळली आणि कायम स्मरणात राहील असा एक पुनःप्रत्ययाचा आनंद मराठी रसिक प्रेक्षकांना दिला.
‘मत्स्यगंधा’ची पन्नाशी साजरी करण्यासाठी पणजीच्या इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात संपन्न झालेला हा आनंदोत्सव खर्‍या अर्थानं एक पर्वणी होती. तो केवळ नाट्यगीत सादरीकरणाचा अथवा ‘मत्स्यगंधा’तील स्वगते वाचून दाखवण्याचा कार्यक्रम नव्हता, परंतु वाचिक अभिनय आणि स्वराविष्कार यांद्वारे ‘मत्स्यगंधा’मधून पडलेल्या दिव्य प्रतिभोल्लासाची वेगळीच अनुभूती रसिकांना देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मला त्यातून जाणवला.
या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य होतं, ‘मत्स्यगंधा’च्या निर्मितीत, पहिल्या प्रयोगापासून ते निरोपाच्या प्रयोगापर्यंत सारख्याच समरसतेने सहभागी झालेले दोन दिग्गज या सोहळ्याला उपस्थित होते. त्यातले एक रंगमंचावर होते (पं. रामदास कामत), तर दुसरे मंचासमोर- (रामकृष्णकाका नायक). ‘मत्स्यगंधा’च्या पन्नाशीच्या वाटचालीतले हे दोन प्रत्यक्ष साक्षीदार. लेखक वसंत कानेटकर, नट-दिग्दर्शक मा. दत्तारामबापू आणि संगीतकार पं. अभिषेकी हे तिघेही काळाच्या पडद्याआड गेलेले, पण त्यांची आठवण वारंवार येत होती. खास करून बापूंची अन् बुवांची.
पं. रामदास कामत, चंद्रकांत वेर्णेेकर आणि सुमेधा देसाई हे तीन गायक कलाकार. दयानिधेश कोसंबे (तबला), दत्तराज म्हाळशी (हार्मोनिअम) व राया कोरगावकर (ऑर्गन) हे तीन वादक कलाकार आणि एका बाजूला डॉ. अजय वैद्य तर दुसर्‍या बाजूला सिद्धी उपाध्ये निवेदनासाठी असा एकूण आठ जणांचा ताफा मंचावर होता. प्रारंभापासून शेवटपर्यंत सगळे बसून. मागे फक्त एक बॅकड्रॉप, बाकी काहीही नाही. समोर मोठ्या रसिकतेने आणि औत्सुक्याने बसलेले प्रेक्षक. या अवस्थेत पावणेसहा वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम तब्बल अडीच तास चालला. एकही माणूस जाग्यावरनं हलला नाही. प्रेक्षागृहातला प्रत्येक रसिक शेवटचा पडदा पडेपर्यंत एका वेगळ्याच भारावलेल्या अवस्थेत होता. कार्यक्रम संपला तेव्हा अंतरात हुरहूर होती. काळजात कृतार्थता, डोळ्यांत अश्रू तर मनात गहिवर. नाटकाचा प्रत्यक्ष प्रयोग न पाहताही त्या अद्भुत कलाकृतीच्या गाभ्याशी असलेल्या परब्रह्माचा साक्षात्कार घडल्याची भावना सर्वांच्याच हृदयी दाटून आली होती.
सभागृहातील पडदा दूर झाला आणि डॉ. वैद्यांनी आपलं निवेदन सुरू केलं. ‘मत्स्यगंधा’ची कूळकथा थोडक्यात कथन केली. या नाटकासाठी खास पं. अभिषेकी यांनी लिहून स्वरबद्ध केलेली नांदी रामदास कामत यांच्या सुरांत सूर मिसळून चंद्रकांत व सुमेधा यांनी सादर केली.
ॐकारमय वाणी| श्रीकार गुण खाणी|
जल तेज नभ धरणी| मन बुद्धी पार पाणी॥
शक्ती शिवा भेद| षड्‌शास्त्र श्रुती देत|
लय एक वच भेद| स्थिर अचल हे प्राणी॥
हंसकिंकीणी रागात गायलेल्या या नांदीचे सूर मस्त जुळले, मात्र ध्वनियंत्रणेतील त्रुटींमुळे लयीचा परिणाम काही जाणवला नाही. तबल्यावर दयेश असताना असं का व्हावं हा प्रश्‍न मनात रुंजी घालत असतानाच डॉ. अजयनी ‘तबला नीट ऐकू आल्याशिवाय मजा नाहीच’ असं म्हणत तंत्रज्ञाना तबल्याचा माईक बदलायला लावला आणि दयेशचा ठेका अधिक सुस्पष्ट झाला. त्यानंतर सुरू झाला एक अभिनव कलाविष्कार- नाट्यसंगीत, निवेदन, संवादवाचन अशा तिन्ही अंगांनी बहरत गेलेला.
ध्वनियंत्रणा ठीकठाक करण्यात गुंतलेल्या तंत्रज्ञांकडे कटाक्ष टाकीत ‘मत्स्यगंधाच्या पहिल्या प्रयोगात मात्र असं काही झालं नव्हतं हं’ असा टोमणा मारत ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई यांनी नकार दिल्यानंतर या नाटकाचं संगीत-दिग्दर्शन गोपाळकृष्ण भोबे यांच्या शिफारसीमुळे पं. अभिषेकी यांच्याकडे कसे आले त्याची कथा डॉक्टरनी ऐकवली. ‘पं. अभिषेकी यांनी धागा पकडला तो परंपरेचाच, पण प्रत्येक वेळी वीण मात्र नवीन गुंफली’ हे सांगताना त्यांचा कंठ क्षणैक दाटून आला. आणि पाठोपाठ रामदास कामत यांच्या खड्या आवाजातील साकी घुमली-
फुलला दारी तुझ्या धीवरा
देवाघरचा ठेवाऽऽऽ
रूपगर्विता स्मरतील करतील
या सुमनाचा हेवाऽऽऽ
या क्षणापासून सुरू झाली सुरांची पखरण. ‘दूर दूर व्हा मत्स्यांनो, मी कोणी नव्हे हो तुमची’ हे सत्यवतीचं- एका रूपगर्वितेचं अवखळ गाणं सुमेधानं सर्व बारकाव्यांसहित सादर केलं. मध्यमावरच्या समेनं यमनाचं अनोखं रूप दाखवणारं ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हे नाट्यगीत पं. रामदास कामत यांनी तडफेनं सादर केलं तेव्हा रसिक श्रोते थक्क झाले. कामतांचा पराशर रंगभूमीवर अवतरला तेव्हा त्यांचं वय ३४ वर्षे होतं. पन्नास वर्षांनंतरही तोच जोम, तोच आवेश, तीच फिरत अनुभवायला मिळाली.
चंद्रकांत वेर्णेकर हा गोव्यामधला एक गुणी कलाकार. गेली अनेक वर्षे तो गातो आहे. गुरुदास नाईक, कमलाकर नाईक व चंद्रकांत वेर्णेकर ही त्रयी आम्ही शाळेत होतो तेव्हापासून गायनाचे कार्यक्रम करायची. ‘मत्स्यगंधा’त शंतनूची भूमिका करणारे श्रीपादराव नेवरेकर आज हयात नाहीत. त्यांची गाणीही आजकाल ऐकायला मिळत नाहीत. पण श्रीपादरावांची सर्व गाणी चंद्रकांतने जोरकसपणे म्हटली. ‘हिला पाहता मनी रंगली प्रिय गंगेची मूर्ती, जणू पातली या गंगेवर मम स्वप्नांची पूर्तीऽऽ गंगा मावळली, नव्हे की पुनश्‍च अवतरलीऽऽ’ ही साकी पुनरुक्तीमुळे जरा लांबली, पण नंतरची ‘संसारसुख नसे भाळी’ हे देवगंधारमधलं पद आणि बुवांनी आपल्या आवडत्या, गुरू जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडून प्रसाद म्हणून मिळालेल्या ‘जोगकंस’मध्ये बांधलेलं ‘स्त्रीप्रेमाविण जीवन अवघे झाले मातीमोल’ ही पदे आपल्या अंगभूत संयत शैलीत पेश केली. ‘पितामह तू होशील कुरूकुलाचा’ या तालमीत असलेल्या, पण नंतर नाटकातून काढलेल्या पदाचेही सादरीकरण त्यांनी यथास्थितपणे केले.
