मंत्रिमंडळात तूर्त फेरबदल नाहीच

0
5

भाजप प्रदेशाध्यक्षांची स्पष्टोक्ती; फेरबदलाबाबत निव्वळ अफवा

राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार आहे. मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते प्रथम भाजप पक्ष संघटनेला माहिती देतील; मात्र मुख्यमंत्र्यांनी आम्हांला अजूनपर्यंत त्याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. तसेच, मंत्रिमंडळ फेररचनेबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत सध्या सुरू असलेली चर्चा ही निव्वळ अफवा आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत मागील काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना तानावडे यांनी मंत्रिमंडळात सध्या तरी कोणतेही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले.
कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप नेते बेळगाव आणि उत्तर कर्नाटकात प्रचारासाठी जाण्यासाठी दाबोळी किंवा मोपा विमानतळावर उतरून पुढे कारने कर्नाटकात जातात. त्यामुळे एखाद्या केंद्रीय नेत्याचे गोव्यात आगमन झाल्यानंतर मंत्रिमंडळ बदलांबाबत चर्चा सुरू होते, असा दावाही तानावडे यांनी केला.

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री, बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी भाजपचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते, त्यावरही विचारलेल्या प्रश्नाला तानावडे यांनी उत्तर दिले. आलेमाव यांचा पाठिंबा घेण्यात गैर काहीच नाही. त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांनी मागील पाच वर्षे भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. त्याचा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला होऊ शकतो, असेही तानावडे यांनी सांगितले.

…म्हणून चर्चांना होते सुरुवात : तानावडे
कर्नाटकात सध्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रातील भाजप नेते बेळगाव आणि उत्तर कर्नाटकात जात असून, त्यांना गोव्यातील दाबोळी आणि मोपा ही विमानतळे सोयीची ठरतात. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेत्यांचे गोव्यात आगमन होत असल्याने राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होतील अशा चर्चा सुरू होतात, असे सदानंद शेट तानावडे म्हणाले.

…म्हणून उमेदवारांची नावे जाहीर
फोंडा आणि साखळी नगरपालिका मंडळ निवडणुकीत भाजपने समर्थन दिलेले उमेदवार विजयी होतील, असा विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला. या दोन्ही नगरपालिका क्षेत्रात निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजप समर्थक उमेदवारांबाबत मतदारांच्या मनात सभ्रंम राहू नये म्हणून भाजपने दोन्ही नगरपालिका क्षेत्रात भाजप समर्थक उमेदवारांची नावे जाहीर केली, असेही त्यांनी
सांगितले.

100 व्या ‘मन की बात’चे
सर्व मतदारसंघात थेट प्रक्षेपण

सर्व क्षेत्रातील मान्यवरांना सहभागी करून घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या 30 एप्रिल रोजी होणारा ‘मन की बात’चा 100 वा कार्यक्रम आगळ्यावेगळ्या पद्धतीने भाजप साजरा करणार आहे. राज्यातील चाळीस मतदारसंघात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त इतरांनाही सामावून घेतले जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बातब या कार्यक्रमातून कुठल्याही प्रकारची राजकीय भूमिका मांडली जात नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीची दखल घेतली जाते. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी गोव्यातील कावी चित्र कलाकार सागर मुळे, रांगोळी कलाकार दत्तगुरू वांतेकर, दिव्यांग महोत्सव आदींचा उल्लेख केला होता, असे तानावडे यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या 100व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे चाळीस मतदारसंघातील 1250 मतदान केंद्रावर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान 10 कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त नागरिकांचा समावेश करून घेतला जाणार आहे. भाजपचे कार्यकर्ते नसलेल्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रातील विविध मान्यवरांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले जाणार आहे. पक्षाचे मंत्री, आमदार आपल्या मतदारसंघातील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, असेही तानावडे यांनी सांगितले.

भाजपतर्फे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाखाली 30 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता पणजी येथील सम्राट थिएटर सभागृहात गुजरात आणि महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांस्कृतिक, खाद्य संस्कृतीचे आदानप्रदान केले जाते, असे तानावडे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांची उपस्थिती होती.