मडगाव येथे अट्टल गुन्हेगाराला अटक

0
97

नागमोडे-नावेली येथे गेल्या दीड वर्षापासून राहणार्‍या व खुनाच्या आरोपाखाली नाशिक तुरुंगात शिक्षा भोगणारा मुस्ताक अहमद गुलाम कंरबलेकर (३५) याला मडगाव पोलिसांनी अटक करून त्याच्याकडील पिस्तुल, गोळ्या जप्त केल्या. तो वापरत असलेली स्वीफ्ट कारही ताब्यात घेतली असून मडगाव येथे राहून अतिरेक्यांशी वा गुंडाशी संबंध ठेवून होता काय याचा तपास पोलीस लावत आहेत. सध्या त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.मुस्ताक अहमद करंबलेकर हा शिवाजीनगर, मिल्कनगर रत्नागिरी येथील असून २००७ मध्ये त्याने फैयाज शकील याचा खून केला होता. याप्रकरणी २०१० मध्ये मुंबई न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगत असताना तीन महिन्यासाठी पॅरोलवर मुक्त केले होते. त्यानंतर तो नाशिक तुरुंगात शरण आला नव्हता. नावेली येथील नागमोडे येथे फेलिना कोस्तासियो रूझारियो कुलासो याच्या घरात भाड्याने खोली घेऊन एकटाच राहत होता. तो तिच्या घरात साहील वाझीर सोलकर, मुंबई हे बनावट नाव धारण करून राहात असे. तसेच या परिसरात याच नावाने वावरत होता. फेलिना हिने दीड वर्षापूर्वी त्याला घर भाड्याने देवूनही पोलिसाना फॉर्म भरून माहिती दिली नव्हती.
मुस्ताक अहमद करंबलेकर हा एमएच- १२ एयू- ३४९५ क्रमांकाच्या स्वीफ्ट कारने फिरत असे. सकाळी ९ वा. नावेली उड्डाण पुलाच्या पायथ्याशी असलेल्या ऑटो गॅरेजजवळ आपली गाडी ठेवत असे व फोनवरून तासनतास बोलत असे. दुपारी १२ वा. घरी परतून सायंकाळी ५ वाजता कार घेऊन पुन्हा गॅरेजजवळ येई व रात्रौ ९ वाजता परतत असे. हा त्याचा नित्यक्रम होता. पण त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने पोलिसांनी दोन दिवस पाळत ठेवली व काल त्याला ताब्यात घेवून तपासणी केली असता त्याच्या अंगावरील कपड्यात अमेरिकी बनावटीचे पेट्रो बेरोरो हे पिस्तुल सापडले. त्यात तीन गोळ्या होत्या.
मडगाव पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांनी चौकशी केली असता त्याने आपले नाव साहील वाझीर सोलकर, साईन-मुंबई असे सांगितले. त्यानंतर पोलिसानी वडाला मुंबई पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता या नावाचा कोणीच माणूस नसल्याचे आढळून आले. रात्रौ उशीरा सखोल तपास करताना त्याचे नाव मुस्ताक असल्याचे समजले. पोलिसांनी गाडी, खोलीची कसून झडती घेतली. तो मोबाईलवरून फोन कोणाला करीत होता याचा तपास चालला आहे.
पोलिसानी जप्त केलेली कार नारायण प्रसादी यांच्या नावावर आहे. त्याचाही तपास चालू आहे. दीड वर्षापासून पोलिसाना चकवून तो काय करीत होता याचा तपास चालू आहे. कोणतीच माहिती न देता घर भाड्याने दिलेल्या घरमालकाची चौकशी करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.