मडकई-कुंडई बगल रस्त्यावर भीषण अपघात ः २ युवक ठार

0
129

मडकई-कुंडई बगल रस्त्यावर काल दुपारी मालवाहू ट्रक व मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन दोघेजण जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेले दोघेही युवक जुने गोवे येथील आहेत. आकाश महादेव होसमणी (वय १९) व रितेश चंद्रकांत कुडीनूर (वय २०) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

अपघातात ठार झालेले दोघेही युवक मडकई येथील एका औद्योगिक आस्थापनात नोकरीसाठी मुलाखत द्यायला आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या दोघांबरोबर आणखी एका मोटरसायकलवरून त्यांचे मित्रही नोकरीसाठी आले होते. हे मित्र पुढे होते तर त्यांच्यामागून अपघातग्रस्त युवक मोटरसायकलने येत होते. कुंडई-मडकईच्या या रस्त्यावरील वळणावर भरधाव मोटरसायकलची समोरून येणार्‍या मालवाहू ट्रकला ठोकर बसली.

मडकई औद्योगिक वसाहतीतून जुने गोवे येथे जीए०७ एडी-९१४२ या क्रमांकाच्या मोटरसायकलने हे दोघेही युवक जुने गोवे येथे परतत होते, तर लोखंड वितळविण्यासाठी वापरण्यात येणारे अवजड रॉड घेऊन जीए-०५ टी-१४९२ या क्रमांकाचा ट्रक मडकई औद्योगिक वसाहतीतील लोह प्रकल्पाकडे जात होता.

मडकई – कुंडई येथील बगल रस्त्यावरील वळणावरच या दोन्ही वाहनांची जोरदार टक्कर झाली. या अपघातात मोटरसायकलवरील स्वार आकाश होसमणी व रितेश कुडिनूर यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन ते रस्त्याच्या कडेला फेकले गेले. अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने लगतचे लोक घटनास्थळी आले. रस्त्यावरून जाणारी वाहनेही यावेळी थांबवण्यात आली.
समोरासमोर टक्कर झाल्याने मोटरसायकल ट्रकच्या पुढील दोन्ही चाकांच्या मध्ये अडकली. दुपारचा वाढलेला उष्णतेचा पारा, त्यातच दुचाकीमधील इंधनाला गळती लागल्याने अचानकपणे दुचाकीने पेट घेतला. ही आग ट्रकच्या केबिनला लागली. प्रसंगावधान राखून घाबरलेल्या ट्रकचालकाने बाहेर उडी घेतली त्यामुळे तो बचावला. ट्रकचालकाचे नाव रामबळी भजनाथ चौधरी (वय ४४) असे असून त्याला फोंडा पोलिसांनी अटक केली. आग वाढल्याने मोटरसायकलच्या टाकीचा मोठा स्फोट झाला. यावेळी अग्निशामक दलाला कळवल्यानंतर पाण्याचा बंब वापरून आग विझवण्यात आली.