आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा सल्ला
बीएलओ असल्याचे भासवत ओटीपी, बँक खात्यांचे तपशील मिळवण्याचा प्रयत्न
राज्यात सध्या मतदारयाद्यांचे सखोल पुनरावलोकन (एसआयआर) असून, त्याच दरम्यान काही घोटाळेबाज एसआयआरच्या नावाखाली मतदारांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी फोन करत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, बीएलओ कधीही ओटीपी किंवा बँक खात्यांचे वैयक्तिक तपशील विचारत नाहीत. त्यामुळे मतदारांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद फोन किंवा संदेशांना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने काल केले.
राज्यात बेीएलओ असल्याचे भासवून मतदारांना फोन करून त्याच्या बँक खात्यांची माहिती मिळवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) असल्याचे भासवून ओटीपी मिळविण्यासाठी मतदारांना फोन केला जात असल्याच्या तक्रारीनंतर गोवा मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) कार्यालयाने सतर्क राहण्याची सूचना जारी केली आहे.
हे घोटाळेबाज मतदारांच्या बँक खात्यांमधून पैसे मिळवण्यासाठी वैयक्तिक माहितीचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणूक कार्यालयाचे बीएलओ कधीही ओटीपी किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाहीत. मतदारांनी सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद फोन किंवा संदेशांना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे. मतदार टोल-फ्री हेल्पलाइन 1950 वर कॉल करून बीएलओंच्या तपशिलांची पुष्टी करू शकतात. मतदारांनी कधीही ओटीपी शेअर करू नये, तसेच कधीही संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये आणि कधीही अज्ञात संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

