मिळालेल्या माहितीनुसार, ओडली येथील एक युवती म्हापसा येथे राहत होती, तिला नावेली येथील ऍड्रीन फर्नांडिस (२२) या तरुणाने कोलवा येथे नेले व बलात्कार केला. या प्रकरणी नातेवाईकांनी तक्रार करताच पोलिसांनी ऍड्रीन याला अटक केली. या प्रकरणी आणखी एकाचा समावेश असून निरीक्षक उत्तम राऊत देसाई तपास करीत आहेत.
मडगाव येथील घटनेत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार नोंदविली असून पोलीस तरुणाच्या शोधात आहेत.
दोन दलालांना अटक; दोन युवतींची सुटका
मुुंबई येथील तरुणींना वेश्याव्यवसायात गुंतविणार्या फिरोश शेख (३८) व श्याम मिश्रा (५०) या दोघा दलालांना मडगाव पोलिसांनीअटक करून दोन तरुणींची सुटका केली.
हे दोघे दलाल मुंबई येथील असून फोन करून ग्राहकांना तरुणी पुरवायचे. मडगाव पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी बनावट ग्राहक बनून जुन्या रेल्वे स्थानकाकडील एका हॉटेलात बोलावले व पकडले. पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.
दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची तक्रार
सुकूर व कुंभारजुवे येथे दोन वेगवेगळ्या घटनांना दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या तक्रारी अनुक्रमे पणजी व जुने गोवे पोलीस स्थानकात नोंदविण्यात आल्या आहेत.
आपल्या अल्पवयीन बहिणीचे अपहरण चिंबल येथील नितीन सुरेश हेगडे याने काल केल्याची तक्रार सुकूर येथील एका युवकाने पणजी पोलिसांत केली आहे.
आपली बहिण काल सकाळी ७.३० च्या दरम्यान कॉलेजला चालली असता नितीन हेगडे याने तिचे अपहरण केल्याची तक्रार सदर युवकाने केली आहे. पणजी पोलिसानी तपास सुरू केला असता त्यांच्याकडील मोबाईलवरून ती दोघेही बेळगावला असल्याची माहिती पणजी पोलिसाना मिळाल्यानंतर पोलिसानी एक पथक बेळगावला पाठवले आहे.
दुसर्या प्रकरणात काणकोण येथील निखिल पागी यांनी ९ जुलै रोजी आपल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार कुंभारजुवे येथील एका महिलेने जुने गोवे पोलिसांत केली आहे. जुने गोवे पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास चालू आहे.