Home बातम्या मडगाव येथे छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

मडगाव येथे छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

0

काल पहाटे पाच वाजता कोलमरड येथील बंगल्यात आरडाओरड होत असल्याची तक्रार तेथील लोकांनी मडगाव पोलीस स्थानकावर करताच उपनिरीक्षक रवी नाईक फौजफाट्यासह घटनास्थळी गेले. पाहतो तो दरवाजाला बाहेरून कडी लावण्यात आल्याचे दिसले. आत महिलांच्या रडण्याचा आवाज येत होता. पोलिसांनी कडी काढून दरवाजा उघडायला लावले. आत अश्रफ कुरेशी (मुंबई) व दोन महिला होत्या. त्या आतून सुटकेसाठी प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले. त्या दोन्ही तरुणी मुंबई येथील असून त्यांना वेश्या व्यवसायासाठी अश्रफ कुरेशी याने गोव्यात आणले होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली.

तपासाअंती कोलमरड येथील सदर बंगला एका मुस्लीम महिलेचा असून ती मुंबईला राहते. तिने तो बंगला कोलकता येथील बाबू बंगाली याला भाड्याने दिलेला आहे. त्यात बाबू व त्याची पत्नी अशी दोघे राहातात.

गोव्यातील वेश्या व्यवसायाचे सूत्रधार बाबू बंगाली व त्याची पत्नी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अश्रफ कुरेशी मुंबई व इतर भागांतून तरुणींना फूस लावून गोव्यात आणून बाबू बंगालीच्या व त्याच्या पत्नीच्या हवाली करीत असे. हा व्यवसाय कित्येक काळापासून या बंगल्यातून चालत होता. याच बंगल्यातून अनेक तरुणींना मडगाव तसेच गोव्यातील अनेक हॉटेलांत पुरविले जाई. राय – तळे कुडतरी येथे एक फार्महाऊस असून तेथे कित्येक वर्षांपासून वेश्या व्यवसाय चालतो. त्या फार्म हाऊसचा व्यवस्थापक अब्बास मोहिद्दीन या बंगल्यातून तरुणींना नेऊन व्यवसाय चालवित असे अशी माहिती पोलिसांनी दिली. या बंगल्यातील एका तरुणीला तेथे नेले होते, परंतु छापा टाकला गेल्यानंतर ती सापडू शकली नाही. पोलिसांनी अब्बास मोहिद्दीन याला अटक केली आहे.

गेल्या तीन दिवसांपूर्वी अश्रफ कुरेशी याने तीन महिलांना मुंबई येथून आणून या बंगल्यात ठेवले होते. काल एका तरुणीला घेऊन तो रायतळे येथे गिर्‍हाईकाला सोपवण्यासाठी गेला होता. मात्र, छाप्यानंतर ती तरुणी सापडू शकली नाही. दीड वर्षांपूर्वी मायणा – कुडतरी पोलिसांनी याच फार्महाऊसवर छापा टाकून व्यवस्थापक व कर्मचार्‍यांसह पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर फार्म हाऊसला उपजिल्हाधिकार्‍यांनी टाळे ठोकले होते, पण न्यायालयाने ती बंदी उठवली. आता पुन्हा तेथे वेश्या व्यवसाय सुरू झाला आहे असे पोलिसांनी सांगितले.

कोलमरड येथील सदर बंगला म्हणजेही वेश्या पुरवणारी कोठी बनली असून किती वर्षांपासून येथे हा व्यवसाय चालत आला आहे, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.