Home बातम्या मंगलमयी प्रकाशपर्व- दिवाळी

मंगलमयी प्रकाशपर्व- दिवाळी

0

– डॉ. पांडुरंग फळदेसाई

मंगलमय अशा दिवाळीचे प्रकाशपर्व येत्या आठवड्यात साजरे होणार आहे. आपल्या संपूर्ण देशभर हा सण साजरा केला जाणार आहे. केरकचर्‍याच्या रूपाने सर्वत्र पसरलेल्या नरकाला दूर करून, आपापली घरे स्वच्छ करून, सजवून, दिव्यांच्या दीपत्कारात आसमंत उजळून निघणार आहे. प्राचीन काळापासून चालत आलेल्या या मंगलप्रद सणाची विविध रूपे भारतीय समाजमन अंगप्रत्यंगात साठविणार आहे.

दिवाळीचा सण म्हणजे विविध अशा विधिविमर्शांचा उत्सव. धनत्रयोदशीपासून भाऊबिजेपर्यंत पाच दिवस सतत चालणारा हा सण-समारंभ. राजस्थानात हा ‘रूपचौदस’ या नावाने, तर गुजरातेत ‘रूपचतुर्दशी’ या नावाने प्रसिद्ध आहे. गोवा, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये दिवाळीला ‘नरकचतुर्दशी’ म्हणतात.

गोव्यात दिवाळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी घासून-पुसून स्वच्छ करतात. फुले, पाने, वेली, फळे आणि शाडूने ती सर्व भांडी सजवितात. वाद्य-नादाच्या साथीने सजविलेल्या मोठ्या घड्यात पाणी भरले जाते. हे विहिरीचे पाणी म्हणजे प्रत्यक्ष गंगेचे पाणी अशी जनमानसात श्रद्धा असते. ते पाणी साठविण्यासाठी तांब्या-पितळेची भांडी असली तरी एखादे मातीचे नवीन भांडे जाणीवपूर्वक सजविले जाते. आपल्या प्राचीन संस्कृतीची, मृत्तिकाशिल्पाची ती परंपरा प्रतीक रूपाने का असेना, परंतु जपण्याचा तो एक प्रघात आहे.

त्याच रात्री नरकासुरवधाचा कार्यक्रम गोव्यातील सर्व भागांत साजरा होतो. कृष्णाकडून नरकासुराचा प्रतीकात्मक वध घडवून आणला जातो. मध्यरात्रीपर्यंत नरकासुराच्या मोठमोठ्या प्रतिमा तयार करून वाद्यसंगीताच्या तालावर त्यांची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर त्या प्रतिमा सार्वजनिक जागी जाळल्या जातात. मध्यरात्रीपर्यंत वाद्यसंगीत आणि गोंगाट करण्याचे अशुभनिवारण होते आणि शुभ-मंगलाची प्राप्ती होते असा समज आहे.

नरकचतुर्दशीच्या पहाटे खोबरेल अंगाला चोपडून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करतात. दीपदानाने संपूर्ण घरे उजळून निघतात. या दीपदानाच्या उजेडामुळे अशुभनिवारण होऊन पवित्र वातावरणनिर्मिती होते अशी श्रद्धा आहे. तेलमर्दन करून स्नान करण्यामागे एक महत्त्वपूर्ण भावना आहे. तेलामध्ये लक्ष्मी आणि जलामध्ये गंगा वास करते ही ती भावना. लक्ष्मी म्हणजे सुबत्ता आणि सौंदर्य तर गंगा म्हणजे स्वच्छता आणि पावित्र्य. या उभयतांची उपासना करण्याची ही दिवाळीची परंपरा.

अभ्यंगस्नानानंतर दिवे ओवाळणी होते. त्यावेळी कारीट पायाने चिरडण्याची प्रथा आहे. कारीट हे नरकासुराचे प्रतीक. त्याचा वध आणि विजयोत्सवानिमित्त दिवे ओवाळणी असा प्रघात आहे. त्यानंतर विविध प्रकारचे पोहे तयार करून संपूर्ण कुटुंब त्यांचा आस्वाद घेतेच. परंतु शेजारीपाजारी आणि मित्रमैत्रिणींना बोलावून ते खायला घालतात. अमावास्येच्या रात्री लक्ष्मीपूजन करतात, तर बलिप्रतिपदेच्या दिवशी ‘गुरांचा पाडवा’ साजरा करून गाई-गुरांची पूजा करून त्यांना गोडधोड खायला देतात. गुराख्यांचे मानपान करतात. यमद्वितीयेच्या दिवशी अलीकडे भाऊबीज करण्याची प्रथा रूढ झाली आहे. एकंदरीत पाच दिवसांचे हे दीपावली पर्व गोव्यात साजरे केले जाते. मात्र भारताच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे लोकाचार पाहायला मिळतात. उत्साह तोच. आनंदाची उधळण, दीपदान, दारूकाम, फटाके, मिष्टान्न आणि फराळ सगळीकडेच आहे. उंचावर आकाशदिवे लावण्याची पद्धतही बहुतेक ठिकाणी दिसते.

