श्री गोकर्ण पर्तगाळी मठात सार्ध पंचशताब्दी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
श्री गोकर्ण पर्तगाळी मठातील सार्ध पंचशताब्दी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोचली असून प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत कामे देखील पूर्णत्वाकडे पोचलेली आहेत. प्रवेश द्वाराजवळ उभारण्यात आलेल्या 77 फूट उंचीच्या श्री प्रभू रामचंद्रांच्या कास्य पुतळ्याचे काम देखील पूर्णत्वाकडे आलेले असून कारागिर अंतिम टप्प्यातील कामाकडे लक्ष देत आहेत.
श्री गोकर्ण पर्तगाळी मठाच्या मुख्य पथावर गुरु परंपरेचा महिमा दाखवितानाच आजवरच्या मठ परंपरेतील 23 स्वामी महाराजांच्या नावे खास प्रवेशद्वारे उभारण्यात आली आहेत. ते काम सद्या चालू असून सर्वात पुढे 1457 ते 1517 कालातील प. पू. श्रीमद् नारायण तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांच्या स्मरणार्थ खास प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. त्यानंतर 1517 ते 1518 या कालातील श्रीमद् वासुदेव तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज, 1518 ते 1588 मधील श्रीमद् जीवोत्तम तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, 1588 मधील श्रीमद् पुरुषोत्तम तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, 1588 ते 1637 मधील श्रीमद् अणु जीवोत्तम तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज, 1637 ते 1665 मधील श्रीमद रामचंद्र तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज, 1665 ते 1669 मधील श्रीमद् दिग्वीज रामचंद्र तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज, 1669 ते 1682 मधील श्रीमद् रघुचंद्र तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज, 1682 ते 1703 मधील श्रीमद् लक्ष्मीनारायण तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज, 1703 ते 1707 मधील श्रीमद् लक्ष्मीकांत तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, 1707 ते 1750 मधील श्रीमद् रमाकांत तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, 1750 ते 1757 मधील श्रीमद् कमलाकांत तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, 1757 ते 1786 मधील श्रीमद् श्रीकांत तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, 1786 ते 1803 मधील श्रीमद् रामचंद्र तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, 1803 ते 1804 मधील श्रीमद् रामनाथ तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, 1804 ते 1822 मधील श्रीमद् लक्ष्मीनाथ तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, 1822 ते 1828 मधील श्रीमद् आनंद तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, 1828 ते 1879 मधील श्रीमद् पद्मनाभ तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, 1892 ते 1842 मधील श्रीमद् इंदिराकांत तीर्थं श्रीपाद वडेर स्वामीजी, 1942 ते 1943 मधील श्रीमद् कमलानाथ तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, 1943 ते 1973 मधील श्रीमद् द्वारकानाथ तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी आणि या मठाचे 23 वे स्वामीजी आणि विद्यमान स्वामीजी श्रीमद् विद्याधिश तीर्थ स्वामी महाराजांचे गुरुस्वामी असलेल्या श्रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामी महाराजांच्या नावे या ठिकाणी खास प्रवेद्वारांना नावे देण्यात आली आहेत.
प्रत्यक्ष महोत्सवाला 27 नोव्हेंबर पासून सुरूवात होणार आहे. 26 रोजी श्री ब्रदीनाथ येथून 19 ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या श्रीराम दिग्विजय रथाचे आगमन पर्तगाळी मठात होणार आहे.
या दिग्विजय रथाच्या स्वागताची जय्यत तयारी या ठिकाणी सध्या चालू आहे. पर्तगाळी मठाधिश श्रीमद् विद्याधिश तीर्थ स्वामी महाराजांनी चातुर्मास व्रत सांगतेच्या वेळी या दिग्विजय रथाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीत रथ यात्रेला प्रारंभ झाला होता. 26 रोजी प. पू. स्वामी महाराज पर्तगाळी मठात या दिग्विजय रथाचे स्वागत करणार
आहेत.

