किनारी भागातील रेव्ह पार्ट्यांवर कारवाई करणार्या पोलीस अधिक्षक विजय सिंग यांच्यावर सरकारातील मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी केलेली टीका अशोभनीय असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर या विषयावर मौन बाळगून असल्याचा दावा प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
रेव्ह पार्ट्यांचे समर्थन करणे म्हणजे नैतिक दिवाळखोरी असल्याचे सांगून कॅसिनो किंवा अंमली पदार्थांच्या मेजवान्यातून मिळालेला पैसा हा राज्याला नको आहे, असे ते म्हणाले. भाजपचे प्रवक्ते डान्स बार व कॅसिनोचे समर्थन करीत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पठिंब्याशिवाय त्यांना असे समर्थन करण्याचे धाडस होऊच शकत नाही, असे त्यांनी सांगितले. सरकार उच्चार स्वातंत्र्याच्या तत्वाचीही गळचेपी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. गोव्याचे प्रसिध्द राजकीय गायक फ्रान्सिस द तुयें यांच्यावर जी कारवाई झाली हे त्याचेच उदाहरण असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत अध्यक्ष निळकंठ हळर्णकर उपस्थित होते.