सुमेधा देसाई ही खरे म्हणजे वर्तमानकाळातील गोव्याची ‘स्वरगंधा’ आहे. सत्यवतीची भूमिका मुळातच वेगवेगळे पैलू असलेली. तिच्या गायकीतही समर्पक भाव टिपत वैविध्य राखायचा प्रयत्न बुवांनी केला. सुमेधाने या सर्व पदांना न्याय दिला. ‘गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी’, ‘तव भास अंतरा झाला मनरमता मोहना’, ‘जन्म दिला मज ज्यानी’, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’, ‘मी आता नाही आई’ या सर्वच पदांतून सुमेधाची प्रतिभाशाली गायकी प्रकट झाली.
पं. रामदास कामत यांच्याबद्दल काय बोलणार? ऐन पंच्याऐंशीच्या उंबरठ्यावर असतानाही हा श्रेष्ठ कलाकार आजही नाट्यगायनाशी समरस होतो हे एक आश्‍चर्यच म्हणायला हवं. ‘गुंतता हृदय हे’, ‘नको विसरू संकेत मीलनाचा’, ‘साद देती हिमशिखरे’ ही सर्व गाजलेली गाणी रामदासजींच्याच आवाजातून ‘याचि देही, याचि कानी’ ऐकणं हा एक अतिंद्रिय अनुभवच होता.
डॉ. अजय वैद्य आणि सिद्धी उपाध्ये यांनी आपल्या वाचिक अभिनयशक्तीचा कस लावताना कानेटकरांच्या प्रतिभाशाली लेखणीतून उतरलेले संवाद आणि स्वगतं नेमकेपणानं सादर केली. ‘साक्षात् पित्यालाही पुत्राजवळ उघड करता येऊ नये असं शल्य…’ या स्वगताच्या सादरीकरणावेळी रामकृष्णकाकांना राहून राहून दत्तारामबापूंची आठवण येत होती आणि ते आतल्या आत मुसमुसत होते. पुरुषजातीवरचा विश्‍वास उडाल्यामुळं साक्षात भीष्माशीही व्यवहारी भाषेत बोलणारी सत्यवती आणि अखेरच्या पर्वात भीष्माच्या वधाची इच्छा प्रकट करणारी, सूडाने पेटलेली अंबा या दोन्ही भूमिकांच्या रंगछटा सिद्धीने सफाईदारपणे पेश केल्या. डॉ. अजय वैद्य यांनी प्रसंगांची तसेच नाट्यगीतांची मांडणी खुबीदारपणे केली होती. मूळ नाटकातला घटनाक्रम त्यांनी या प्रयोगात मागंपुढं केला. निवेदन करता करता बरीच माहितीही पुरवली. एकंदर कार्यक्रमातून त्यांनी घेतलेली मेहनत ठळकपणे जाणवत होती.
खूप खूप वर्षांनंतर एक दर्जेदार कार्यक्रम पाहिल्याचे समाधान या सोहळ्याने दिले. उणीव भासत होती ती फक्त बुवांची आणि बापूंची. ‘दुर्दैवें आपण दुरावलो या देहीं…’ या ओळी गात गात रामदासजींनी समारोप केला तेव्हा सर्वांचीच अवस्था ‘गुंतता हृदय हे’ अशीच झाली होती.
डॉ. अजय, त्यांचे गायक आणि वादक यांची टीम, तसेच अक्षय पणजीचे उर्वरित दोन आधारस्तंभ महेश आंगले व महेश रेगे या सर्वांना लाख लाख धन्यवाद!