Home Featured मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 7501 अर्ज प्राप्त

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 7501 अर्ज प्राप्त

0

नावे वगळण्यासाठी 7284 अर्ज

राज्यातील मसुदा मतदार यादीतील नावाबाबत आक्षेप आणि दावे सादर करण्याची मुदत काल पूर्ण झाली असून 19 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत नवीन मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 7501 आणि नाव वगळण्यासाठी 7284 अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती काल मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

राज्यातील मतदार यादीचे विशेष सखोल पुनरावलोकन करून मसुदा मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील अंतिम मतदार यादी फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर केली जाणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मसुदा मतदार यादी जाहीर केल्यानंतर 16 डिसेंबर ते 16 जानेवारी 2026 पर्यत दावे आणि आक्षेप सादर करण्यासाठी मुदत दिली आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने मसुदा मतदारयादीबाबत आक्षेप आणि दावे दाखल करण्याची मुदत 19 जानेवारी 2026 पर्यंत वाढविली.

येथील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 19 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी (अर्ज क्र. 6, 6 अ) 7501 अर्ज आणि मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी (अर्ज क्र. 7) एकूण 7284 अर्ज प्राप्त झाले आहेत.
राज्यातील मसुदा मतदार यादी जाहीर करण्यापूर्वी मतदार यादीत नावाच्या समावेशासाठी 4463 अर्ज सादर करण्यात आले आहे. तसेच, मतदार यादीत नाव वगळण्यासाठी 948 अर्ज प्राप्त झाले आहे. गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे. गोमंतकीय नागरिकांची नावे किचकट प्रक्रियेमुळे वगळली जात आहेत. त्यामुळे एसआयआरला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.

कॉंग्रेस पक्षाने मसुदा मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी दिवसाला 10 अर्ज स्वीकारण्याच्या नियमाचे उल्लंघन केले जात असल्याची तक्रार सीईओ कार्यालयाकडे केली आहे.