मंदारला न्याय मिळो

0
13

वीस वर्षांपूर्वी गोव्याला हादरवून सोडणाऱ्या मंदार सुर्लकर अपहरण व हत्या प्रकरणात प्रदीर्घ न्यायालयीन लढाईअंती दोषी ठरलेल्या सर्व नराधमांची शिक्षा पुनरावलोकन मंडळाच्या शिफारशीमुळे उच्च न्यायालयाने नुकतीच सुटका केली. ह्या सुटकेविरुद्ध आता मंदारचे वडील दीपक सुर्लकर सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. संपूर्ण गोव्याने आज सुर्लकर कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे. एक पिता आपल्या एकुलत्या एका मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी देशाच्या सर्वोच्च न्याययंत्रणेपुढे हात पसरून उभा आहे. त्यांच्या एकुलत्या एक मुलाची निव्वळ पन्नास लाखांच्या खंडणीसाठी प्रतिष्ठित कुटुंबांतील काही लाडावलेल्या मुलांनी अगदी सराईत गुन्हेगारांसारखा कट रचून, अपहरण करून अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि मृतदेह आर्ल – केरी येथे निर्जनस्थळी टाकला होता. एक कोवळा जीव उमलण्याच्या वयात आपल्यातून निघून गेला. एक हसते खेळते कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. कोवळ्या, निष्पाप मंदारला ज्या तऱ्हेने ह्या सैतानांनी ठार मारले ते पाहिले तर अशा गुन्हेगारांना दयामाया दाखवणे कितपत योग्य ठरते, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. ज्यांनी त्याचे अपहरण केले ते कायदा महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यांनी चालवलेले एक नियतकालिक तोट्यात गेले. मग ते पैसे भरून काढण्यासाठी त्या नियतकालिकाला जाहिरात देणाऱ्या आपल्याच ह्या मित्राच्या हत्येचा कट त्यांनी रचला. एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला गोव्यात कार्यक्रम करायचा आहे आणि त्यांना डीजे हवा आहे असे सांगून त्यांनी मंदारला कारमध्ये बसवले आणि उसकईतील एका घरात नेऊन त्याच्याकडून जबरदस्तीने वडिलांकडे खंडणी मागणारा फोन कॉल ध्वनिमुद्रित केला. ती खंडणी न मिळाल्याने मंदारची त्यांनी अत्यंत निर्दयपणे हत्या केली. त्याच्या तोंडावर चिकटपट्ट्या काय बांधल्या, त्याला सोफ्याला काय जखडून ठेवले, त्याला गुंगी यावी म्हणून सिरिंज भरून व्होडकाची इंजेक्शने काय दिली, आणि तरीही तो शुद्धीवर असल्याचे पाहून बेसबॉलच्या बॅटने त्याचे डोके फोडले गेले. अमानुषपणाची हद्द याहून दुसरी काय असते? एवढे करूनही हे सैतान थांबले नाहीत. त्यांनी त्याचा मृतदेह आर्ल – केरी येथे निर्जनस्थळी फेकून दिला आणि वर जणू काही घडलेच नाही अशा थाटात मंदारच्या वडिलांच्या सांत्वनासाठीही दाखल झाले. आपणही मंदारचा शोध घेत असल्याचा आवही त्यांनी आणला. पणजीपर्यंत तो आमच्यासोबत होता, मग कोणी तरी त्याला कारमध्ये बसवून घेऊन गेले असा बनाव त्यांनी रचला. पण पोलीस यंत्रणा अशा गुन्हेगारांची बाप असते हे ते विसरले. ह्या टोळक्याला स्वतंत्रपणे मिरामारला नेऊन मंदार दुसऱ्या कारमध्ये नेमका कुठे बसला हे दाखवायला पोलिसांनी सांगितलेे, तेव्हा क्षणार्धात त्यांचे बिंग फुटले. तत्कालीन पोलीस अधीक्षक महेश गावकर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ह्या गुन्हेगारांविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले. आरोपींच्या वकिलांनी त्यांच्या बचावाचा अगदी आटोकाट प्रयत्न केला, परंतु ह्या खटल्यात पोलिसांनी उभ्या केलेल्या 57 साक्षीदारांपैकी एकही उलटला नाही आणि त्यामुळे बाल न्यायालयाने 2014 मध्ये ह्या गुन्हेगार टोळक्याला दोषी धरून जन्मठेप सुनावली. पुढे 2019 साली उच्च न्यायालयानेही ती कायम केली. मात्र आता त्यांनी पुरेशी शिक्षा भोगल्याचे कारण देत त्यांची सुटका केली गेली आहे. एका कोवळ्या मुलाच्या निर्घृण हत्येची पुरेशी शिक्षा खरेच ह्या गुन्हेगारांनी भोगली आहे काय? ह्या गुन्हेगारांना न्यायालयाकडून जो दंड ठोठावला गेला होता, त्याची रक्कमही त्यांनी भरलेली नसल्याचे मंदारच्या वडिलांचे म्हणणे आहे. एवढा क्रूर गुन्हा करूनही आणि तो सर्वतोपरी शाबीत होऊनही अशा गुन्हेगारांना जर दया दाखवली जात असेल तर कुठेतरी काहीतरी नक्कीच चुकते आहे अशी जनभावना आहे. ह्या हत्या प्रकरणातील सूत्रधार प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. परंतु पैसा असला म्हणजे संस्कार असतातच असे नाही. किंबहुना ते नसण्याचीच अधिक शक्यता असते. आपल्या मित्राच्या हत्येचा अपहरण आणि हत्येचा कट रचून अत्यंत सराईतपणे तो प्रत्यक्षात उतरवणाऱ्या ह्या नराधमांना आजवर झालेली शिक्षा पुरेशी नक्कीच नाही. दयामाया दाखवण्याजोगी कोणतीही कृती त्यांच्याकडून घडलेली नाही. मंदारचे वडील आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहेतच. सर्वोच्च न्यायालय नक्कीच त्यांना न्याय देईल अशी अपेक्षा आहे. समाजामध्ये अशा हादरवून सोडणाऱ्या घटना घडतात, तेव्हा त्यामागे असलेल्या सैतानांना त्यांच्या कृत्यांची कठोरातील कठोर सजा मिळावी अशी समाजाची अपेक्षा असते. कोवळ्या मंदारचे प्राण घेणाऱ्या सैतानांनाही ती मिळावी असे आम्हाला वाटते. न्यायदेवता निश्चितपणे न्याय देईल अशी अपेक्षा करूया!