मडगाव अर्बन सहकारी बँकेच्या आमसभेत उपस्थित भागधारकांनी बँकेची डबघाईस आलेली आर्थिक स्थिती, करोडो रुपयांच्या कर्ज वसुलीस आलेले अपयश, एसबीआयच्या ५० कोटींच्या रोख्यासंबंधी प्रश्नांचा भडीमार करून अध्यक्ष रमाकांत आंगले यांना धारेवर धरले. तसेच रिझर्व बँकेने ही परिस्थिती सुधारण्यासाठी सुधारीत योजना सादर करण्याचा आदेश दिला असून त्या योजनेस मंजुरी दिली. ५० कोटींच्या रोख्यांच्या घोटाळ्याची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
रमाकांत आंगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपाध्यक्ष नार्वेकर, रूपेश महात्मे इतर संचालक उपस्थित होते. सकाळी १० वाजता सुरू झालेली बैठक साडेचार तास चालली. खनिज वाहतूक करणार्यांना ट्रक घेण्यासाठी दिलेले ५० कोटींचे कर्ज, बार्ज मालकांना कर्ज, ५० कोटींच्या रोखे यावर गरमागरम चर्चा झाली. बार्ज मालकांनी कर्जात ३० टक्के सुट देण्याची मागणी केली.