राजस्थानमध्ये दीपदान व दीपपूजेवर भर देण्यात येतो. एका मातीच्या छिद्रमय घड्यामध्ये दिवा लावण्यात येतो. त्याला ‘घुडल्या’ असे म्हणतात. साजशृंगार केलेल्या स्त्रिया डोक्यावर घुडल्या घेऊन दारोदार फिरतात. प्रत्येक घरात घुडल्यासाठी तेल व स्त्रियांसाठी मिठाई वाटण्यात येते. काही ठिकाणी दारूकामाचा वापर करून लंकादहनाचा देखावा सादर करतात. कारण रूपचौदसचा (दिवाळी) संबंध ते राम वनवासातून परत अयोध्येला आला त्या प्रसंगाशी जोडतात. दुसर्‍या दिवशी लक्ष्मीपूजन व तिसर्‍या दिवशी गाई-बैलांची पूजा करतात.

उत्तर प्रदेशातही ग्रामीण भागात दिवाळीच्या रात्री गाई-गुरांची पूजा केल्यावर दूध-दुभत्याचा व्यवसाय करणारे लोक मशाली हातात घेऊन नाच करतात. यक्षांचा राजा- धनदेव कुबेराची व देवीची पूजा करून तूप-साखरेचा नैवेद्य सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात.

महाराष्ट्रात नरकचतुर्दशीला नरकासुराची शेणाची आकृती करून ती कचर्‍याच्या ढिगासोबत जाळून टाकतात. कारीट पायाने ठेचतात. अलक्ष्मीला दूर करणार्‍या झाडूची, नवीन झाडू आणून पूजा करतात. दिवाळीच्या दिवसांत गुरांची पूजा करण्याची प्रथाही आहे. परंतु अन्य प्रदेशांच्या तुलनेने दिवाळीचा सण महाराष्ट्रात अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

नेपाळमध्ये गाई-बैलांची पूजा तर होतेच, परंतु द्यूतक्रीडा मोठ्या प्रमाणावर होते. धनत्रयोदशीच्या रात्री पार्वतीने शिवाला द्यूतक्रीडेत हरविले होते. म्हणून त्यादिवशी द्यूतक्रीडा होते. आंध्र प्रदेशातील लोक दीपदान करण्यासाठी घरांसमोर मचाणे उभारून त्यावर दिवे लावतात. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी रात्रभर तिची स्तुतिगीते गातात. बलिप्रतिपदेला गोठ्यात बळीची प्रतिमा स्थापून तिची व गाईबैलांची पूजा करतात. बंगालमध्ये काली हीच लक्ष्मी, सरस्वती आणि शक्ती असे मानून लक्ष्मीपूजनाऐवजी कालिपूजन करून दिवाळी साजरी करतात. जागरण आणि स्तोत्रगायन यावर येथे भर दिला जातो. पंजाबमध्ये दिवाळीचा दीपोत्सव हा अमृतसरच्या सुवर्णमंदिराचा स्थापनादिन म्हणून साजरा करतात. गुजरातेत धनत्रयोदशीच्या आदल्या दिवसापासून दिवाळीच्या सणाला म्हणजे ‘वाघवारान’ला सुरुवात होते. त्या दिवशी स्त्रिया रांगोळ्या घालतात. त्यात वाघाचे चित्र अत्यावश्यक असते. धनत्रयोदशीला अलंकारपूजन होते. रूपचतुर्दशीला (दिवाळी) ते काळरात्र मानून घराबाहेर पडत नाहीत. अमावास्येला दौत, रुपया आणि नोंदवही ही अनुक्रमे महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांची प्रतीके पुजली जातात. प्रतिपदेला काळभैरवाची पूजा करून शुभशकून म्हणून मीठ वाटतात.

दिवाळीच्या सणाचा संबंध अनेक पौराणिक कथांशी लावला जातो. त्यातील काही महत्त्वपूर्ण संदर्भ देता येतील. पृथ्वीपुत्र नरकाने अदितीच्या कानातील कुंडले जबरदस्तीने हिरावून घेतली आणि आपल्या दुर्गम अशा प्राग्‌ज्योतिषपुरातील किल्ल्यात दडवून ठेवली. परंतु सर्व देवांनी एकत्रितपणे कृष्णाला आवाहन केले. त्यांच्या विनंतीनुसार कृष्णाने नरकासुराचा वध करून अदितीची कुंडले परत मिळवून दिली.

