मंकीपॉक्स : राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क

0
14

>> आरोग्य संचालकांची माहिती; मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी

केंद्र सरकारकडून मंकीपॉक्स संदर्भात प्राप्त झालेल्या मार्गदर्शक तत्त्वांची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. आरोग्य यंत्रणा मंकीपॉक्सच्या पार्श्‍वभूमीवर सतर्क झाली आहे. मंकीपॉक्स रुग्णाचा शोध घेण्यासाठी देखरेख ठेवली जात आहे. तसेच, मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी डॉक्टरांचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य संचालिका डॉ. गीता काकोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

देशात केरळ आणि दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याची सूचना केली असून, मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राज्यात मंकीपॉक्स रुग्ण शोधण्यासाठी देखरेख ठेवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राज्यातील सरकारी डॉक्टर, आयएमएच्या डॉक्टरांना मंकीपॉक्सची माहिती देण्यात आली आहे, असे डॉ. काकोडकर यांनी सांगितले.

दाबोळी विमानतळावरील संचालकांना मंकीपॉक्सची माहिती देण्यात आली आहे. विमानतळावर एखादा संशयित रुग्ण आढळून आल्यास संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे. विमानतळावर मंकीपॉक्ससाठी स्क्रिनिंगची गरज नाही. मंकीपॉक्सचा एखादा संशयित रुग्ण आढळून आल्यास नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. तसेच चिकनपॉक्स रुग्णाचे नमुनेही तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत. मंकीपॉक्स रुग्णांना वेगळे ठेवून उपचार करण्यासाठी गोमेकॉ, जिल्हा इस्पितळ आणि इतर सरकारी इस्पितळात खाटांची व्यवस्था केली आहे, असेही डॉ. काकोडकर यांनी सांगितले.