गोव्याच्या खाण अवलंबितांच्या प्रश्नामध्ये लक्ष घातल्याचे संकेत देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार काल आझाद मैदानावरील उपोषणकर्त्यांना भेटले. सर्वोच्च न्यायालयात हा विषय चांगल्या प्रकारे मांडला जावा यासाठी आपण केंद्रात पाठपुरावा करू असे आश्वासनही पवारांनी दिले आहे. काही दिवसांपूर्वी तिळारीच्या विषयामध्ये पवारांनी मध्यस्थी केली होती आणि नुकत्याच झालेल्या मच्छीमारांच्या आंदोलनाप्रतीही त्यांनी सहानुभूती दर्शविली. गोव्याच्या राजकीय, सामाजिक विषयांमध्ये तोंडदेखले का होईना, परंतु राष्ट्रवादीचे नेतृत्व रस घेऊ लागले आहे असाच या सार्या घडामोडींचा अर्थ होतो. खरे तर गोवा राष्ट्रवादीच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आजपावेतो खिजगणतीतही नव्हता. केवळ राजकारणातून बाहेर फेकल्या गेलेल्या विल्फ्रेड डिसोझांच्या राजकीय पुनर्वसनाच्या सोसापायी त्यांनी बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने हा पक्ष गोव्यात आणला. अंतर्गत लाथाळ्यांचे या पक्षाला लागलेले ग्रहण कधी सुटलेच नाही.
शेवटी विलींनाच पक्षाला रामराम ठोकून आपल्या समर्थकांसह बाहेरची वाट धरावी लागली. मध्ये पक्ष प्रभारी भारतीताईंनी येथे यथेच्छ गोंधळ घातला. पक्षाने राज्यात बाळसे धरलेले नसतानाच त्यांच्या चाललेल्या लाथाळ्या मात्र सर्वांच्या करमणुकीचा विषय होऊन बसला होत्या. सुरेंद्र सिरसाट यांच्याकडे पक्षाची धुरा आली खरी, परंतु पक्षाच्या विस्कळीत कारभारावर पकड ठेवणे त्यांच्या आवाक्यातले नव्हते. त्यात केंद्रीय नेत्यांनी नेहमीच गोव्याकडे दुर्लक्ष चालवले होते. मात्र, गेल्या निवडणुकीतील पानिपतामुळे असेल किंवा कॉंग्रेसची साथसंगत येथे विनासायास सत्तेकडे नेऊ शकते या धोरणी विचाराने असेल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केंद्रिय नेतृत्व येथील प्रश्नांमध्ये लुडबुडू लागले आहे. खाण अवलंबितांच्या प्रश्नामध्ये नाक खुपसून त्यांच्या प्रती सहानुभूती व्यक्त करण्यामागे आपल्या पक्षाला गोव्यात पाय रोवण्यासाठी आवश्यक असलेला पाया उभारण्याचीच धडपड दिसते. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला उत्तर गोव्याची जागा हवी आहे. तसा दावा त्यांनी यापूर्वीच केलेला आहे. दुसरीकडे कॉंग्रेस पक्ष आज गोव्यात अत्यंत गलितगात्र अवस्थेमध्ये नामधारी होऊन उरलेला आहे. अशा परिस्थितीत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा विचार जर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बळावला असेल तर त्यात वावगे काही नाही. परंतु केवळ वरवरची संवेदना दाखवून जनतेचा विश्वास कमावता येत नसतो. सुरवातीपासून राष्ट्रवादी हे येथे पडेल उमेदवारांसाठी लॉंचिंग पॅड होऊन बसले आहे. त्या प्रतिमेतून बाहेर पडून स्वतःचा ठसा येथील राजकारणात आणि त्याच्या आधी येथील समाजकारणात उमटवण्याची प्रामाणिक धडपड जर पक्ष करणार असेल तरच मतदारांकडून त्यांना थोडा फार प्रतिसाद मिळू शकतो. आपणच प्रश्न निर्माण करायचे आणि नंतर आपणच ते सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दाखवून श्रेय लाटायचे हा प्रकार तिळारीच्या आंदोलनात दिसून आला. आता खाण अवलंबितांच्या प्रश्नामध्ये चाललेली लुडबूडही काही न करता श्रेय लाटण्याचा तर प्रकार नव्हे ना, अशी रास्त शंका जनतेच्या मनात आहे. पक्षाला गोव्यात विस्तार करायचा आहे या घोषणा आतापावेतो अनेकदा झाल्या. नवे चेहरे आणू, समित्या बदलू, यंव करू आणि त्यंव करू च्या बाता यापूर्वी पक्षाचे अनेक नेते येऊन करून गेेले. सदस्यत्व नोंदणी दुप्पट करू, राज्यात विधायक उपक्रम राबवू आणि जनतेचे प्रश्न घेऊन आंदोलने करू असा तिहेरी कृतिकार्यक्रम गतवर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाने जाहीर केलेला होता. या तिन्ही आघाड्यांवर फार काही कार्य झाले आहे असे वाटत नाही. प्रत्यक्षात जनतेला तरी काही बदल जाणवलेला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर जनतेने पक्षाला भुईसपाटच केले. राष्ट्रवादीला खरोखर जर गोव्यात जम बसवायचा असेल, स्वतःचा प्रभाव निर्माण करायचा असेल आणि कॉंग्रेसच्या निर्नायकीपणातून निर्माण झालेली प्रबळ विरोधकाची पोकळी भरून काढायची असेल तर पर्यटकाप्रमाणे येऊन येथील प्रश्नांमध्ये वरवरचे लक्ष घालणे हे त्या दिशेने पाऊल ठरू शकत नाही. खाण अवलंबितांचा प्रश्न तर न्यायालयापुढे आहे. पवारांपाशी अशी कोणतीही जादूची कांडी नाही की तो प्रश्न सुटेल. तरीही उद्या कायदेशीर खाण बंदी उठली तर त्याचे श्रेय उपटण्याची तरतूद मात्र त्यांच्या या दौर्याने करून ठेवली आहे.