हरिवंशपुराणातील कथेनुसार नरक हा फार पराक्रमी होता. त्याने सर्व देवांचा पराभव केला. तो वेषांतर करण्यात पटाईत होता. त्याने एकदा हत्तीचे रूप घेऊन विश्‍वकर्म्याच्या कन्येचे अपहरण केले. तेवढ्यावरून तो थांबला नाही; कित्येक गंधर्वकन्या, राजकन्या, राण्या आणि अप्सरांना त्याने आपले बंदी बनविले. या बंदिवासात असलेल्या स्त्रियांची संख्या सोळा हजारांपर्यंत गेली. स्त्रियांची दागिने, हिरे, माणके यांविषयीची आवड लक्षात घेऊन त्याने आपल्या प्राग्‌ज्योतिषपूर राजधानीत हिरे, माणकांनी मंडित असा भव्य बंदीखाना या स्त्रियांसाठी बनविला. असहाय्य अशा देवांनी श्रीकृष्णाची करुणा भाकली. त्यानुसार श्रीकृष्णाने नरकासुराला ठार करून सोळा सहस्र स्त्रियांची सुटका केली. एवढेच नव्हे तर आपण श्रीकृष्णाच्या पत्नी असल्याचे सांगण्याचे त्यांना स्वातंत्र्य बहाल केले. ही घटना नरकचतुर्दशीच्या दिवशी घडली म्हणून दिवाळी साजरी करण्यात येते.

यासंदर्भात बळीराजाची एक मनोरंजक कथा सांगण्यात येते. दानशूर आणि प्रजाहितदक्ष बळीराजाने देवांचा पराभव करून त्यांचे राज्य घेतले. मग विष्णूने वामन अवतार घेऊन बळीराजाला पाताळात लोटले. त्यावेळी बळीराजाने विष्णूकडे वर मागितला की वर्षातून किमान एकदा आपल्याला पृथ्वीतलावर येऊन राज्य करण्याची संधी द्यावी. विष्णूने तसा वर दिला. परंतु अट घातली की दिवाळीच्या दिवसांत तुला तशी संधी मिळेल, मात्र तुला अंधार्‍या जागीच राज्य करता येईल. म्हणून बळीराजाला संधी मिळू नये या उद्देशाने सर्वत्र दीप प्रज्वलित करण्याची परंपरा सुरू झाली.

हेमराजाची कथा ही एक करुण कथा. हेमराज जन्माला आला त्यावेळी सटवीने त्याचे विधिलिखित लिहिले. त्यानुसार हेमराजाला त्याच्या लग्नाच्या चौथ्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू येईल. राजाच्या कुटुंबीयांनी पूर्ण खबरदारी म्हणून हेमराजाला एका बेटावर लहानाचे मोठे केले. परंतु लग्नाच्या चौथ्या दिवशी हेमराजाला आलेल्या शिंकेतून साप अवतरला व त्याने हेमराजाला दंश केल्याने राजा मृत झाला. त्यावेळची ती करुण परिस्थिती यमदूतांनाही हेलावून गेली. यमदूतांनी यमाला विनंती केली की, असा अपमृत्यू येऊ नये म्हणून यमराजाने उपाय सुचवावा. यमाने सांगितले की, जो धनत्रयोदशीपासून यमद्वितीयेपर्यंत रोज रात्री दीपदान, तेल चोपडून अभ्यंगस्नान आणि नवे कपडे परिधान करेल त्याची अपमृत्यूपासून सुटका होईल. यमद्वितीयेच्या दिवशी यमराजाची बहीण यमीने यमाला आपल्या घरी बोलावून त्याचा मानसन्मान केला. त्याची स्तुती केली व ओवाळणी केली. त्यामुळे यम आनंदीत झाला. तेव्हापासून भाऊबिजेची प्रथा सुरू झाली असे सांगतात.

असतो मा सत्‌गमय

तमसो मा ज्योतिर्गमय

मृत्योर्मा अमृतंगमय

ही आपली संस्कृती असत्यापासून सत्याकडे, अंधारापासून प्रकाशाकडे आणि मृत्यूपासून अमृताकडे जाण्याचा संदेश सांगणारी, शिकवण देणारी. त्यामुळे आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा, दुःखाच्या आणि अपयशाच्या अंधारातून ज्ञानाच्या, आनंदाच्या आणि यशस्वितेच्या मंगलमय जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा घेण्याचा हा सण. दीपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभकामना.