मच्छिमारांना ‘सागरमित्र’ बनवणार : एल. मुरुगन

0
5

>> धोरणात सुधारणा करणार; गोव्यासाठी ३८ सागरमित्र मंजूर; मत्स्योद्योग दिन साजरा

गोव्यातील मत्स्योत्पादनात २५ टक्के वाढ झाली असून, महसुलात जवळपास ४० टक्के वाढ झाली आहे. मच्छीमारांना ‘सागरमित्र’ बनविण्यासाठी मत्स्योद्योग धोरणात सुधारणा केली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मत्स्योद्योग राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी जागतिक मत्स्योद्योग दिन कार्यक्रमात बोलताना येथे काल केली.
केंद्रीय मंत्रालयाने गेल्या आठ वर्षांत मत्स्य उत्पादन, निर्यात आणि पायाभूत सुविधांच्या विकासात सुधारणा करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने मत्स्यपालनासाठी पीएमएसएसवाय योजनेअंतर्गत २० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. स्थानिक मच्छीमार सागरमित्र व्हावेत, यासाठी सुधारित धोरण तयार केले जाणार आहे. गोवा सरकारला ३८ सागरमित्र मंजूर करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील तरुणांनी मच्छीमारी व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मच्छीमारी व्यवसायासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत. त्यांना सरकारकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाणार आहे, असे राज्याचे मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.
गोव्याची अर्थव्यवस्था खाण व्यवसाय आणि पर्यटनावर अवलंबून आहे. तसेच ती मासेमारीवरही अवलंबून आहे. राज्यात मच्छीमारी व्यवसाय करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे, असेही हळर्णकर यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुरुगन यांनी लाभार्थ्यांना केसीसी कार्ड, मासे विक्रेता कार्ड आणि विविध योजना आणि व्हीआरसी अंतर्गत मंजुरी आदेशांचे वाटप केले. तसेच या प्रसंगी फिश ट्रेल, नवीन नागरिक सनद देखील जारी केली. त्यानंतर मत्स्योद्योग खात्याच्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. व्हर्टिओकल क्रॅब युनिटसाठी डबिन्स्की डी सोरेस, सौर ट्रॉलरसाठी मारियानो पेड्रो गुर्जाव, पारंपरिक मासे सुकवण्याच्या पद्धतीसाठी क्रिस्टो फर्नांडिस, संवर्धन क्षेत्रातील कार्याबद्दल अशोक गुव्हाणे, ऑगस्टिन्हो लोबो आणि शानू चोडणकर यांना सर्वांत वृद्ध मच्छीमार, सर्वांत जुने मच्छिमार रेमेडिओस क्रॅस्टो, सर्वांत जुने ट्रॉलरमालक गजानन सावंत, ताडालिनो ई कोलाको ई रॉड्रिग्स, राजश्री जोशी यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मत्स्यव्यवसाय संचालनालयातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचाही सत्कार करण्यात आला. मत्स्योद्योग खात्याच्या संचालिका डॉ. शमिला मोंतेरो यांनी स्वागत केले.